Saturday 31 December 2016

दारूची आणि माझी मैत्री

काल (३० डिसेंबर २०१६) कार्यालयातील WhatsApp समुहावर वर सहकाऱ्याने दुसऱ्याची एक कविता टाकली. कवीचे नाव माहीत नाही. कवितेचं शिर्षक होतं "दर पार्टीच्या शेवटी एक क्वाटर कमी पडते" छान होती कविता. माझ्या साहेबांनी मला आग्रह केला तु सुद्धा एक दारू साठी एक कविता कर. माझा आणि दारूचा काहीच संबंध नाही. पण साहेबांच्या आग्रहाखातर ही कविता मी केली. अगदी वर नमूद केलेल्या कवितेच्या विरूद्ध ही माझी कविता आहे.


दारूची आणि माझी मैत्री


दारूची आणि माझी मैत्री
जरा सुद्धा होत नाही
दारू पिणं तर दूरच
मी वास सुद्धा घेत नाही

पिणारे कसे पितात दारू
हा विचार करतो जरासा
पिणाऱ्यांच्या संगती बसुन
राखतो घरच्यांचा भरवसा

दारूचा ग्लास हाती न घेता
मी ताव मारतो चकण्यावर
न जाळता कधी देह दारूत
प्रेम करतो मी या जगण्यावर

अनुभवले नाही मी हे कि
दारूत कसली नशा आहे
दारूच्या ग्लासात न हरवता
जगण्यास अनेक दिशा आहे


यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ डिसेंबर २०१६

Wednesday 21 December 2016

वाचन किती महत्वाचे?

    प्रेमात पडायचं असेल तर पुस्तकाच्या प्रेमात पडावं. आणि नाती जोडायची असतील तर पुस्तकाशी जोडावं. कारण जो एखाद्याच्या प्रेमात पडतो तो त्याची खुप काळजी घेतो व त्याला जीवापाड जपतो. जर तुम्ही पुस्तकांच्या प्रेमात पडाल तर सहजच तुम्हाला वाचनाची आवड लागेल. मी तर म्हणतो तुम्ही एकदा पुस्तकाच्या प्रेमात पडूनच बघा. आणि पहा काय फरक जाणवतो.

    वाचन म्हणजे कला. वाचन ही अशी कला जी व्यवहारात दैनंदिन जीवनात याची खुप मदत होते. माणसाला इतर व्यसनांपेक्षा वाचनाचं खुप व्यसन असावं. अडलेल्यांना मार्ग दाखवतो ते म्हणजे वाचन. समजा एखाद्या विषयावर चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेचा तूम्ही एक भाग आहात. खुप वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की चर्चेमधल्या विषयांवर तुम्ही पूर्वी काहीतरी वाचन केलं आहे व इतर कोणालाही त्याच्याबद्दल माहीती नाही आणि काहीच क्षण न दवडता तुम्ही लगेच त्याची माहीती त्या चर्चेत पूरविता. त्याक्षणी त्या चर्चेत तुमचा दरारा असेल. व इतर सर्व जण तुम्हाला एक हूशार व्यक्ती म्हणून पाहत असतात. त्यावेळी आपण इतरांवर एक वेगळीच छाप सोडतो. हे फक्त होतं वाचणामूळेच.

    तुम्हाला आवडत्या व्यक्तीची मैत्री करायची असेल तर काहीही करून जीवाचा आटापिटा करून तुम्ही त्या व्यक्तीची माहीती मिळवता व त्यांच्याशी संपर्क  साधण्याचा प्रयत्न करता, हेच पुस्तकाच्या बाबतीत घडलं तर. खुपच फरक पडेल. एकदा का तुम्हाला  वाचनाची सवय लागली की बघा फरक किती पडतो. ते स्वत:लाच विचारा. पुस्तक हा आपला गुरू असतो हे मानायला हरकत नाही कारण आपण ज्या गोष्टीचे वाचन केले आहे त्या वाचनातून आपण बरंच काही शिकतो व घडतो. शिकवण्याचं, मार्ग दाखवण्याचं, घडवण्याचं काम हे पुस्तक करतंच ना! मग पुस्तक म्हणजे आपला गुरूच आहे. पुस्तक हा आपला मार्गदर्शक असतो. बऱ्याच वेळी चुकलेला रस्ता सोडून सरळ मार्गाने चालण्यास भाग पाडण्याचे काम ते पुस्तकालाच जमतं.

    काही केलेलं वाचन हे आपल्या कधी काही तासांपुरतं स्मरणात राहतं तर काही केलेलं वाचन हे आपण कधी विसरूच शकत नाही. तुम्ही याचा विचार केलात का हो कधी! हे असं का घडतं. आपण काही वाचताना आजुबाजुला काही गडबड व गोंधळ असेल तर खरंच ते वाचन जास्त काळ आपल्या स्मरणात राहत नाही. वाचन करताना त्या पुस्तकातील प्रत्येक पात्रात आपल्याला पहावं. वाचन करताना त्या कथेचा वा त्या गोष्टींचा आपण एक भाग आहोत असे जर आपल्या मनात असेल तर तसे वाचन आपण लवकर विसरत नाही. कधी कधी ते आपल्या कायमच्या स्मरणात राहतात.

    निरीक्षण करणे ही माझी सवय. माझा दिवसभराचा बराच वेळ हा प्रवासात जातो. घर ते कार्यालयात, कार्यालय ते घर  (मी बदलापूर येथे राहतो व कामासाठी अंधेरी (एअरपोर्ट रोड-मेट्रो) येथे येतो. प्रवासात व्यक्ती आपला वेळ जात नाही म्हणून बहूतेक जण आपल्या मोबाईल मध्ये मग्न असतात हे मला नेहमी पहायला मिळतं. कोणी गेम खेळतो तर कोणी काणाला हिअर फोन लावून गाणी ऐकतो. हे करत असताना बहूतेक वेळा आपल्या अवती -भोवती काय घडतं आहे हे लवकर त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही. माझं असे म्हणणे आहे की हीच मग्नता आपण वाचनात दाखवली तर त्याचा बराच फायदा होईल. माझे तरूण वर्गाला हेच सांगायचं आहे की तुम्ही भविष्य आहात. जसा वेळ मिळेल तसे जास्तीत जास्त वाचन करा. अशा गोष्टी करणे टाळा की ज्या गोष्टीचा आपल्या फायदा होत नाही.

    वाचनाचे बरेच फायदे आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. आपले वाचन नियमीत असेल तर  समाजात वावरताना, व्यक्तीशी संवाद साधताना आपण कधीच अडखळत नाही. संवाद साधताना कधी कुठे कोणता शब्द वापरावा हे लगेच लक्षात येते. थोडक्यात सांगायचं म्हणजे वाचनामूळे आपल्या ज्ञानात बरीच भर (शब्दांची) पडते. लिखाण करतानाही आपल्या शुद्धलेखनात भर पडते.

    माझ्या बरोबर घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो. २००४ सालची गोष्ट आहे. मी श्री. प्रवीण दवणे सरांचं एक पुस्तक वाचलं आणि मला राहवलं गेलं नाही आणि मी पुस्तक आवडलं म्हणून त्यांना पत्राद्वारे कळवलं. आठवडा भरातच मला त्यांचं पत्र आलं. मला पत्र आलं होतं तेव्हा तो दिवस होता १५/५/२००४ पंधरा मे दोन हजार चार. ते पत्र मी अजून जपून ठेवलं आहे. "प्रेम व्यक्त करणारं, लेखणास प्रतिसाद देणारं पत्र खुप आवडलं" असं त्यांनी पत्रात नमूद केलं होतं. पत्रात त्यांनी मला असाही एक सल्ला दिला की, " तुझं सर्व शिक्षण पूर्ण झाल्यावर आधी बाह्यावाचणावर भर दे." त्याचं कारणही तसंच होतं.  मी त्या पत्रात भावनेच्या भरात "आशीर्वाद" हा शब्द "आर्शिवाद" असा लिहिला होता. त्यांनी तो मला त्यांच्या शैलीत पत्राद्वारे समजवून सांगितला होता. बाह्यवाचन व शुद्धलेखनावर जास्त भर देण्यास त्यांनी मला सांगितले. खरं सांगू मित्रांनो मी तूम्हाला, त्या एका पत्रामुळे मला खुप काही शिकायला मिळाले. त्यांचं पत्र आलं  तेव्हा मी कला शाखेत (समाजशास्त्र विषय) दुसऱ्या वर्षाला होतो. मी  त्यावेळी समाजशास्त्र या विषयाचं वाचन फार कमी केलं, व इतर लेखकांची, कवींची पुस्तकं वाचण्यास भर दिला. श्री. प्रविण दवणे सर खरंच तुमच्या एका पत्रामुळे माझ्यात खुप बदल घडून आले आहे. धन्यवाद श्री. प्रविण दवणे सर.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ डिसेंबर २०१६

Tuesday 20 December 2016

प्रतिष्ठा

मिळत नसते सहजच प्रतिष्ठा
प्रयत्नाने ती कमवायची असते,
कमवायचीच जर असेल ती तर
थोडी माणूसकी दाखवायची असते

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० डिसेंबर २०१६

बाळाचे आगमन

इवल्याशा पावलांनी आता
घर अंगण सजणार
जगाला विसरून सारे
बाळात आता रमणारा

शुभेच्छा तुम्हाला देतो
स्वागत बाळाचे करताना
तुम्हीही भुलणार आता
डोळ्यांत स्वप्ने जपताना

तुमच्या मनात होता
बाळाच्या आगमणाचा ध्यास
आजचा क्षण आणि दिवस
आहे तुमच्यासाठी खास

आनंदातही आज जणू
आसमंत फूलून जातो
बाळाला शुभ आशिर्वादासह
शुभेच्छा तुम्हाला देतो

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० डिसेंबर २०१६

Sunday 18 December 2016

विसरलेलं प्रेम

विसरलेलं प्रेम आणि "ती" ची
आठवण पुन्हा  येऊ लागली
नजरेने केलेली जखम आज
पुन्हा ताजी होऊ लागली

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ डिसेंबर २०१६

Friday 16 December 2016

आई

रक्त मांसाच्या गोळ्याला
जपून ठेवले तू पोटात।।
सोसून कित्येक यातना
आणलेस मला जगात।।१।।

भूक माझी भागवली
स्वतः उपाशी राहून।।
आई, मला तू जपले
संकटाशी सामना करून।।२।।

देवाला नमन करताना
तुझा चेहरा आठवतो।।
देवापेक्षा महान आई तू
मनात तुलाच साठवतो।।३।।

पर्वतासारखी ऊभी तू
रक्षण माझे करण्यास।।
पाहून तुझी जिद्द आई
बळ येई मला जगण्यास।।४।।

आई कधी तू सावली
कधी रखरखते ऊन।।
शीस्त लावण्यास मला
जगलीस कठोर होऊन।।५।।

चूकीच्या वाटेने जाताना
नेहमी मला अडविले।।
सत्याचा मार्ग दाखवत
आई, मला तू घडविले।।६।।

अपूरा आहे जन्म
सेवा तुझी करण्यास।।
आई, शिकवले मला तू
माणूस म्हणून जगण्यास।।७।।

तू लावलेल्या शीस्तीमुळे
आहे समाजात मान।।
आहे तुझा मी लेकरू
वाटतो मला अभिमान।।८।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ डिसेंबर २०१६ 

Wednesday 14 December 2016

नजर सर्व सांगून जाते

मान्य आहे मला कि
नजर सर्व सांगून जाते
रोज तूला पाहतो आहे
पण दूरूनच  तू निघून जाते


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ डिसेंबर २०१६

Tuesday 13 December 2016

वेडा जीव तळमळतो

होत नाही भेट तिची
वेडा जीव तळमळतो।।
सांगणार कसं तिला?
जीव तुझ्यात घूटमळतो।।१।।

विसरून कसं चालेल
प्रेम आहे पहीलं।।
सांगायचं तिला काही
माझ्या मनातच राहीलं।।२।।

उनाड भावना मनात
अजूनही जपतो आहे।।
ह्रदयात साठवून तिला
कविता लिहितो आहे।।३।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ डिसेंबर २०१६ 

Sunday 11 December 2016

नसता तर संवाद

कळले नसते मन
नसता तर संवाद।।
नसते झाले भांडण
घडला नसता वाद।।१।।

घडला नसता संसार
जुळली नसती नाती।।
नसता तर संवाद
घडल्या नसत्या भेटी।।२।।

थांबले असते जग
थांबली असती गती।।
नसता तर संवाद
नसती झाली प्रगती।।३।।

संवाद म्हणजे शस्त्र
असते जपून वापरायचे।।
संवाद म्हणजे ढाल
संरक्षण करायचे स्वतःचे।।४।।


यल्लप्पा सटवाजी कोकणे
 ११ डिसेंबर २०१६

Saturday 10 December 2016

श्वासात गुंतलीस तु

श्वासात गुंतलीस तु

श्वासात गुंतलीस तु, काळजात आहेस तु।।
सुन्या मैफीलीत माझ्या, गाण्यात आहेस तु।।धृ।।

स्वरात हरवले सुर, गीत तुझे गाताना
जगण्यास बळ येते, आठवणी तुझ्या जपताना

प्रत्येक क्षणात माझ्या, जगण्यात आहेस तु
सुन्या मैफीलीत माझ्या, गाण्यात आहेस तु।।१।।

भान हरवले आहे, स्वप्नात तु रंगताना
सावरू कसा जीव, आठवणींचे वार झेलताना

संपलेल्या आशेची सखे, सुरूवात आहेस तु
सुन्या मैफीलीत माझ्या, गाण्यात आहेस तु।।२।।

श्वासात गुंतलीस तु, काळजात आहेस तु।।
सुन्या मैफीलीत माझ्या, गाण्यात आहेस तु।।धृ।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ डिसेंबर २०१६

Friday 9 December 2016

माणूस जग बदलू शकतो

जमणाऱ्या गोष्टी कोणीही
जो तो सहज करू शकतो
स्वतःला बदलता आले की
माणूस, जग बदलू शकतो

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ डिसेंबर २०१६

Wednesday 7 December 2016

श्वास

आयुष्याचा प्रवास हा अगदी
शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच असतो
मात्र आठवणींचा प्रवास निरंतर
श्वास थांबल्यावरही सुरूच असतो

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ डिसेंबर २०१६

Tuesday 6 December 2016

सुख म्हणजे नक्की काय

सुख म्हणजे नक्की काय
याचा करतो विचार फार
उत्तर तर मिळत नाही पण
प्रश्न उभे राहतात हजार

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ डिसेंबर २०१६

प्रेरणादायी विचार

आरशासमोर उभे राहून त्यात दिसणार्‍या प्रतिबिंबेला विचारा की "मी" कसा दिसतो? जर तुम्ही कुठेच चुकत नाही तर उत्तर मिळेल तुम्ही फार सुंदर आहात. जर मनात काही शंका आल्या तर तो सांगतो की हिच संधी आहे तुम्हाला बदलण्याची. अंतरमनाचं ऐकण्यातच सुख व आनंद आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ डिसेंबर २०१६

प्रेरणादायी विचार

आपल्याला जन्म एकदाच मिळतो व आपला मृत्यूही एकदाच होतो पण या दोन्ही अंतरामध्ये माणूस म्हणून जगण्याची संधी अनेकदा येते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ डिसेंबर २०१६

प्रेरणादायी विचार

स्वभावात परिस्थिती नुसार बदल झाला की मनस्ताप होत नाही. महत्वाचं म्हणजे दडपण कमी होतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ डिसेंबर २०१६

परिस्थिती

परिस्थिती

कधी कधी परिस्थिती
मनात भीती जागवते
हिच परिस्थिती कधी
धौर्याने जगायला शिकवते


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ डिसेंबर २०१६

प्रेरणादायी विचार

प्रेरणादायी विचार

मानसाच्या मनात असलेली भीती किंवा शंका त्याच्या मनातच राहीली की त्याचं दडपण वाढत जातं. वेळीच त्याचं निरसन झालं की जगणं सोपं होतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० नोव्हेंबर २०१६

मन

मन

मनाला आपण विसरून जातो
स्वतःचा विचार करत असताना
क्षणात सुखात हसू आणतो मन
सावरतो दुखःत आसू दाटताना

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ नोव्हेंबर २०१६

जीवन मुठीत

जीव मुठीत

जगताना जीव मुठीत घेऊन
प्रत्येकजण घाबरतो जीवाला
कारण त्याचे एकच आहे
जीव असतो प्रियजनात गुंतलेला


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ नोव्हेंबर २०१६

शेवटची भेट

शेवटची भेट

बरेच वर्षे लोटली
शेवटची भेट होऊन।।
हृदयातून तू जात नाहीस
कितीही प्रयत्न करून।।१।।

तुला विसरण्याचे प्रिये
झाले करून प्रयास।।
तु जवळ असण्याचा
आजही होतो भास।।२।।

दुर केव्हाच गेलीस तु
जुळण्या अगोदर नाते।।
आता फक्त आपली
स्वप्नातच भेट होते।।३।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ नोव्हेंबर २०१६

माणूस

अनेक रूपे मानवाची
जन्मापासून ते मृत्यूपर्यंत
बर्‍याच नात्यात अडकला
माणूस शेवटच्या श्वासापर्यंत

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ नोव्हेंबर २०१६

नाती

नाजूक नाती टिकतात
आपल्यांची मनं जपल्यावर
कधी तडा ही जातो
कटू शब्द वापरल्यावर

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ नोव्हेंबर २०१६

मनं मेली आहेत माणसांची


मनं मेली आहेत माणसांची
सुख दुःख नाही घेत जाणून,
संवेदनशीलता हरवली जणू 
दुसर्‍याच्या दुःखात घेती हौस करून.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
३० ऑक्टोबर २०१६

पहीली नजर

पहीली नजर

तुझ्या आठवणी सोबत
रोज झुरतो आहे।।
केल्या प्रेमाची सजा
मी भोगतो आहे।।१।।

जादू काय होती
पहिल्या तूझ्या नजरेत?
हरवुन गेले आहे
मन गं तुझ्या कैदेत।।२।।

जमलंच तर भेटून जा
ह्रदयी बाग फुलवुन जा।।
एकदा तरी सखे तू
मज सारखी वागून जा।।३।।

विचलीत होते मन
त्रास होतो जगायला।।
बघ जमतंय का तुला?
माझा विचार करायला।।४।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ ऑक्टोबर २०१६

आठवण तुझी

आठवण तुझी आल्यावर
मन गहिवरून आले।।
आठवता सहवास तुझा
मन पाखरू झाले।।१।।

गुंतला जीव तुझ्यात
वेड तुझेच लागले।।
सावरू कसा जीवाला
बेचैन मन हे झाले।।२।।

दूर असली जरी
भास तुझेच होई।।
जाणून घे तु मजला
आठवणीत जीवन जाई।।३।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ ऑक्टोबर २०१६

जीवन गाणे

जीवन गाणे

जीवन गाण्याला सुर, आज मला मिळाले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।धृ।।

होता अबोला दुःखाचा, शब्द फुटत नव्हते।।
काळीज चिरून सुर, कधीच जुळत नव्हते।।

सुर्यापरी तेज अंगी, आज संचारून गेले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।१।।

उजळून दाही दिशा, गेला पळून अंधार।।
नाही कोणी सोबती, फक्त आसवांचा आधार।।

दु:खाशी करून सामना, जगण्यास बळ आले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।२।।

जीवन गाण्याला सुर, आज मला मिळाले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।धृ।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ ऑक्टोबर २०१६

पाऊस

अवनीला हिरवळीत नटवून कधी पाऊस जातो मनाला सुखावून।। पूर दुर्घटना घडता जेव्हा हाच पाऊस जातो दुखावून।।१।। शेतकर्यांच्या डोक्यावर सदा असतो नेहमीच मायेचा हात।। धोधो बरसून वैरासारखे कधी हाच पाऊस करतो घात।।२।। शाप आहे की वरदान काय म्हणावे या पावसाला।। पीक-पाणी कधी मृत्यूचे तांडव अंदाज लागत नाही जगण्याला।।३।। भय भलतेच मनाला वाटे जीव मुठीत धरून जगताना।। निसर्गासमोर पत्करली हार पुरता हरलो निसर्ग समजताना।।४।। यल्लप्पा सटवाजी कोकणे १९ ऑगस्ट २०१६

माझी मेट्रो

माझी मेट्रो

रोज धावणाऱ्या मुंबईला
माझी मेट्रो देते गती।
माझी मेट्रोमुळे मुंबईची
दिवसेंदिवस होते प्रगती॥

सर्वच मेट्रो कर्मचाऱ्यांचे
काम आहे लय भारी।
आणि त्यांच्याचमुळे मेट्रोची
शान आहे लय भारी॥

शिस्त आणि स्वच्छताचे
मेट्रो राखते नेहमी भान।
सलाम माझा त्यांना
जे जपतात मेट्रोची शान॥


यल्लप्पा सटवाजी कोकणे
26 जुलै 2016

झोपेत पडलेलं स्वप्न नेहमी

झोपेत पडलेलं स्वप्न नेहमी
धुक्यासारखे विरून जातात
उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं
मनात जिद्द पेरून जातात

यल्लप्पा सटवाजी कोकणे
15 मे 2016

मन आपलेच वैरी

मन आपलेच वैरी
एकांतात साधतो मोका।।
नकोसे विचार मनात
चूकवी काळजाचा ठोका।।१।।

मन भयाण वादळ
कधी चंचल वारा।।
कधी तुफान पाऊस
कधी रिमझिम धारा।।२।।

मन कधी समजावणारे
कधी बेभान होणारे।।
ऐकणारे कधी आपले
कधी हाताबाहेर जाणारे।।३।।

मन म्हणजे वैरी, 
कधी करतेे धोका।।
मन म्हणजे सखा
कधी देते मोका।।४।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० मे २०१६

प्रेमाची आठवण

प्रेमाची आठवण

सावळ्या नभांना काय सांगू
घालमेल होणारी माझ्या मनाची,
सातासमुद्रा पलीकडे आहे सखी
देतात करूनी आठवण प्रेमाची !

कोसळतो पाऊस अंगणी माझ्या  
अंगणी तिच्याही तोच बरसतो?
दाटून आल्यावर ढग आठवणींचे
झुरायला मलाच का तो लावतो?

कोसळून गेला पाऊस धो धो 
अन् तिच मनात रेंगाळत आहे,
गंधात हिरवळीच्या माती संगे
नजरेत चेहरा तो तरळतो आहे !

कासावीस मन विचारात तिच्या 
स्मरत असेल? ती पण मजला?
सरत्या सरींच्या सह खिडकीतून
यत्न विसरण्याचा करतो तिला !

यल्लप्पा सटवाजी कोकणे
५ मे २०१६

जुनी आठवण

मिळताच जुन्या आठवणींना उजाळा
होई मनाला असह्य त्रास
जेथेवर जाई नजर माझी
तेथवर तिच्या असण्याचा भास

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ मे २०१६

Monday 5 December 2016

जगणे मरणे सारे इथेच आहे

जगणे मरणे सारे इथेच आहे

तोलणे झेलणे दुःख इथेच आहे।।
जगणे मरणे सारे इथेच आहे।।धृ।।

तुझ्या हाती देवा आहे माझी दोरी
संभाळून घे मजला आलो तुझ्या दारी
करता करविता तुच ईश्वरा आहे
जगणे मरणे सारे इथेच आहेे।।१।।

वैतागला जीव विचारी प्रश्न आत्म्याला
नाही उरला अर्थ येथे आज  जगण्याला
झिजलो दुसर्‍यांसाठी जगणे उणेच आहे
जगणे मरणे सारे इथेच आहे।।२।।

तोलणे झेलणे दुःख इथेच आहे।।
जगणे मरणे सारे इथेच आहे।।धृ।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ एप्रिल २०१६

मरणाचं भय

मरणाचं भय

मरणाचं भय असले जरी
ते सुखाचे वाटणार आहे।।
मदतीला हात न देणारे
शेवटी खांदा देणार आहे।।१।।

नाही मिळत साथ मागणार्‍यांची
एकटेच जीवन जगणार आहे।।
मरणानंतर आपलीच सारी माणसं
देहावर अश्रू ढाळणार आहे।।२।।

काटेच काटे आयुष्याच्या वाटेवर
जीवन खडतरच रहाणार आहे।।
प्राण नसलेल्या देहावर अंती
फूलांची उधळण होणार आहे।।३।।

खुपच ऐकले बोलणे जगाचे  
मधूरता नाही उरली जीवनात।।
शब्दांचे चटके देणारे जीवलग
निरोप घेणार माझा भजनात।।४।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ एप्रिल २०१६

तुजसाठी झुरतो सखे

तुजसाठी झुरतो सखे

तुजसाठी झुरतो सखे, वेड लागले मला।।
प्रित जडली तुझ्यावर, गुन्हा माझा झाला।।धृ।।

रूप तुझेच कैद,  हृदयी माझ्या आहे
येताच अचानक तु, चोरून नजरा पाहे
तुझेच नाव ओठी, बदनाम वेडा झाला
प्रित जडली तुझ्यावर, गुन्हा माझा झाला।।१।।

सैरभैर अधिर मन, नाही कशाचे भान
आठवणी शिवाय जीवन, जगत होतो छान
झोप उडाली आहे,  बेचैन जीव झाला
प्रित जडली तुझ्यावर, गुन्हा माझा झाला।।२।।

सदैव उघडे तुजसाठी, दार माझ्या मनाचे
भान नाही उरले, आता मला कोणाचे
ये फूंकून जा जखमा, हृदयावर वार झाला
प्रित जडली तुझ्यावर, गुन्हा माझा झाला।।३।।

तुजसाठी झुरतो सखे, वेड लागले मला।।
प्रित जडली तुझ्यावर, गुन्हा माझा झाला।।धृ।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ एप्रिल २०१६

होते मनात माझ्या

होते मनात माझ्या, सांगायचे गेले राहून।।
हाल वेड्या जीवाचे, तूच घे सखे पाहून।।धृ।।

होते मन मुक्त, स्वछंदी पाखरू गगनात
तुझेच वेड मनाला दिसे तुच स्वप्नात
दाटून आठवण येता, जातो श्वास थांबून
हाल वेड्या जीवाचे, तूच घे सखे पाहून।।१।।

झुगारून दे जगाला, मिठीत ये साजणी
नको चिंता कोणाची, रमून जा यौवनी
मन माझे वेडावले राहते तुझ्यात गुंतुन
हाल वेड्या जीवाचे, तूच घे सखे पाहून।।२।।

होते मनात माझ्या, सांगायचे गेले राहून।।
हाल वेड्या जीवाचे, तूच घे सखे पाहून।।धृ।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ एप्रिल २०१६

ऊठलं ऊरात वादळ

भिजल्या आहेत वाटा
ओला वास मातीला।।
रूप तुझं भिजलेलं
बहर चढला प्रितीला।।१।।

गेला झरून पाऊस
ऊठलं ऊरात वादळ।।
किती आवरू मनाला
श्वासात तुझाच दरवळ।।२।।

आस लागल्या जीवाला
मिळेल कधी गं सुख?
लागलं मन झुरायला
दाटली आठवण खुप।।३।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ एप्रिल २०१६

लावणी

लावणी

रूपाच्या तोर्‍यात ज्वानीच्या भरात
बंधने सारी मी तोडून आले।।
बघा राया तुम्हासाठी कसा खास
साज शृंगार करून आले।।धृ।।

बसा जवळ पहा राजसा साज
ओठांनी ओठांचं कळूद्या गूज
तूम्हासाठी विसरून जगाला गेले

बघा राया तुम्हासाठी कसा खास
साज शृंगार करून आले।।१।।

केला तुम्हावर जीव मी बहाल
पाहून तूम्हाला होई जीवाचे हाल
रंगुन पिरतीच्या रंगामंदी मी गेले

बघा राया तुम्हासाठी कसा खास
साज शृंगार करून आलेे।।२।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ एप्रिल २०१६

आसवे

भेटण्यास आतुर आसवे
आठवण तुझी आल्यावर।।
तु सुद्धा भेटायला येतेस
गप्पा आसवांशी संपल्यावर।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ एप्रिल २०१६

दु:खालाही खुप आवडतं

दु:खालाही खुप आवडतं
माझ्या सोबत राहायला।।
त्याच्या सोबत शिकून घेतो
नवीन जीवन जगायला।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ एप्रिल २०१६

राजकारण

राजकारण
खेळून विचित्र राजकारण
लढतात आपसात पक्ष सारे,
भांडणात नेत्यांच्या होते इथे
नुकसान गोरगरीबांचे हे खरे !
तावडीत नेहमीच नेत्यांच्या
सामान्य जनता न् शेतकरी,
भाजून निघते पोळी त्यांची
राहतात भुकेले मग कष्टकरी !
भरलेली तिजोरी भरते आहे
गरिबां तोंडचा घास ओढून,
निर्लज्ज पणाचा कळस हा
दिसे केवळ राजकारणातून !
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ एप्रिल २०१६

साथ हवी जगण्याला

साथ हवी जगण्याला

सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।धृ।।

विरल्या धुक्यात वाटा, धुंद झाल्या दिशा
भास तुझाच होतो, जडली प्रेमाची नशा
नाते आपले अतूट, सांगे ते दव पानाला

सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।१।।

पदराशी खेळ करता, पाहसी रोखून नजरा
खिळवून ठेवतो मला, सुगंधी तुझा गजरा
समजावू किती,कसा, रात्री जागत्‍या स्वप्नाला

सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।२।।

आठवण तूझी ओली,पावसाळी बरसून गेली
क्षणात मनी प्रितीची वीज चमकावून गेली
सुगंध लपल्या फुलांचा, मोहवून गेला मनाला

सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।३।।

गंध मातीचा ओला, सांगे पाऊस पडून गेला
स्मरता रूप साजिरं, जीव हा वेडा झाला
सजवून ठेवतो मनी, त्या एक एक क्षणाला

सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।४।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ मार्च २०१६

चौकट

असता देहात प्राण
चौकटीत जगतो माणूस
जीवन संपले तरी
चौकटीत दिसतो माणूस

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ मार्च २०१६

शिस्त हरवली आहे

शिस्त हरवली आहे

शिस्त हरवली आहे मानवाची
वाढला आहे भलताच क्रोध,
लाख पटीने बरे पशुपक्षी
घ्यावा केव्हातरी त्यांचा बोध.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ मार्च २०१६

जगायचं की मरायचं?

जगायचं की मरायचं?

संवाद खुंटतोय हल्ली
वाढले अंतर नात्यातले।।
धावपळीचे जीवन जगता
हरवले सुर जगण्यातले।।१।।

हरवलंय माणूसपण ईथे
शोधूनही सापडत नाही।।
ठेवायचा विश्वास कोणावर
काहीही कळत नाही।२।।

उरलेच नाही आताशा
भान कुणाचे कोणाला।।
जगायचं की मरायचं?
उत्तर नाही या प्रश्नाला।।३।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ मार्च २०१६

जगायचं की मरायचं?

जगायचं की मरायचं?

संवाद खुंटतोय हल्ली
वाढले अंतर नात्यातले।।
धावपळीचे जीवन जगता
हरवले सुर जगण्यातले।।१।।

हरवलंय माणूसपण ईथे
शोधूनही सापडत नाही।।
ठेवायचा विश्वास कोणावर
काहीही कळत नाही।२।।

उरलेच नाही आताशा
भान कुणाचे कोणाला।।
जगायचं की मरायचं?
उत्तर नाही या प्रश्नाला।।३।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ मार्च २०१६

ऋतूचक्र

ऋतूचक्र

कुठे कधीही पडतो पाऊस
कसेही वाहतात वादळ वारे।।
बदलत आहे मानवा सम
ऋतूचक्र हे निसर्गाचे सारे।।१।।

गारपिटीनेे नष्ट होते शेती
रात्रं दिवस जागून कसलेली।।
मावळते आस असलेली ती
फार दिवस मनात जपलेली।।२।।

जाता कष्ट वाया शेतकर्‍याचे
असते कुठे तेव्हा सरकार?
जाहीर मदतीत त्या शासनाच्या
राजकारणी करतात फेरफार।।३।।

जीवनदाता पाऊस पडणारा
बरसतो अवेळी क्रूर होऊन।।
मानवा, रोपट्याचा वृक्ष करून
घे नाते निसर्गाशी जुळवून।४।।

सुखासाठी केल्या अनेक कृती
फाटते बघ कधीही आभाळ।।
भानावर यावेस माणसा तू
लेकरापरी कर निसर्ग सांभाळ ।।५।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० मार्च २०१६

होतो उशीर माणूस ओळखण्यास

होतो उशीर माणूस ओळखण्यास 
जगत असताना स्पर्धेच्या युगात।
निसटून जाता वेळ महत्वाची
झुरतो माणूस आपल्याच जगात।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ मार्च २०१६

का आलीस पुन्हा?

का आलीस पुन्हा?

झोप कुठे हरवली?
मलाच माझे कळेना।।
भरकटले चित्त आहे
जीवनाचे सुर जुळेना।।१।।

शांत मनात माझ्या
आले उसळून वादळ।।
विसरलो केव्हाच होतो
गजर्‍याचा तुझ्या दरवळ।।२।।

नकोस भेटू पून्हा
नको नवीन डाव।।
नाही ताकद आता
सोसण्यास नवीन घाव।।३।।

आता देत आहे
नवीन वळण जगण्याला।।
नाही अर्थ काहीच
तुजसाठी रोज झुरण्याला।।४।।

का आलीस पुन्हा?
स्वप्नात रंग भरण्यास।।
केव्हाच रमलो होतो
जीवन नवीन जगण्यास।।५।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ फेब्रुवारी २०१६

का आलीस पुन्हा?

का आलीस पुन्हा?

झोप कुठे हरवली?
मलाच माझे कळेना।।
भरकटले चित्त आहे
जीवनाचे सुर जुळेना।।१।।

शांत मनात माझ्या
आले उसळून वादळ।।
विसरलो केव्हाच होतो
गजर्‍याचा तुझ्या दरवळ।।२।।

नकोस भेटू पून्हा
नको नवीन डाव।।
नाही ताकद आता
सोसण्यास नवीन घाव।।३।।

आता देत आहे
नवीन वळण जगण्याला।।
नाही अर्थ काहीच
तुजसाठी रोज झुरण्याला।।४।।

का आलीस पुन्हा?
स्वप्नात रंग भरण्यास।।
केव्हाच रमलो होतो
जीवन नवीन जगण्यास।।५।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ फेब्रुवारी २०१६

तापत आहे धरणी

तापत आहे धरणी

रोज गजबजलेल्या नदीचे
सुकले आहे काठ।।
थांबून गेली रेलचेल
सर्वांनी फिरवली पाठ।।१।।

भेगा वाढत आहे
हरवली सुपीकता जमिनीची।।
पाणी नाही बंधर्‍यात
चिंता वाढली शेतकर्‍याची।।२।।

घेतला निरोप गारव्याने
तापत आहे धरणी।।
भागवण्यास तहान पक्षी
फिरे शोधीत पाणी।।३।।

निष्ठूर झाला सुर्य
ठेकळं गेली सुकून।।
हिरवं स्वप्न पाहण्यास
पाणी आणायचं कोठून।।४।।

दिली होती आश्वासने
झाली कोरडी आता।।
पाहण्यास हाल शेतकर्‍याचे
फिरकत नाही नेता।।५।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ फेब्रुवारी २०१६

गुरूकुल समाज विकास प्रबोधिनी NGO

श्री. जितेश मिंडे (डाॅ. योगेश मिंडे - बदलापूर यांचे मोठे बंधू) हे "गुरूकुल समाज विकास प्रबोधिनी"  (रायगड) संस्थेचे (NGO) संस्थापक आहे. राहणार बदलापूर.  त्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या संस्थेसाठी घोष वाक्य व कविता लिहण्याचा मान मला मिळाला.  श्री.  जितेश मिंडे यांनी मला हे कार्य सांगितल्याबद्दल मी त्यांचा खुप आभारी आहे.

"गुरूकुल समाज विकास प्रबोधिनी"

घोष वाक्य

ध्यास आहे तुमचा, सहवास नक्कीच गुरूकुलचा

जिथे चिकाटी तुमची, असेल मदत गुरूकुलची

कविता

पुढील आयुष्यात तुमच्या
सहवास नेहमी गुरूकुलचा।।
जिद्द असता तुमची
मदतीचा हात गुरूकुलचा ।।१।।

एकच मनी ध्येय
व्हावा विकास समाजाचा।।
लपला गुरूकुलच्या प्रयत्नात
विजय प्रत्येक गोरगरीबाचा।।२।।

असेल तुमचे सहकार्य
लावू पळवून दुःखाला।।
हरवल्या जिद्दीची जादू
दाखवून देऊ जगाला।३।।

होता मन परिवर्तन तुमचे
सुख नांदेल जीवनी।।
संस्था आपली एकच
गुरूकुल समाज विकास प्रबोधिनी।।४।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ फेब्रुवारी २०१६

जाती भेद

जाती भेद

करीत नाही भेदभाव
पाणी वारा कोणावर,
विसरून जाती भेद
प्रेम करा जगण्यावर!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ फेब्रुवारी २०१६

जाती भेद

जाती भेद

करीत नाही भेदभाव
पाणी वारा कोणावर,
विसरून जाती भेद
प्रेम करा जगण्यावर!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ फेब्रुवारी २०१६

सैनिक

सैनिक

नाही स्वतःची चिंता
उभे सैनिक सीमेवर।।
देशाचे रक्षण करत
झेलीत गोळ्या छातीवर।।१।।

आहात तुम्ही म्हणून
जगतो आम्ही आरामात।।
चिंता करता देशाची
न गुरफटता नात्यात।।२।।

नाही जुमानत कधी
ऊन पाऊस वारा।
तुमच्यामुळेच आहे आज
सुरक्षित भारत सारा।।३।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ फेब्रुवारी २०१६

प्रेम

प्रेम

प्रेमाला रंग नसला तरी
प्रेम रंग भरतो जीवनात
कधी सुचत नाही काही
कधी अनेक विचार मनात

प्रेम सांगता येत नाही
प्रेम हळूच उतरतं डोळ्यात
एकांतात विचार करत असता
प्रेम सुखावून जातो क्षणात

दुखः आणि आनंदाचे नाते
म्हणजे प्रेम असतं का?
कोणाला आपल्यात गुंतवून
स्वतः झुरणं प्रेम असतं का?

जुळून आले प्रेमाचे नाते
नवी उमेद मिळते जगण्याची
कधी विश्वास तर कधी
मनात जन्मते भीती गमावण्याची

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ फेब्रुवारी २०१६

प्रेम म्हणजे नक्की काय?

प्रेम म्हणजे नक्की काय?

आजही तुझी आठवण येते
काळ जरी लोटला भरपूर।।
आहेस सातासमुद्रा पलीकडे तु
नेहमी लागे जीवा हुरहुर।।१।।

तुझ्या माझ्या नात्याचं गणित
आजही सुटत नाही मला।।
एकांत असतो जेव्हा सोबत
आठवणीत रमतो घेऊन तुला।।२।।

होईल का भेट आपली?
देशील का प्रेमाचा पूरावा?
जमलं तर कमी कर
दोघांमधील वाढलेला दूरावा।।३।।

माहित आहे चांगलच मला
तुलाही येते माझी आठवण।।
गुंतलेले मन तुझ्यात माझे
करीत असते आठवांची साठवण।।४।।

मनी येती आठवणी दाटून
मिळता जरासा एकांत मनाला।।
प्रेम म्हणजे नक्की काय?
हाच प्रश्न विचारतो स्वतःला।।५।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० फेब्रुवारी २०१६

जनसागर

जनसागर उसळत आहे
गावाची शहरे झाली,
रान जंगल तोडून
तेथे घरे झाली।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ फेब्रुवारी २०१६

प्रेरणादायी विचार

जर एखादी व्यक्ती आपल्याला काही समजावून सांगत असेल आणि ते आपल्या बुद्धीला पटण्यासारखं नाही असे आपल्याला वाटत असेल तरी त्याचा विचार करायला हवा कारण त्यात समोरच्या व्यक्तीचे अनुभव असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० जानेवारी २०१६

शब्दांचं भांडण

शब्दांचं भांडण

मनात शब्दांचं भांडण
नेहमीच चालू असतं,
कागदावर उतरण्यास त्यांच
धडपडनं चालूच असतं!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ जानेवारी २०१६

प्रेरणादायी विचार

माणसाच्या हातून चूक ही नेहमी होतच असते. ती चूक समजावून घेऊन पून्हा होऊ नये याची दक्षता घेतल्यास प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० जानेवारी २०१६

प्रेरणादायी विचार

माणसाच्या हातून चूक ही नेहमी होतच असते. ती चूक समजावून घेऊन पून्हा होऊ नये याची दक्षता घेतल्यास प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० जानेवारी २०१६

थांबवा स्रीभ्रूण हत्या

थांबवा स्रीभ्रूण हत्या

स्री म्हणजे धगधगता ज्वाला
कधी सावली प्रेमळ मायेची।।
दुर्गा भवानी अनेक रूपे तिची
कुटूंबाला गरज तिच्याच छायेची।।१।।

न करता स्वतःचा विचार
झटते कुटूंबासाठी दिवस राती।।
अन्याय होऊनही नाते जपतेस
तुला सलाम आहे स्री जाती।।२।।

जर जगली नाही मुलगी
सारेच नाते राहतील अधूरे।।
थांबवा आता स्रीभ्रूण हत्या
नाहीतर कुटूंब होणार नाही पूरे।।३।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ जानेवारी २०१६

पांगळा झाला भारत देश

पांगळा झाला भारत देश

प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनी
प्रमुख पाहुणे असतात अधिकारी।।
तेच अधिकारी इतर दिवशी
भ्रष्टाचार करून भरतात तिजोरी।।१।।

पांगळा झाला भारत देश
व्यर्थ ठरले क्रांतीकारांचे बलिदान।।
दंगली, मारामरी आणतात घडवून
वरून म्हणतात मेरा भारत महान।।२।।

भ्रष्टाचारांच्या घशात येथे जातात
गरिबांसाठी राबवलेल्या कित्येक योजना।।
जनतेच्या भल्यासाठी दिलेला पैसा
कुठे जातो? काहीच समजेना।।३।।

होणार कशी प्रगती देशाची?
मोठा प्रश्न मनातच राहतो।।
श्रीमंत हे श्रीमंतच होतात
गरीब मात्र तसाच राहतो।।४।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ जानेवारी २०१६

पांगळा झाला भारत देश

पांगळा झाला भारत देश

प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनी
प्रमुख पाहुणे असतात अधिकारी।।
तेच अधिकारी इतर दिवशी
भ्रष्टाचार करून भरतात तिजोरी।।१।।

पांगळा झाला भारत देश
व्यर्थ ठरले क्रांतीकारांचे बलिदान।।
दंगली, मारामरी आणतात घडवून
वरून म्हणतात मेरा भारत महान।।२।।

भ्रष्टाचारांच्या घशात येथे जातात
गरिबांसाठी राबवलेल्या कित्येक योजना।।
जनतेच्या भल्यासाठी दिलेला पैसा
कुठे जातो? काहीच समजेना।।३।।

होणार कशी प्रगती देशाची?
मोठा प्रश्न मनातच राहतो।।
श्रीमंत हे श्रीमंतच होतात
गरीब मात्र तसाच राहतो।।४।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ जानेवारी २०१६