Wednesday 28 February 2018

जाऊ तिथे उद्याची आम्ही मशाल लावू

जाऊ तिथे उद्याची आम्ही मशाल लावू
अन् आमुचे दिशांना हे रक्त लाल लावू

तू सांगतेस आता, ' घे रे पुसून डोळे'
आभाळ फाटलेले कोठे रुमाल लावू ?

त्यांचा निकाल केव्हा? जे बोलती सदा की,
"याचा निकाल लावू", "त्याचा निकाल लावू"

रात्री कुशीत माझ्या ही ओळ गात येते
'श्वासात श्वास ओवू! गालास गाल लावू '

घोडे पळून गेले, त्याची तमा न आम्हा
जिंकायला लढाई वाऱ्यास नाल लावू

अमुच्यामध्ये अजोनी हनुमंत वास करतो
सूर्या तुझ्या कपाळी आम्ही गुलाल लावू !

- प्रदीप निफाडकर

Friday 23 February 2018

दूर तू आहेस अन् सुचते न गाणे

दूर तू आहेस अन् सुचते न गाणे
हे असे माझे जिणे लाजीरवाणे

राहिली आजन्म ती येथे कुमारी
भेटला नाही तिला माझ्याप्रमाणे

दान माझे पाहुनी हा कर्ण लाजे
मी फुटाण्यांना दिले साखरफुटाणे

टाकतो विश्वास मी कोणावरीही
भेटणारा वाटतो माझ्याप्रमाणे

गुंफले जेव्हा तिने हे नाव माझे
धन्य झाले पाठ केलेले उखाणे

मी भटांचा कोण आहे काय सांगू!
गझल माझी सांगते माझे घराणे

- प्रदीप निफाडकर

नम्र माझ्या वागण्याने घातला हा घोळ मी

नम्र माझ्या वागण्याने घातला हा घोळ मी
जो मला भेटेल त्याला वाटतो किरकोळ मी

झाड, पक्षी, लाट, वारा लागले नाचायला
फत्त* गुणगुणलो मनाशी एक साधी ओळ मी

मी कुठे बोलेन म्हणुनी जीभ त्यांनी छाटली
पेरला बोटात माझ्या मग विजेचा लोळ मी

दाद रसिकांनी दिली पण ऐकली नाहीच मी
(काय मौनाच्या कुणाचा ऐकला कल्लोळ मी)

ती तिथे नाही सुखी हे मी बरोबर ताडले
फत्त* भिजलेल्या उशीची पाहिली रे खोळ मी

रोज अंगाला चिकटते वैर, मत्सर, वासना
ते धुण्यासाठीच करतो रोजची अंघोळ मी

— प्रदीप निफाडकर

Saturday 17 February 2018

विचार

या जगात सर्वात वेगात धावणारे फक्त माणसाचे विचार आहे. त्याच विचारांचा पाठलाग करत माणूस घडत असतो.

– यल्लप्पा कोकणे
१७ फेब्रुवारी २०१८

माणसाचे विचार

या जगात सर्वात वेगात धावणारे फक्त माणसाचे विचार असतात. त्याच विचारांचा पाठलाग करत माणूस घडत असतो.

– यल्लप्पा कोकणे
१७ फेब्रुवारी २०१८

Thursday 15 February 2018

यश

यशाला गाठण्यासाठी आत्मविश्वास, चिकाटी, इमानदारीने केलेली मेहनत व धैर्य यासारख्या पायऱ्यांची गरज असते.

– यल्लप्पा कोकणे

Monday 12 February 2018

जीवघेणा जुगार होता

अजाणता खोल मी जिथे नेमका बुडालो,
तिथेच कोठेतरी नदीला उतार होता !

खरेच माझा जगावयाचा विचार होता…
खरेच तो एक जीवघेणा जुगार होता !

-  सुरेश भट

Saturday 10 February 2018

परिस्थिती

परिस्थिती ही कधीही सांगून येत नाही. परिस्थितीमुळे आपण बरेच काही शिकतो. परिस्थिती आपली गुरू आहे. हेच सत्य आहे.

-यल्लप्पा कोकणे
११ फेब्रुवारी २०१८

Thursday 8 February 2018

तू माझा स्वर तू माझी लय

तू माझा स्वर तू माझी लय
तू माझ्या गीतांचा आशय…..

पावसात ही लगबग कसली
तोल तुझा जाण्याचे हे वय……

दुनिये तू जिंकलीस कोठे
मी केला माझाच पराजय……

ये मरणा,येरे ये मरणा
मज वाटे ह्या जगण्याचे भय……

– प्रदीप निफाडकर

जिवंत कोण? कुणालाच बातमी नाही

जिवंत कोण? कुणालाच बातमी नाही
दिसे हरेक तरी.. सावली हमी नाही

किती धुवाल तुम्ही रक्त शेवटी अमुचे
पचेल खून असा रंग मोसमी नाही

जपून वेच, फुले ही जनावरांसाठी
अरे, वसंत असा येत नेहमी नाही!

अम्हास रोज तुझे शब्द सांगतो वारा
तुला कळेल.. तुझी शॄंखला घुमी नाही

धनुष्यबाण जरी शोधशोधतो आम्ही
कसे अरण्य! इथे एकही शमी नाही!

दिलास तूच मला तूच हा रिता पेला
नसेल थेंब, तरी धुंद ही कमी नाही!

विचारतेस कशी बावरुन ताऱ्यांना..
घरासमोर तुझ्या चांदण्यात मी नाही!

– (एल्गार) सुरेश भट

कळे न काय कळे एवढे कळून मला

कळे न काय कळे एवढे कळून मला
जगून मीच असा घेतसे छळून मला

तुरुंग हाच मला सांग तू कुठे नाही?
मिळेल काय असे दूरही पळून मला

पुसू कुणास कुठे राख राहिली माझी?
उगीच लोक खुळे पाहती जळून मला

खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले?
तुझा सुगंध कसा ये न आढळून मला?

जरी अजून तुझे कर्ज राहिले नाही
अजून घेत रहा जीवला पिळून मला

उजाडलेच कसे? ही उन्हे कशी आली?
करी अजून खुणा चंढ्र मावळून मला

कधीच हाक तुझी हाय ऐकली नाही
अखेर मीच पुन्हा पाहिले वळून मला

– एल्गार, सुरेश भट

उजाडल्या वरी सख्या निघूनी जा घराकडे

उजाडल्या वरी सख्या निघूनी जा घराकडे,
अजुनही उशीवरी टिपूर चांदणे पडे…
उगीच वेळ सारखी, विचारतास जाय तू,
पून्हा पून्हा मिठीतही शहारतोस काय तू…
अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला,
अजून पाकळ्यातला मरंदही नही संपला…
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे….
अजून थांब लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी…
उजाडल्या वरी सख्या निघूनी जा घराकडे,
अजुनही उशीवरी टिपूर चांदणे पडे…

– एल्गार, सुरेश भट

भल्या पहाटे निघून आले

सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले !
घरातुनी चोरपावलांनी लपून आले.. जपून आले !

तुझ्याच स्वप्नात रात गेली…तुझ्याच स्वप्नात जाग आली…
तुझ्याच स्वप्नात जागणा~या जगातुनी मी उठून आले !

विचारले मी न अंबराला.. विचारले मी न वारियाला …
तुझ्या मिठीचा निरोप आला- मिठीत मी मोहरून आले !

अताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला
आताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून आले

गडे मला बोलता न आले, कुणीकुणी बोललेह नाही…
अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले !

– सुरेश भट

जगलो असाच कसातरी ओठातल्या ओठात मी

जगलो असाच कसातरी ओठातल्या ओठात मी
आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी

झाले कशाचे बोलणे? केले जरा मन मोकळे !
जे राहिले सांगायचे ते टाळले अजिबात मी

माहीतही नाही मला आलो इथे केव्हा कसा
मीही अताशा एकतो ….. दिसलो म्हणे इतक्यात मी

बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली
कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

कुठल्याच दारी मी कधी नेली न कागाळी तुझी
नाराज आयुष्या तुझी घालू कशी रुजुवात मी ?

तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा ? बदनाम झंझावात मी !

मजला असे पाहू नका …. रस्त्यावरी थांबू नका
– धुंडाळतो आहे इथे माझा रिकामा हात मी !

माझ्या भविष्याची मला नाही जराही काळजी
उमटेल मी धरतीवरी ….. चमकेन त्या गगनात मी !

– ” एल्गार”, सुरेश भट

आता उनाड शब्द वळावयास लागले

आता उनाड शब्द वळावयास लागले !
..सारे लबाड अर्थ कळावयास लागले !

केले न मी उगीच गुन्हेगार सोबती
आरोप आपसूक टळायास लागले !

आली पुन्हा मनात नको तीच चिंतने ..
काही मवाळ चंद्र ढळायास लागले !

घायाळ मी असून रणी खूप झुंजलो
ज्यांना न घाव तेच पळायास लागले !

माझ्या मिठीत सांग मला पाप कोणते ?
हे चांदणे व्यर्थ चळायास लागले !

माझ्याच झोपडीस कुठे आग लागली ?
सारे गरीब गाव जळाव्यास लागले !

केलास हा सवाल नवा तू कसा मला ?
आता जुने सवाल छळायास लागले !

कोणी नभात सूर्य विकायास काढला ?
येथे प्रसन्न ऊंन्ह मळायास लागले !

आणू तरी कुठून रडायास आसवे ?
डोळ्यामधून रक्त गळायास लागले !

जात्यात गात गात उडी मीच घेतली …
आयुष्य सावकाश दळावयास लागले

– सुरेश भट

Tuesday 6 February 2018

जीवनाशी मी कुठे तडजोड केली

जीवनाशी मी कुठे तडजोड केली
चित्रगुप्तानेच खाडाखोड केली

बोललो हासून मी तेव्हा तुझ्याशी   
मी कडू माझी कहाणी गोड केली

कोणत्याही संकटाचा दोष नाही
मीच बंद्या सोसण्याची मोड केली

लाभलेली जिंदगी माझी न होती
चार श्वासांचीच मीही तोड केली

व्हायचे ते शेवटी होऊन गेले
मी कशाला व्यर्थ डोकेफोड केली

याचसाठी भेटली नाहीस तूही
मी दिशांशी सारखी  धरसोड  केली

-  प्रदीप निफाडकर

(स्वप्नमेणा)

Monday 5 February 2018

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी,
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी.

वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही
गांजणा-या वासनांची बंधने सारी तुटावी.

संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा
कापलेले पंख माझे ,लोचने आता मिटावी.

सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी.

दूर रानातील माझी पाहुनी साधी समाधी
आसवे सा-या फुलांची रोज खाली ओघळावी.

कोण मी आहे ? मला ठाऊक नाही नाव माझे !
शेवटी माझ्या धुळीने चौकशी माझी करावी.

हे रिते अस्तित्व, माझे शोध शून्यातील वेडा
माझियामागेच माझी सर्व ही ओझी रहावी !

काय सांगावे तुला मी ? काय मी बोलू तुझ्याशी?
राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी !

~सुरेश भट

Sunday 4 February 2018

मी एकटीच माझी असते कधीकधी

मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी

येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला नुसते कधीकधी

जपते मनात माझ्या एकेक हुंदका
लपवीत आसवे मी हसते कधीकधी

मागेच मी कधीची हरपून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी

जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरी
उसवीत जीवनाला बसते कधीकधी

सुरेश भट

राख संभाळून ठेवा

राख संभाळून ठेवा राख झालेल्या घराची
संपली नाही लढाई यार हो नामांतराची....

ह्या भिकारी भामट्यांची जिंदगी आहे कितीशी ?
वाजते जोरात पुंगी चोरलेल्या गाजराची...

संतहो, आम्ही जरी हे जन्मण्याचे पाप केले
लागली नाही अम्हाला लुत रोगी ईश्वराची...

काय न्यायाचा निवाडा एवढा दुर्बोध होता...?
ही कशी आताच झाली मागणी भाषांतराची...?

कालही अंधार होता..आजही अंधार आहे..
काल सूर्यालाच दारे बंद झाली अंबराची...?

चालती रेतीवरी ही मोडकी त्यांची जहाजे
पाहिली कोठे तयांनी लाट साधी सागराची...?

कालच्यापेक्षा दयाळू हा नवा आला कसाई
घालतो गाईस हाडे कापलेल्या वासराची....

जे उद्या होणार त्याचा आज मी आहे पुरावा
घे भविष्या नोंद माझ्या बोलक्या हस्ताक्षराची...

सुरेश भट

Thursday 1 February 2018

तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ?

तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा ?

आज का तुला माझे एव्हढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा ?

हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा ?

बोलली मिठी माझी - ' दे प्रकाश थोडासा'
तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा ?

कालच्या वसंताला ठेवतेस का नावे ?
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा ?

चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ?

- सुरेश भट
(एल्गार)

काही रडून गेले काही हसून गेले

गझल

काही रडून गेले काही हसून गेले
जळताच प्रेत माझे सारे निघून गेले

शेरामध्ये जरासे मी दु:ख मिसळले अन्
'क्या बात..'ओठ त्यांचे हसुनी म्हणून गेले

नाही दुखावले मी कोणासही कधीही
त्यांचेच शब्द सारे वांदे करून गेले

कोणास देत नाही मी दोष कोणताही
आयुष्य एकट्याने अर्धे सरून गेले

होताच छंद माझा नात्यात राहण्याचा
मी संकटात होतो सारे दुरून गेले

– यल्लप्पा कोकणे
३० मार्च २०१८