Sunday, 30 June 2019

ओळख

आपली ओळख वाढवून लोकांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न काहीजण करत असतात आणि आपली ओळख कोणालाही कळू नये अशा विचारांची माणसं नेहमी चुकीच्या मार्गाने चालत असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० जून २०१९

Saturday, 29 June 2019

पाऊस

पाऊस

पावसाने या वेळी जरा
शहाणे होऊन वागावं
मेघांने त्याला सावकाश
कमी वेग ठेवून धाडावं

होणार नाही नुकसान
काळजी दोघांनीही घ्यावी
चांगली आठवण सर्वांच्या
हृदयी कायमची ठसावी

एवढंच तुम्ही लक्षात ठेवा
बाकी काही मागणं नाही
तू चांगला बरस रे पावसा
तुझ्याशिवाय जगणं नाही

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ जून २०१९

गरीबाची अपेक्षा

गर्भ श्रीमंत असणाऱ्याला
पैशाची भुक मोठी असते
पोट भरणाऱ्या गरीबाची
अपेक्षा फार छोटी असते

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ जून २०१९

Wednesday, 26 June 2019

शेवटचा श्वास

शेवटच्या श्वासाचा पाठलाग करत त्याला कैद करून ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आयुष्य जगणं होय.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ जून २०१९

Monday, 24 June 2019

मनावरील जखम

आपलं दुसऱ्याला पटकन बोलून झाल्यावर (मनाला लागणे असं बोलणं) आणि ऐकून घेणाऱ्याची खरी परिस्थिती आपल्या लक्षात येईपर्यंतच्या काळात ऐकून घेणाऱ्या व्यक्तीच्या मनावर फार मोठी जखम झालेली असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ जून २०१९

Sunday, 23 June 2019

वेगवान विचार

सर्वात जास्त वेगवान आपले विचार असतात. विचारांच्या वाटेवर एका वळणावर थांबणे (विचार करायचे थांबणे) फार गरजेचे असते. नाही थांबलो तर मानसिक संतुलन बिघडून मनावर आघात होण्याची दाट शक्यता असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ जून २०१९

Saturday, 22 June 2019

गरजेसमोर आराम हरलेला आहे

आपल्या गरजा इतक्या वाढलेल्या आहेत की त्या पुर्ण करण्यासाठी आपण तब्येतीची काळजी घेत नाही. आपण पैशाच्या मागे धावत असताना निवांतपणा विसरून गेलेलो आहे. असं म्हणायला हरकत नाही की, गरजेसमोर आराम हरलेला आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ जून २०१९

Thursday, 20 June 2019

मनाचा आवाज

इतरांच्या बोलण्याकडे जरी आपण लक्ष देत असलो तरी सुद्धा मनाचा आवाज ऐकल्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही व वैयक्तिक, कौटुंबिक होणारे नुकसान टळून जाते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० जून २०१९

Wednesday, 19 June 2019

महत्त्व

घराला नजर लागू नये व घराचं रक्षण व्हावं म्हणून आपण लिंबू-मिरची आठवडाभर आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर लावतो. शनिवार आला की आपण ते घरातून काढून रस्त्यावर फेकून देतो. याच प्रकारे माणसं माणसांसोबत वागताना दिसतात. वेळ संपल्यावर प्रत्येकाचे महत्त्व हे कमी होताना दिसत आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ जून २०१९

शब्द भाव

मी काहीही बोलत नाही
लेखणी जिंकून जाते डाव
उमटतं मनातलं कागदावर
साथीला घेऊन शब्द भाव

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१५ जून २०१९

Tuesday, 18 June 2019

रंग स्वभावाचे

एका रंगात दूसरा रंग मिसळला तर नवीन तयार होणारा रंग मनाला मोहून जातो पण जेव्हा माणूस त्याच्या स्वभावाचे वेगवेगळे रंग दाखवतो तेव्हा जीवाला खूप त्रास होतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ जून २०१९

Sunday, 16 June 2019

नाजूक शब्द

ओढून ताणून होत नाही
कविता सहज सुचली जाते
नाजूक शब्द फुलून सजतात
म्हणून मनात रूजली जाते

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१५ जून २०१९

तरूण थेंब

रेंगाळत होते मन माझे
देह निवांत पडून होता
बाहेर पडणाऱ्या पावसाचा
प्रत्येक थेंब तरूण होता

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१५ जून २०१९

खोटं बोलणं

माणूस जेव्हा खोटं बोलत असतो तेव्हा त्याचे डोळे इमानदारीने खरे वागत असतात. त्यामुळे खोटं बोलणाऱ्याला जास्त चूका करता येत नाही व पुढे खोटेही बोलता येत नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१५ जून २०१९

Tuesday, 11 June 2019

ऐतिहासिक भुईकोट किल्ला - खर्डा

    दिनांक ११ जून २०१९ रोजी ऐतिहासिक भुईकोट किल्ला (शिवपट्टण, खर्डा, जिल्हा अहमदनगर) पाहण्याचा योग आला. हा किल्ला सुलतानराव निंबाळकर यांनी बांधला असून सुलतानराजे निंबाळकर हे या किल्ल्याचे शेवटचे शासक होते. जामखेड तालुक्यातील शिर्डी-हैदराबाद महामार्गाने नगर जिल्ह्यात प्रवेश करताना भव्य तटबंदी असलेला खर्डा उर्फ शिवपट्टण उर्फ सुलतानगड भुईकोट किल्ला तीन एकरमध्ये पसरलेला आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर एक पर्शियन शिलालेख आहे. एक विशेष म्हणजे मुख्य दरवाजाच्या डाव्या आणि ऊजव्या बाजूला खालून सातव्या क्रमांकावर अखंड कोणा असलेले दोन दगड आहे. कोना असलेले फक्त दोनच दगड का? याचे उत्तर मिळाले नाही.
    पहील्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर उजवीकडे गडाचा साधारण तिस-चाळीस फुट उंचीचा मुख्य दरवाजा असुन या दरवाज्यावर मराठीतील एक शिलालेख आहे. या शिलालेखानुसार हा किल्ला १७४३ मध्ये सरदार सुलतानराव निंबाळकर यांनी बांधला. मुख्य प्रवेशद्वाराला भला मोठा लाकडी दरवाजा होता. दरवाजावर मोठमोठे धारदार लोखंडी आवरण होते. तो दरवाजा अशा पद्धतीने बनवला गेला होता कि, कितीही मोठ्या ताकतीने तो दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न अयशस्वी ठरणारा होता. पण आता तो दरवाजा येथे नाही. स्थानिक लोकांनी तो दरवाजा नष्ट केल्याचे स्थानिकांकडूनच समजले.  दरवाजातून आत प्रवेश केल्यावर संपूर्ण किल्ला व त्यातील मोकळे मैदान दिसते. किल्यात शिरल्यावर समोर एक मशीद आहे. या मशीदीचे बांधकाम औरंगजेब यांनी केले आहे. त्यावर जामा मशीद असा उल्लेख असणारा पर्शियन शिलालेख आहे. स्थानिक रहिवाशांकडून अशी माहिती मिळाली की, आताच्या काळात तेथे राहणारे स्थानिक मुस्लिम नमाज पडायला त्या मशिदीत येत असंत. हळूहळू त्या किल्यावर मुसलमांचा हक्क दाखवण्याचा प्रयत्न होत होता. भविष्यात हा किल्ला मुस्लिमांनी काबीज करू नये म्हणून स्थानिक रहिवाशांनी मुस्लिमांना किल्यात जाण्यास प्रवेश बंद केला.
मशिदीसमोर तोफेचा एक भाग पडलेला आहे. खुप जणांनी त्या तोफेचा भाग तेथून हलविण्याचा प्रयत्न केला पण तो तोफेचा भाग तेथून हलविता येत नाही. खुप प्रकारे प्रयत्न करून, हवी तेवढी ताकद वापरून प्रयत्न केले पण तो तोफेचा भाग तेथून हलविता आला नाही. कित्येक वर्षे ती तोफ पावसात, उन्हात आहे. त्या तोफेला अजूनही काही झाले. मशिदीच्या मागे एक विहीर आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली दगडाने बांधलेली चिरेबंदी व सुस्थितीत असलेली बारव पहायला मिळते. ही बारव किल्ल्यातील पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे. गोलाकार आकाराच्या १२० फुटापेक्षा जास्त खोल असणाऱ्या या विहिरीच्या वरील बाजूस पाणी उपसा करण्यासाठी दगडी मोट असून पाणी जास्त खोल गेल्यास विहीरीत उतरण्यासाठी दुसऱ्या बाजूने विहीरीच्या मध्यापर्यंत दगडी जिना आहे. साधारण ४० पायऱ्या उतरल्यावर विहिरीच्या आतील बाजुस ५x५ आकाराची खोली असुन तिला विहिरीच्या बाजूने कमान आहे.
किल्ल्याच्या आत उजवीकडे तटबंदीवर जाण्यासाठी जिना आहे. यावर चढून किल्ल्याच्या पुर्ण तटबंदीला फेरफटका मारता येतो. तटावर ये-जा करण्यासाठी तटबंदीमध्ये ठिकठिकाणी पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरताना खंदक (पाण्याचा वेढा) व रेवणी यांच्यात असणाऱ्या परकोटात ढासळलेले लहान आठ बुरूज व तटबंदी आजही काही प्रमाणात पहायला मिळतात. उरलेले बुरूज मात्र पुर्णपणे नष्ट झाले आहेत. तटावरून बंदुकीचा मारा करण्यासाठी अशी व्यवस्था होती की एका छिद्रांतून चार दिशेने बंदुकीचा मारा करता येतो. व काही ठिकाणी एका छिद्रांतून एकाच दिशेने बंदुकीचा मारा करता येतो. हे छिद्र अशा पद्धतीने बांधले होते की, गडाच्या पायथ्याशी उभे राहिलेल्या शत्रूंना त्या छिद्रांचा अंदाजही येत नव्हता. किल्ल्याच्या बाहेरच्या चारी बाजूने पाण्याचा वेढा घातला होता. त्याला खंदक असे म्हणतात. शत्रू किल्ल्याच्या दिशेने येताना त्या खंदकातून यावे लागत असे. तेथे आल्यावर पाण्याचा आवाज येत असतं व तो आवाज आल्यावर गडावर सर्वच सतर्क राहत असतं. गडावरून खाली पाहिल्यावर रावठ्या (राहण्याचे ठिकाण) दिसतात. या रावठ्या अशा पद्धतीने बांधल्या आहेत की शत्रूला याचा अंदाजही येत नव्हता. चारी बाजूने बुरूद (किल्यावरून सर्वच ठिकाणी पाहता येईल अशी जागा) आहे.
खर्डा हे खर्ड्याची लढाई या ऐतिहासिक घटनेसाठी प्रसिद्ध आहे. हैदराबादचा निजाम व मराठ्यांमध्ये ११ मार्च १७९५ रोजी लढाई झाली. या लढाईत मराठ्यांच्या फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला. पेशवे, दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या फौजांनी मार्च १७९५ मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले. मराठ्यांनी निजामावर आक्रमण केल्यावर निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली परंतु ब्रिटिशांनी मदत नाकारली आणि खर्डा येथे ही निर्णायक लढाई झाली. मराठ्यांशी उघड्या मैदानावर तोंड देण्याचे टाळत निजामाने खर्डा किल्ल्याचा आश्रय घेतला. मराठ्यांनी खर्ड्याच्या किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ल्याला होणारी रसद थांबवून तटबंदीभोवती तोफा रचल्या. शेवटी निजामाने १३ मार्च १७९५ रोजी तह करुन लढाईतून माघार घेतली. या लढाईत मालोजी घोरपडे, दौलतराव शिंदे, सवाई माधवराव पेशवे नागपूरचे रघुजीराजे भोसले आणि खर्डा येथील जहागीरदार सरदार सुलतानराजे निंबाळकर’ यांनी पराक्रम गाजविला आणि निजामाला धूळ चारली.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ जून २०१९











Saturday, 8 June 2019

चूक नसतानाही

आपली चूक नसतानाही आपल्यावर रागवलं जातं. त्यावेळी त्याचं जास्त वाईट वाटतं. रागावणाऱ्या व्यक्तीला आपल्यावर आलेल्या परिस्थितीचा काहीच अंदाज नसतो म्हणून चूक नसताना चूक झाली असं समजणाऱ्या व्यक्तीचं बोलणं मनात घर करून जातं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ जून २०१९

Friday, 7 June 2019

निर्णय

परिवारातील कोणत्याही सदस्यांचा विचार न ऐकता घेतलेला निर्णय कधी कधी आपल्याच परिवाराला फार घातक असू शकतो. आपसात चर्चा केल्यावर बरेच प्रश्न मार्गी लागू शकतात. मोठे संकट टळू शकते. म्हणून कोणावरही आपला निर्णय लादण्याच्या अगोदर एकदा परिवारातील सदस्यांशी चर्चा करावी.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ जून २०१९

Thursday, 6 June 2019

उंच विचार

जगात सर्वात उंच दुसरं तिसरं काही नसून उंच हे आपले विचार असतात. त्याच विचारांच्या जोरावर माणूस उंची गाठतो. मग ती चांगल्या कामात असो वा वाईट कामात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ जून २०१९

Tuesday, 4 June 2019

आत्महत्या

परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आणि विचार करणं बंद होऊन जीव नकोसा झाल्यावर शेवटचा पर्याय म्हणून माणसं "आत्महत्या" करतात आणि कुटूंबाला पोरकं करतात. खरं तर "आत्म" परिक्षण करत वाईट परिस्थितीची "हत्या" करून त्यावर विजय मिळवायचा प्रयत्न करायचा असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ जून २०१९

Monday, 3 June 2019

तहानलेली माणसं

काहीजण नदीचं पाणी दूषित करतात म्हणून नदी आपला मार्ग कधीच बदलत नाही. कारण त्या नदीला ठाऊक असतं की पुढच्या वळणावर तहानलेली माणसं आपली वाट पाहत असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ मे २०१९