Monday 28 February 2022

परिस्थिती

आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्याचे मुख्य कारण म्हणजे आपण केलेले विचार व त्या विचारावर केलेली कृती आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०१ मार्च २०२२

Sunday 27 February 2022

आदर

मोजकं आणि महत्वाचं बोलून मोकळं व्हावं. आपण एकच गोष्ट सारखी वाढवून सांगितल्यास आपल्याबद्दल आदर कमी होऊन आपल्याला टाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२८ फेब्रुवारी २०२२

प्रसिद्धी

क्षणाची प्रसिद्धी जेथे असते तेथे कला रसिकांच्या मनाला 'भावलेली' असते आणि जेथे कायमची प्रसिद्धी असते तेथे कला रसिकांच्या काळजात 'रूतलेली' असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२७ फेब्रुवारी २०२२

Saturday 26 February 2022

विचारांशी गप्पा

विचारांशी गप्पा

    शेवटच्या श्वासापर्यंत एकच जीवलग आपल्यासोबत असतो, तो म्हणजे 'विचार'. रोज अनेक विचार आपल्याला मिठी मारून जातात. मग ते विचार चांगलेही असतात व वाईटही असतात. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की आपल्या मनात एका दिवसात साठ हजारांहून अधिक विचार येत असतात. त्यातले वाईट किती व चांगले किती हे बाह्य मन ठरवते व ते ठरवलेले विचार अंतर्मनाकडे सत्यात उतरविण्यास पाठवत असतात. वयानुसार विचार बदलतात आणि विचाराने माणूस घडतो. मनात चालणाऱ्या विचारांशी गप्पा मारत आपल्याच जगात वावरत असताना दुर दुरचा प्रवास अगदी लवकर संपतो अशी नेहमीच जाणीव होत असते. ती जाणीव होणं स्वाभाविक आहे कारण एका एका विचारात आपण इतकं गुंतलेले असतो की त्याची सुटका आपल्याला भान आल्यावर होत असते. विचार म्हणजे एक प्रकारचा अडकित्ताच आहे. विचारांमध्ये अडकलेल्या व्यक्तीचा पार भुगा होऊन जातो.
    आपल्या नावाला, आपल्या अस्तित्वाला समाजात टिकून ठेवण्याचं काम आपले विचार करीत असतात. कारण आपल्या विचारांचे परिणाम सर्वत्र उमटत असतात. आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्याचे मुख्य कारण म्हणजे आपण केलेले विचार व त्या विचारावर केलेली कृती आहे. आपल्या विचाराने समाजाला शहाणे करण्याचं काम हे विचारांच वेड लागलेली माणसंच करू शकतात. अशी विचाराची वेड लागलेली माणसं समाजाच्या प्रगतीसाठी असणं गरजेचं आहे. माणूस घडतो आणि बिघडतोही फक्त विचारांमुळेच. या गोष्टीचा विचार करूनच आपण विचार करायला हवा. आपल्याला घडायचे आहे की आपले स्वतःचे नुकसान करून घ्यायचे आहे हा निर्णय वेळेवर घेता आला पाहीजे. ठराविक वेळेत कोणत्या विचाराने आपल्या मनात प्रवेश केला पाहीजे याचेही नियम असायला हवे. असे असल्यास माणसाची 'चिंता' वाढणार नाही. चांगल्या क्षणी मनात वाईट विचार येत असतात आणि शुभ कार्य होता होता राहून जातं. कोणताही विचार करायला अडथळा येत नाही पण जे विचार केलं आहे ते पूर्ण करण्यास कोणकोणते अडथळे येऊ शकतात याचाच विचार मनात घोळत असतो. अशा विचारातून कोणीही सुटू शकत नाही. मनात आलेल्या एका विचारावर हजार वेळा विचार करणे हे कधीही हितकारक असतं. चांगले विचार हे चांगलेच असतात पण वाईट विचारांवर चांगला विचार केला तर सुरक्षित मार्गही सापडतो.
    मनातील विचार आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करीत असतात. त्यासाठी वाईट विचार मनात न आणता चांगला विचार करण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे स्वतःला व आपल्या माणसाला त्रास होत नाही. आपल्याला त्रास होईल असे विचार करणे थांबवून चांगले विचार केल्यास शरीरात एक सकारात्मक ऊर्जा वाहू लागते. त्यामुळे भविष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. सर्वात जास्त वेगवान आपले विचार असतात. विचारांच्या वाटेवर एका वळणावर थांबणे (विचार करायचे थांबणे) फार गरजेचे असते. नाही थांबलो तर मानसिक संतुलन बिघडून मनावर आघात होण्याची दाट शक्यता असते. चालताना पायात खडा अडकला की व्यवस्थित चालणे होत नाही. तो खडा बाजूला केल्यावर आपण न अडखळता चालायला लागतो, याचप्रमाणे मनाला टोचणारे विचार काढून फेकून दिल्यावर अस्वस्थता कमी होते. वर्तमानात आपली जी परिस्थिती आहे, आपण जे जीवन जगतो आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे आपले विचार आहे. आपल्या मनात जर कमी विचार असतील तर त्यावर तोडगा लगेच सापडतो आणि जर मनात खूप विचार साठवून ठेवले असतील तर त्या विचारांचा पूर येतो व आपलं जगणं वाहून जातं. सर्वात उंच दुसरं तिसरं काही नसून उंच हे आपले विचार असतात. त्याच विचारांच्या जोरावर माणूस उंची गाठतो. मग ती चांगल्या कामात असो वा वाईट कामात. वेगात धावणारे फक्त माणसाचे विचार असतात. त्याच विचारांचा पाठलाग करत माणूस घडत असतो. माणसातलं माणूसपण संपलं कि संशयाला जागा मिळते. नाती दुरावली व दुखावली जातात. म्हणून अंतरमनाने विचार करून खरे कोण आणि खोटे कोण हे जाणून घेणे फार गरजेचं असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२६ फेब्रुवारी २०२२

Friday 25 February 2022

तडजोड

नाती जपताना तडजोड करावी लागते. त्या तडजोडीत सुरुवातीला आपल्याला त्रास जरी झाला तरी शेवट गोड असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२६ फेब्रुवारी २०२२

Thursday 24 February 2022

अडथळा

कोणताही विचार करायला अडथळा येत नाही पण जे विचार केलं आहे ते पूर्ण करण्यास कोणकोणते अडथळे येऊ शकतात याचाच विचार मनात घोळत असतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२५ फेब्रुवारी २०२२

श्रद्धांजली

गझल : श्रद्धांजली

संपून राख गेली , हाडे विकून गेली !
ते मागतात आता आपापली दलाली !

गेली निघून मंदी, आली फिरून  तेजी  ,
केल्या सटोडियांनी वेगात हालचाली

त्यांच्या जुन्या फडाची आली नवीन बारी ,
सारी नवीन गाणी ! साऱ्या  नवीन चाली !

हे चेहरे कुणाचे नाहीत ओळखीचे ?
काही जुने लफंगे ! काही नवे मवाली !

नाही मुळी तसा तो ओसाड राजवाडा ,
आहेत राजवंशी तेथे अजून पाली !

आम्हांस हुंदक्यांचा धंदा जरी जमेना ,
त्यांच्याच आसवांची वाहे तुडुंब नाली  !

नाही दिला फुकाचा त्यांनी विनम्र खांदा ,
ते प्रेत वाहण्याची आता घेती हमाली !

कंटाळले जसे ते गाऊन शोकगीते ,
आली त्यांच्या ओठांवरी कवाली !

त्यांनाच हाक मारा पिंडासही शिवाया !
त्यांचा 'खुराक' आता त्यांच्या करा हवाली !

त्यांनी दिवंगताची  केली कशास पूजा ?
पेल्यामध्येच त्यांची श्रद्धांजली बुडाली !

त्यांनी हिशेब केला तेथेच लाकडांचा 
त्यांना कमावण्याची संधी पुन्हा मिळाली !

गझलसम्राट : सुरेश भट

Wednesday 23 February 2022

चिंता

ठराविक वेळेत कोणत्या विचाराने आपल्या मनात प्रवेश केला पाहीजे याचेही नियम असायला हवे. असे असल्यास माणसाची 'चिंता' वाढणार नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२४ फेब्रुवारी २०२२

Tuesday 22 February 2022

अस्तित्व

आपल्या नावाला, आपल्या अस्तित्वाला समाजात टिकून ठेवण्याचं काम आपले विचार करीत असतात. कारण आपल्या विचारांचे परिणाम आपल्या वागण्यातून सर्वत्र उमटत असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२३ फेब्रुवारी २०२२

Monday 21 February 2022

कर्तृत्व

नेहमी आपल्या विरोधात असणाऱ्यांनी सुद्धा आपले गुणगान गायला हवे इतके कर्तृत्व आपले असायला हवे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२२ फेब्रुवारी २०२२

Sunday 20 February 2022

विचारांशी गप्पा

मनात चालणाऱ्या विचारांशी गप्पा मारत आपल्याच जगात वावरत असताना दुर दुरचा प्रवास अगदी लवकर संपतो अशी नेहमीच जाणीव होत असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२१ फेब्रुवारी २०२२

Saturday 19 February 2022

गैरसमज आणि आनंदोत्सव

एखाद्यासाठी राखून ठेवलेली चांगली गोष्ट ज्याची आहे त्याला वेळेअगोदर समजल्यावर 'गैरसमज' होतो आणि हजार प्रश्न ऐकावे लागतात. ती गोष्ट वेळेवर समजल्यास लक्षात राहणारा 'आनंदोत्सव' होतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२० फेब्रुवारी २०२२

Friday 18 February 2022

बाप

पाय कितीही झिजले तरी
बापाला फरक पडत नाही
मुलासाठी चाललेली धाव
अडथळ्यातही अडत नाही

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१९ फेब्रुवारी २०२२

शब्दांचे चटके

शांत मन ठेवून थंड डोक्याने संभाषण केल्यास समोरील माणसाला शब्दांचे चटके बसत नाही.

 यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१९ फेब्रुवारी २०२२

Thursday 17 February 2022

विचाराचं वेड

आपल्या विचाराने समाजाला शहाणे करण्याचं काम हे विचाराचं वेड लागलेली माणसंच करू शकतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१८ फेब्रुवारी २०२२

Wednesday 16 February 2022

सिध्द

प्रसिद्ध व्यक्तीची ओळख सांगून जगण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करून जगता यायला हवं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१७ फेब्रुवारी २०२२

Tuesday 15 February 2022

माणसाची ओळख

माणसाची ओळख जिवंत असताना 'माणूस' म्हणून असते आणि मेल्यावर फक्त 'बाॅडी' म्हणून राहते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१६ फेब्रुवारी २०२२

Monday 14 February 2022

मनाला टोचणारे विचार

चालताना पायात खडा अडकला की व्यवस्थित चालणे होत नाही. तो खडा बाजूला केल्यावर आपण न अडखळता चालायला लागतो, याचप्रमाणे मनाला टोचणारे विचार काढून फेकून दिल्यावर अस्वस्थता कमी होते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१५ फेब्रुवारी २०२२

Sunday 13 February 2022

वेळ

एक 'वेळ' अशी येते की ज्यांनी आपल्याला वेळेवर काटेकोरपणे जगायला शिकवलं त्यांच्याकडे वेळ संपल्यावर आपलं दुर्लक्ष होतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१४ फेब्रुवारी २०२२

Saturday 12 February 2022

स्वतःशी संवाद

स्वतःशी संवाद साधणाऱ्या माणसाकडून चूका फार कमी होतात कारण कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हे नेहमीच बरोबर असते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१३ फेब्रुवारी २०२२

Friday 11 February 2022

घड्याळ आणि दिनदर्शिका

जगात एकमेव 'घड्याळ आणि दिनदर्शिका' असे आहेत की ते कोणाच्याही धाकात न राहता जगाला काटेकोरपणे जगायला शिकवतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१२ फेब्रुवारी २०२२

Thursday 10 February 2022

चेहर्‍यावरचा आनंद

चेहर्‍यावर आनंद झळकला की माणसं सुंदर दिसतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
११ फेब्रुवारी २०२२

Wednesday 9 February 2022

मनाचे नियम

मनावर नजर ठेवून नियम आखून दिले की त्याला कुठेही भरकटता येत नाही.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१० फेब्रुवारी २०२२

Tuesday 8 February 2022

समाधान

"कोणी कसे वागावे" याची चर्चा करून स्वतः ला त्रास करून घेणारी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात कधीच समाधानी नसते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०९ फेब्रुवारी २०२२

Monday 7 February 2022

विचारांचे सौंदर्य

मनाच्या विचारांचे सौंदर्य जितके सुंदर असेल तितकेच सुंदर जग दिसायला लागतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०८ फेब्रुवारी २०२२

Sunday 6 February 2022

वेदनेची सवय

एखाद्या दुःखाची, वेदनेची सवय झाली की त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं त्यामुळे त्याचं असणंही कमी होऊन जातं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०७ फेब्रुवारी २०२२

लता मंगेशकर

लता मंगेशकर 

सतत असतो गाण्याचा साठा
मनाच्या कोपर्‍यात साठलेला
लताताईच्या आवाजाचा सुर
कायमचाच हृदयात दाटलेला

प्रत्येकाच्या सुख दुःखातही
जिवंतच ठेवलं प्रत्येक गाणं
मन कधी स्विकारणार नाही
सुराच्या जगातून ताईचं जाणं

दाटून येतो कंठ हा नेहमीच 
तुमच्या आठवणीत जुळे कर
अमर झाले प्रत्येक सुर ताल
सलाम तुम्हास लता मंगेशकर 


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०६ फेब्रुवारी २०२२

Saturday 5 February 2022

जाणीव

स्वतःमधून बाहेर पडून दुसर्‍यात शिरता आले की, "आपल्याला इतरांशी कसे वागावे लागेल" याची जाणीव होते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०६ फेब्रुवारी २०२२

Friday 4 February 2022

मनस्थिती आणि परिस्थिती

आपला त्रास कोणाला होऊ नये असे विचार करणे ही "मनस्थिती" आहे आणि लोकं आपल्या मनाविरुद्ध वागताना आपल्याला त्रास होतो ही "परिस्थिती" आहे.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०५ फेब्रुवारी २०२२

Thursday 3 February 2022

विचारांच्या सान्निध्यात

विचारांच्या सान्निध्यात "त्रस्त" होण्यापेक्षा आवडत्या कामात "व्यस्त" राहणे केव्हाही चांगलेच. 


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०४ फेब्रुवारी २०२२

Wednesday 2 February 2022

मनातली भीती

रोज नवनवीन अनुभव घेऊन जगण्यासाठी मनातल्या भीतीला मारावं लागतं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०३ फेब्रुवारी २०२२

Tuesday 1 February 2022

आरसा

असं म्हणतात कि, "आरसा कधीच खोटं बोलत नाही", पण तोच आपल्याला आपलीच प्रतिमा उलट दाखवतो तेही तितकेच खरं आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०२ फेब्रुवारी २०२२