Thursday 26 January 2017

प्रेरणादायी विचार

प्रेरणादायी विचार

प्रयत्न तर सर्वच जण करतात पण जो प्रयत्न करताना आलेल्या
अपयशाचे कारण शोधून पुन्हा नव्या व वेगळ्या मार्गाने सुरुवात करतो तो यशस्वी होतोच.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ जानेवारी २०१७

Monday 23 January 2017

प्रेरणादायी विचार

प्रेरणादायी विचार

नकारात्मक विचाराला संपवण्याची ताकत ही फक्त स्वतःवर ठेवलेल्या विश्वासात असते. स्वतःवर विश्वास ठेवला की चांगल्या गोष्टी सहजच घडून जातात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ जानेवारी २०१७

Thursday 19 January 2017

निसर्गाचा नाश

हिरवळ नष्ट होऊन
ओसाड वाढत आहे
निसर्गाचा नाश करून
माणूस जगत आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ जानेवारी २०१७

हवा हवासा वाटणारा हा ऋतू

हवा हवासा वाटणारा हा ऋतू
आज नको नकोसा वाटत आहे
क्रूरपणे वागतो आपण त्याच्याशी
म्हणून तो आपल्यावर रागवत आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ जानेवारी २०१७

Saturday 14 January 2017

तरूणांनो जागे व्हा

तरूणांनो जागे व्हा....

    नेहमी प्रमाणे कामावर दुपारच्या जेवणानंतर मी व माझे सहकारी गप्पा मारत होतो. शक्यतो या वेळेत आम्ही कामाच्या गोष्टींचा विषय टाळतो. आज एकाने महाराष्ट्रातील वाढत्या लोकसंख्या याबद्दल प्रश्न उपस्थित केला. बाहेरून येणारे लोंढे, त्यांच्यामुळे होणारा त्रास या विषयी तो बोलत होता. बाहेरच्या राज्यातुन येणारे लोक हे व्यवसाय, धंदा करून आपलं स्थान आपल्या राज्यात पक्के करतात. त्यामुळे आपल्या अडचणीत भर पडली आहे. असं बरंच काही तो बोलत असताना कोणास ठाऊक माझ्या रागाचा पारा चढत होता. त्याचं कारणही तसच होतं. समजा एखादी अनोळखी व्यक्ती आपल्या घरात शिरते व त्या घरावर आपला हक्क दाखवु लागते तेव्हा तुम्ही काय कराल? सहाजिकच, काही विचार न करता तुम्ही रागाच्या भरात तुमच्या पद्धतीने त्याला धडा शिकविणार व वेळ न दवडता त्याला घराच्या बाहेर काढणार. हाच विचार जर तुम्ही आपल्या स्थानिक विभागाबद्दल, राज्याबद्दल कराल तर बराच मोठा फरक पडेल.
    कामावरून रात्री घरी परतताना बदलापूर स्टेशन पासून सोनिवली रोड ला जाण्यासाठी रिक्षात बसलो. आश्चर्य आहे तिथेही प्रवाशाने तोच विषय काढला. रस्त्यावर ऊभा असणाऱ्या एका मलाई कुल्फी विक्रेत्याकडे पाहून रिक्षा चालक व प्रवासी यांच्यात त्याच्या बद्दल चर्चा सुरू झाली. रिक्षा चालक त्याच्या बाजूने व प्रवासी त्याच्या विरोधात बोलत होता. ती चर्चा ऐकताना मी माझ्या रागावर ताबा धरून त्यांचं बोलणं ऐकत होतो. रिक्षा चालकाचं म्हणणं होतं की महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येतात, कुठेतरी भाड्याच्या घरात राहतात व मेहनत करून कमावतात. असे कमावतात की स्थानिकांनाही लाज वाटेल. रिक्षात बसलेल्यांचं म्हणणं होतं की बाहेरून येणाऱ्या अमराठी लोकांमुळे आपल्याला त्रास होतो. याबद्दल मला असं म्हणायचं आहे की यात कसला त्रास आहे जो मेहनत करतो तो कमवतो आणि तो जगतो. एवढाच त्यांचा तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हीही तुमची कला दाखवा किंवा काहीतरी करून दाखवा. जर महाराष्ट्राच्या बाहेरून येणारे अमराठी लोक आपले स्थान महाराष्ट्रात पक्के करतात मग आपण तर स्थानिक आहोत. आपणही आपली जिद्द दाखवली पाहिजे. तरूण पिढी म्हणते की बेरोजगारी वाढली. नोकऱ्या नाही मिळत. नोकरी असली तरी पगार कमी असतो.  ठीक आहे ना मग नोकरी शोधता शोधता किंवा करता करता स्वतः चा व्यवसायाचा देखील विचार करावा. नोकरी नसेल तर आपल्याला ज्या धंद्याबद्दल / व्यवसायाबद्दल माहीती आहे तर तो धंदा/व्यवसाय करावा कींवा एखाद्या आवडत्या धंद्याची/व्यवसायाची माहीती गोळा करून त्यात यशस्वी झालेल्या व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊन व्यवसायाला सुरूवात करावी असे मला वाटते. स्पर्धा खुपच वाढत आहे या स्पर्धेत बेरोजगारांनी भाग घेऊन यशस्वी बदल करून दाखवलं पाहीजे असं मला मनापासून वाटतं. बेरोजगार ही एक समस्या आहे आणि जर तरूणांनी मनावर घेतलं तर ते ही समस्या सहजच सोडवू शकतील. तरूणांना योग्य ते मार्गदर्शन करणारी व्यक्ती मिळणे हा ही एक महत्वाचा भाग आहे. यात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास. तरूणांमध्ये आत्मविश्वास हा थोडातरी निर्माण झाला की समजा तरूणांने अर्ध युद्ध जिंकलेलं आहे. जितका जास्त आत्मविश्वास तितकीच ती व्यक्ती यशस्वी होत जाते.
    तरूणांनो तुम्हाला सांगतो मनात एक पक्का निर्धार करा व प्रथम स्वतः मध्ये बदल करून घ्या. स्वतः बदला महाराष्ट्र घडवा. काही तरूण तर लवकर धीर सोडतात. चांगलं उच्च शिक्षण घेऊनही तरूणवर्ग नोकरीसाठी वणवण भटकत आहे. नोकरी जरी मिळाली तरी ती मनासारखी नसते. पगार फार कमी असतो. काहीजण तर अक्षरशः दबावाखाली काम करतात. अशा कामाचा काय फायदा की जो ना मन शांती देत ना कसले सुख देत. मिळेल ती नोकरी करण्याची जर तरूणाने तयारी दाखवली तर बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल असे मला वाटते.
    सव्वीस वर्षांपूर्वी, १९९१ साली महाराष्ट्रात नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या ३१ लाख ६० हजार एवढी होती. आता डिसेंबर २०१५ अखेर नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या तब्बल ३४ लाखांवर पोहोचली होती. हे असं का होत आहे? बेरोजगाराची संख्या का वाढते आहे? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातले सुमारे ५५% लोक २९ वर्षाच्या खालचे आहेत, आणि सुमारे २८% लोकसंख्या १५ ते २९ या वयोगटातच मोडते. ही तरूण पिढी आज नोकरी-व्यवसायाच्या शोधात आहे. भारतात सगळ्यात कमी बेरोजगारी गुजरात मध्ये आहे १.२ टक्के म्हणजेच गुजरात मध्ये दर हजार व्यक्ती मागे १२ व्यक्ति बेरोजगार आहेत. महाराष्ट्रात २८ तर कर्नाटकात १८. सिक्किम व हिमाचल प्रदेशात सर्वात जास्त बेरोजगारी आहे. तिथे प्रमाण हजारामागे १०० पेक्षा जास्त आहे. भारतातील ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारी ४ ते ५ टक्के आहे.तर शहरीभागात ५ टक्के आहे.
    एक महत्वाची बाब म्हणजे संधी. प्रत्येकाला संधी मिळत असते. काहीजण संधीच सोनं करतात व काहीजण संधीचा लाभही घेत नाहीत. मग नंतर वेळ निघून गेल्यावर दोष देत बसतात. तरूणांकडून त्यांच्या पालकांना व राज्याला/ देशाला बऱ्याच अपेक्षा असतात. तरूणांनी उद्योग / व्यवसाय याबद्दल माहीती देणाऱ्या व रोजगारासाठी पैसा (कर्ज) पूरविणाऱ्या संस्थाचीं माहीती गोळा करावी व वेळ वाया न घालवता धंदा/ व्यवसाय करावा. वाढती लोकसंख्या, स्थलांतर, स्थानिक बेरोजगारी यामूळे महाराष्ट्रात गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी तरूण पिढीने या सर्व गोष्टींचा विचार करावा व मनात जिद्द बाळगून  व्यवसाय/ धंदा करावा. कधी कधीतर मला असं वाटतं की आळस हा तरूणांचा मित्रच बनला आहे. मला एकच म्हणायचं आहे की तरूणांनो जागे व्हा. शरीरातील आळस झटकून कामाला लागा. आळस हा शत्रू आहे त्याला शत्रूच राहू द्या. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही भविष्य आहात. काहीतरी करून दाखवा व स्वतः मध्ये बदल करून महाराष्ट्रासहीत भारत देश घडवा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ जानेवारी २०१७ 

Friday 13 January 2017

सावरताना स्वतः चा तोल जेव्हा

सावरताना स्वतः चा तोल जेव्हा
मोजकेच आधार देऊन जातात
कळत आणि नकळत काहीजण
स्वतःचा स्वार्थही साधून जातात

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ जानेवारी २०१७

Monday 9 January 2017

घेतो मदत फक्त श्वासांची

विश्वास नाही आता कोणावर
भीती वाटते मज जगण्याची
मनं मेल्या माणसात राहताना
घेतो मदत फक्त श्वासांची

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ जानेवारी २०१७

Saturday 7 January 2017

माणसं वाचण्याचा छंद जोपासला

फसवणूक करतील कधी कोणी
नाही कोणाचाही भरवसा कसला
बचाव स्वःताचा करण्यास म्हणून
माणसं वाचण्याचा छंद जोपासला


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ जानेवारी २०१७

Thursday 5 January 2017

नजरा बोलू लागतात

नसता समोर जेव्हा कधी
नजरा तिला शोधू लागतात
अचानक समोर आल्यावर
फक्त नजरा बोलू लागतात

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ जानेवारी २०१७ 

Tuesday 3 January 2017

जगण्याचं भान

आज बऱ्याच दिवसांनी तिने
माझ्यावर नजरेची तोफ चालवली
शांत झालेल्या युद्धाला पुन्हा
तिनेच सुरूवात करून दिली

बऱ्याच वेळा मागे पाहण्याचा
ती बहाणा शोधत होती
भासत होतं असं की ही
वादळा पूर्वीची शांतता होती

मनात प्रश्न सारखा घुटमळतो
तिच्यावर मन का जडलं आहे?
रोखुन धरलेल्या तिच्या नजरेमुळे
जगण्याचं भान हरवलं आहे

रात्रीची झोप कमी होऊन
दिवसा झुरणं वाढलं आहे
दुरच ऊभा राहून फक्त
चेहरा वाचणं वाढलं आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ जानेवारी २०१७ 

Sunday 1 January 2017

नवीन वर्षाचे स्वागत

झाले सुरू नवीन वर्ष
जुने वर्ष सरून गेले
चांगल्या वाईट आठवणीसह
भुतकाळी मन रमून गेले

काय गवसले काय हरवले
हिशेब काही लागत नाही
वर्षभराच्या दुःखा समोर
सुख काही जाणवत नाही

विसरून जाऊ वाईट आठवणी
नवीन संकल्पनांचे करता स्मरण
करूया स्वागत नवीन वर्षाचे
नवीन विचारांचे करून चिंतन

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ जानेवारी २०१७ 

दिनदर्शिका

दिनदर्शिका प्रत्येकाच्या घरोघरी
भिंतीवर असते नेहमी टांगलेली
महत्व तिचं कायमच आहे
जणू जिवनाचा भाग असलेली

सुखाची असो वा दुःखाची
देते करून ती आठवण
तिला पाहता गत वर्षाची
मनात कायम राहते साठवण

नको असलेले, हवे असलेले
दिवस दिनदर्शिकाच दाखवते
मैत्रीण आहे की वैरीण ती
हे सर्व तिच्यामुळेच घडते

याही वर्षी असंच होणार
जुळलेलं नातं रद्दीत जाणार
दिवस सुखाचे जावो म्हणत
नवीन भिंतीवर टांगली जाणार

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ जानेवारी २०१७