Saturday, 21 January 2023

हंबरडा

हंबरडा

मी सोडून गेल्यास जगाला
दोन अश्रू उगाच वाहतील
हंबरडाही फुटेल एकदाच 
पून्हा सारे मार्गी लागतील

चांगला होता, वाईट होता
येईल उधाण चर्चेस भारी
देहात असतो प्राण जेव्हा
येतही नाही कोणीच दारी

त्यागून जावे लागते सारे
मग कशास मोह करावा?
जगताना गिळून रागलोभ
प्रत्येकाचा सन्मान करावा

काळ फिरूनी येतही नाही
वेळेला घ्यावे कवेत मिटून 
त्रागा नकोच कधी कुणाचा
आयुष्य जगावे आनंद लुटून


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ जानेवारी २०२३

Sunday, 30 October 2022

रोखून पाहणं

रोखून पाहणं

आजचं तुझ रोखून पाहणं
काळजात पार घुसलं होतं
तू मुक्त जरी वावरत होती
मन हे तुझ्यात गुंतलं होतं

नकळत स्पर्श होता तुझा
मी जरासा शहारलो होतो 
भान सुटत असताना तरी
मी स्वतःच सावरलो होतो

या जगाला विसरून सखे मी
फक्त तुझ्याकडे पाहतो आहे
वेडा होऊन विचारात तुझ्या
प्रत्येक रात्र मी जागतो आहे

थांबव झुरणं माझ्या मनातलं
भेटीस ये, विसरून जग सारे
पाहतो वाट तुझ्या होकाराची
साक्षीदार आहे नभातले तारे


यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० ऑक्टोबर २०२२

Sunday, 23 October 2022

घमेंड

आपल्याला कितीही यश मिळाले तरी मनात घमेंड असू नये. घमेंड आपले अपयश आहे, कारण घमेंड मध्ये आपण ज्या प्रमाणे वागतो त्यामुळे लोकांच्या मनातून आपण आपले स्थान गमावून बसतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ ऑक्टोबर २०२२

Sunday, 16 October 2022

जे पेराल तेच उगवेल!

स्वतःच्या मान-सन्मानाची अपेक्षा करणाऱ्यांनी दुसर्‍यांशी बोलताना स्वतः भानावर राहून बोलणे अपेक्षित असते. कारण आपण जसे दुसर्‍यांशी वागतो तसेच समोरचाही वागण्याचा प्रयत्न करीत असतो. थोडक्यात, जे पेराल तेच उगवेल!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
 १६ ऑक्टोबर २०२२

Saturday, 10 September 2022

विष

मनात विष पेरणारे हजारो असतात पण ते विष आपल्यात भिनू न देता अमृताहूनी गोड जीवन जगायचं ठरवलं की समजायचं, की "आपला आपल्यावर ताबा आहे आणि आपण भानावर आहोत."

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० सप्टेंबर २०२२

 

Sunday, 31 July 2022

भेदभाव

भेदभाव

पावसात तरूण दिसणारी झाडी
लाकूड होऊन पावसात कुजतात
निसर्ग खुलविणारी झाडं नेहमी
लाकूड होऊन घरात सजतात

सुंदर दिसण्यास आपण नेहमी
शरीरावर बरेच साज चढवतो
निसर्गाने सुंदर केलेल्या झाडांवर
आपण कुर्‍हाड का चालवतो?

झाडं, फूले, वेली आपल्याकडून
कधीच काहीही मागत नाही
छाटून, पाऊस देणाऱ्या झाडांना
आपली तहानही भागत नाही!

सदा भरभरून देणारा निसर्ग 
भेदभाव न करता देत असतो
प्राणवायू देणाऱ्या निसर्गाचा
का आपण जीव घेत असतो?


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
३१ जुलै २०२२

Friday, 22 July 2022

विश्वास

एखाद्या कामाची सुरूवात करण्यापूर्वी त्यावर आपला शंभर टक्के विश्वास असेल तर ते काम सुरू करण्यापूर्वीच पन्नास टक्के पूर्ण झालेले असते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२३ जुलै २०२२