Saturday, 31 December 2016

दारूची आणि माझी मैत्री

काल (३० डिसेंबर २०१६) कार्यालयातील WhatsApp समुहावर वर सहकाऱ्याने दुसऱ्याची एक कविता टाकली. कवीचे नाव माहीत नाही. कवितेचं शिर्षक होतं "दर पार्टीच्या शेवटी एक क्वाटर कमी पडते" छान होती कविता. माझ्या साहेबांनी मला आग्रह केला तु सुद्धा एक दारू साठी एक कविता कर. माझा आणि दारूचा काहीच संबंध नाही. पण साहेबांच्या आग्रहाखातर ही कविता मी केली. अगदी वर नमूद केलेल्या कवितेच्या विरूद्ध ही माझी कविता आहे.


दारूची आणि माझी मैत्री


दारूची आणि माझी मैत्री
जरा सुद्धा होत नाही
दारू पिणं तर दूरच
मी वास सुद्धा घेत नाही

पिणारे कसे पितात दारू
हा विचार करतो जरासा
पिणाऱ्यांच्या संगती बसुन
राखतो घरच्यांचा भरवसा

दारूचा ग्लास हाती न घेता
मी ताव मारतो चकण्यावर
न जाळता कधी देह दारूत
प्रेम करतो मी या जगण्यावर

अनुभवले नाही मी हे कि
दारूत कसली नशा आहे
दारूच्या ग्लासात न हरवता
जगण्यास अनेक दिशा आहे


यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ डिसेंबर २०१६

Wednesday, 21 December 2016

वाचन किती महत्वाचे?

    प्रेमात पडायचं असेल तर पुस्तकाच्या प्रेमात पडावं. आणि नाती जोडायची असतील तर पुस्तकाशी जोडावं. कारण जो एखाद्याच्या प्रेमात पडतो तो त्याची खुप काळजी घेतो व त्याला जीवापाड जपतो. जर तुम्ही पुस्तकांच्या प्रेमात पडाल तर सहजच तुम्हाला वाचनाची आवड लागेल. मी तर म्हणतो तुम्ही एकदा पुस्तकाच्या प्रेमात पडूनच बघा. आणि पहा काय फरक जाणवतो.

    वाचन म्हणजे कला. वाचन ही अशी कला जी व्यवहारात दैनंदिन जीवनात याची खुप मदत होते. माणसाला इतर व्यसनांपेक्षा वाचनाचं खुप व्यसन असावं. अडलेल्यांना मार्ग दाखवतो ते म्हणजे वाचन. समजा एखाद्या विषयावर चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेचा तूम्ही एक भाग आहात. खुप वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की चर्चेमधल्या विषयांवर तुम्ही पूर्वी काहीतरी वाचन केलं आहे व इतर कोणालाही त्याच्याबद्दल माहीती नाही आणि काहीच क्षण न दवडता तुम्ही लगेच त्याची माहीती त्या चर्चेत पूरविता. त्याक्षणी त्या चर्चेत तुमचा दरारा असेल. व इतर सर्व जण तुम्हाला एक हूशार व्यक्ती म्हणून पाहत असतात. त्यावेळी आपण इतरांवर एक वेगळीच छाप सोडतो. हे फक्त होतं वाचणामूळेच.

    तुम्हाला आवडत्या व्यक्तीची मैत्री करायची असेल तर काहीही करून जीवाचा आटापिटा करून तुम्ही त्या व्यक्तीची माहीती मिळवता व त्यांच्याशी संपर्क  साधण्याचा प्रयत्न करता, हेच पुस्तकाच्या बाबतीत घडलं तर. खुपच फरक पडेल. एकदा का तुम्हाला  वाचनाची सवय लागली की बघा फरक किती पडतो. ते स्वत:लाच विचारा. पुस्तक हा आपला गुरू असतो हे मानायला हरकत नाही कारण आपण ज्या गोष्टीचे वाचन केले आहे त्या वाचनातून आपण बरंच काही शिकतो व घडतो. शिकवण्याचं, मार्ग दाखवण्याचं, घडवण्याचं काम हे पुस्तक करतंच ना! मग पुस्तक म्हणजे आपला गुरूच आहे. पुस्तक हा आपला मार्गदर्शक असतो. बऱ्याच वेळी चुकलेला रस्ता सोडून सरळ मार्गाने चालण्यास भाग पाडण्याचे काम ते पुस्तकालाच जमतं.

    काही केलेलं वाचन हे आपल्या कधी काही तासांपुरतं स्मरणात राहतं तर काही केलेलं वाचन हे आपण कधी विसरूच शकत नाही. तुम्ही याचा विचार केलात का हो कधी! हे असं का घडतं. आपण काही वाचताना आजुबाजुला काही गडबड व गोंधळ असेल तर खरंच ते वाचन जास्त काळ आपल्या स्मरणात राहत नाही. वाचन करताना त्या पुस्तकातील प्रत्येक पात्रात आपल्याला पहावं. वाचन करताना त्या कथेचा वा त्या गोष्टींचा आपण एक भाग आहोत असे जर आपल्या मनात असेल तर तसे वाचन आपण लवकर विसरत नाही. कधी कधी ते आपल्या कायमच्या स्मरणात राहतात.

    निरीक्षण करणे ही माझी सवय. माझा दिवसभराचा बराच वेळ हा प्रवासात जातो. घर ते कार्यालयात, कार्यालय ते घर  (मी बदलापूर येथे राहतो व कामासाठी अंधेरी (एअरपोर्ट रोड-मेट्रो) येथे येतो. प्रवासात व्यक्ती आपला वेळ जात नाही म्हणून बहूतेक जण आपल्या मोबाईल मध्ये मग्न असतात हे मला नेहमी पहायला मिळतं. कोणी गेम खेळतो तर कोणी काणाला हिअर फोन लावून गाणी ऐकतो. हे करत असताना बहूतेक वेळा आपल्या अवती -भोवती काय घडतं आहे हे लवकर त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही. माझं असे म्हणणे आहे की हीच मग्नता आपण वाचनात दाखवली तर त्याचा बराच फायदा होईल. माझे तरूण वर्गाला हेच सांगायचं आहे की तुम्ही भविष्य आहात. जसा वेळ मिळेल तसे जास्तीत जास्त वाचन करा. अशा गोष्टी करणे टाळा की ज्या गोष्टीचा आपल्या फायदा होत नाही.

    वाचनाचे बरेच फायदे आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. आपले वाचन नियमीत असेल तर  समाजात वावरताना, व्यक्तीशी संवाद साधताना आपण कधीच अडखळत नाही. संवाद साधताना कधी कुठे कोणता शब्द वापरावा हे लगेच लक्षात येते. थोडक्यात सांगायचं म्हणजे वाचनामूळे आपल्या ज्ञानात बरीच भर (शब्दांची) पडते. लिखाण करतानाही आपल्या शुद्धलेखनात भर पडते.

    माझ्या बरोबर घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो. २००४ सालची गोष्ट आहे. मी श्री. प्रवीण दवणे सरांचं एक पुस्तक वाचलं आणि मला राहवलं गेलं नाही आणि मी पुस्तक आवडलं म्हणून त्यांना पत्राद्वारे कळवलं. आठवडा भरातच मला त्यांचं पत्र आलं. मला पत्र आलं होतं तेव्हा तो दिवस होता १५/५/२००४ पंधरा मे दोन हजार चार. ते पत्र मी अजून जपून ठेवलं आहे. "प्रेम व्यक्त करणारं, लेखणास प्रतिसाद देणारं पत्र खुप आवडलं" असं त्यांनी पत्रात नमूद केलं होतं. पत्रात त्यांनी मला असाही एक सल्ला दिला की, " तुझं सर्व शिक्षण पूर्ण झाल्यावर आधी बाह्यावाचणावर भर दे." त्याचं कारणही तसंच होतं.  मी त्या पत्रात भावनेच्या भरात "आशीर्वाद" हा शब्द "आर्शिवाद" असा लिहिला होता. त्यांनी तो मला त्यांच्या शैलीत पत्राद्वारे समजवून सांगितला होता. बाह्यवाचन व शुद्धलेखनावर जास्त भर देण्यास त्यांनी मला सांगितले. खरं सांगू मित्रांनो मी तूम्हाला, त्या एका पत्रामुळे मला खुप काही शिकायला मिळाले. त्यांचं पत्र आलं  तेव्हा मी कला शाखेत (समाजशास्त्र विषय) दुसऱ्या वर्षाला होतो. मी  त्यावेळी समाजशास्त्र या विषयाचं वाचन फार कमी केलं, व इतर लेखकांची, कवींची पुस्तकं वाचण्यास भर दिला. श्री. प्रविण दवणे सर खरंच तुमच्या एका पत्रामुळे माझ्यात खुप बदल घडून आले आहे. धन्यवाद श्री. प्रविण दवणे सर.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ डिसेंबर २०१६

Tuesday, 20 December 2016

प्रतिष्ठा

मिळत नसते सहजच प्रतिष्ठा
प्रयत्नाने ती कमवायची असते,
कमवायचीच जर असेल ती तर
थोडी माणूसकी दाखवायची असते

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० डिसेंबर २०१६

बाळाचे आगमन

इवल्याशा पावलांनी आता
घर अंगण सजणार
जगाला विसरून सारे
बाळात आता रमणारा

शुभेच्छा तुम्हाला देतो
स्वागत बाळाचे करताना
तुम्हीही भुलणार आता
डोळ्यांत स्वप्ने जपताना

तुमच्या मनात होता
बाळाच्या आगमणाचा ध्यास
आजचा क्षण आणि दिवस
आहे तुमच्यासाठी खास

आनंदातही आज जणू
आसमंत फूलून जातो
बाळाला शुभ आशिर्वादासह
शुभेच्छा तुम्हाला देतो

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० डिसेंबर २०१६

Sunday, 18 December 2016

विसरलेलं प्रेम

विसरलेलं प्रेम आणि "ती" ची
आठवण पुन्हा  येऊ लागली
नजरेने केलेली जखम आज
पुन्हा ताजी होऊ लागली

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ डिसेंबर २०१६

Friday, 16 December 2016

आई

रक्त मांसाच्या गोळ्याला
जपून ठेवले तू पोटात।।
सोसून कित्येक यातना
आणलेस मला जगात।।१।।

भूक माझी भागवली
स्वतः उपाशी राहून।।
आई, मला तू जपले
संकटाशी सामना करून।।२।।

देवाला नमन करताना
तुझा चेहरा आठवतो।।
देवापेक्षा महान आई तू
मनात तुलाच साठवतो।।३।।

पर्वतासारखी ऊभी तू
रक्षण माझे करण्यास।।
पाहून तुझी जिद्द आई
बळ येई मला जगण्यास।।४।।

आई कधी तू सावली
कधी रखरखते ऊन।।
शीस्त लावण्यास मला
जगलीस कठोर होऊन।।५।।

चूकीच्या वाटेने जाताना
नेहमी मला अडविले।।
सत्याचा मार्ग दाखवत
आई, मला तू घडविले।।६।।

अपूरा आहे जन्म
सेवा तुझी करण्यास।।
आई, शिकवले मला तू
माणूस म्हणून जगण्यास।।७।।

तू लावलेल्या शीस्तीमुळे
आहे समाजात मान।।
आहे तुझा मी लेकरू
वाटतो मला अभिमान।।८।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ डिसेंबर २०१६ 

Wednesday, 14 December 2016

नजर सर्व सांगून जाते

मान्य आहे मला कि
नजर सर्व सांगून जाते
रोज तूला पाहतो आहे
पण दूरूनच  तू निघून जाते


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ डिसेंबर २०१६