Wednesday 31 May 2017

बरसून घे पावसा

बरसून घे पावसा

नभात विजांचे खेळ सारे
झाले आता आमचे पाहून
हाल ते सारे शेतकर्‍याचे
कठोर ढगास झाले सांगून

सारे झाले व्याकूळ फार
बळीराजा अन् धरणीमाता
किती प्रार्थना करू तुझी रे
बरसून घे ना पावसा आता

पाहू नको रे ढगा आडून
पाहतो पावसा तुझी वाट
धाव घे, सारे डुलव शेत
लावू नकोस आमची वाट

तुझ्या येण्याची झाली रे वेळ
नकोच आता उशीर करू
हात जोडून करतो विनवणी
नुकसान कोठे नको रे करू

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ मे २०१७

Saturday 27 May 2017

जीवन प्रवास

जीवन प्रवास

माणसा, तुझ्या जन्माच्या वेळी
सोसत कळा आईच असते
येणार्‍या बाळाच्या स्वागताची
जगास रे, भलतीच घाई असते

जन्म झाल्यावर तुझा माणसा
आनंदी असतो संपूर्ण गाव
आनंदाच्या सार्‍या सुखी वेदना
फक्त आईलाच त्या ठाव

हळूहळू होतोस मोठा तू
प्रत्येक संकटास सामोरे जाऊन
टिकून राहतो तू या जगात
केवळ सारा अनुभव घेऊन

जबाबदारी कुटूंबास पोसण्याची 
होते सुरू तुझी एका वळणावर
संकटाशी करता हातमिळवणी
रे, करतोस प्रेम तू जगण्यावर

थकते जेव्हा शरीर तुझे
मुले दाखवी आश्रमाची वाट
भेटण्यास नाही वेळ जन्मदात्या
मांडतात मुले संसाराचा थाट

अनपेक्षित मिळते पहावयास
जीवन मरणातल्या अंतरातून
सांगणे तुला माझे रे वेड्या
जगावे काळजावर दगड ठेवून

करतो तू प्रयत्न जगण्याचा
यम करतो शेवटचा घाव
सोडून जायचे जगास या
हाच आहे शेवटचा डाव

जन्मापासून मृत्यूपर्यंतचा आहे
जीवन प्रवास हा तुझा सारा
नसताना जगात तू तेव्हा 
आठवत असे तुला जग सारा

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० मे २०१७

Thursday 25 May 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

मारू नकाच हाका थोडा निवांत आहे
देहात प्राण नाही आवार शांत आहे

गझल

वृत्त  - भुजंगप्रयात

ल गा गा ल गा गा.... ल गा गा ल गा गा
१ २ २ १ २ २.... १ २ २ १ २ २ = २० मात्रा

किती ही तयारी निरोपास माझ्या
नका वेळ घालू मला वेळ नाही

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

आता कुठे मिळाला आराम अंत क्षणी
का शेवटास देवा, गोंगाट फार आहे?

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

अंती कशास देता वस्त्रे नवीन कोरी
आयुष्य फार माझे ते फाटकेच गेले

Tuesday 23 May 2017

शब्दांचा मनातला भार

विचार करून-करून
मन झालंय जड फार
कवितेने होतो कमी
शब्दांचा मनातला भार

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ मे २०१७

Monday 22 May 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

माझ्याच माणसाचा खेळून डाव झाला 
त्यांच्या सुखात माझा मारून जीव झाला

लाथाडलेच त्याला कोणास काय त्याचे
पाषाण तोच होता तो आज देव झाला

गोतावळा कधीही देतोच फार धोका
एकांत राहण्याचा माझा सराव झाला

मी एकटाच होतो झेलीत वेदना त्या
दावी स्मशान आता गोळाच गाव झाला

डोळ्यांतही सखीच्या ती धार फार होती 
ते वार रोखताना झेलून घाव झाला

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२९ मे २०१७

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

गझल

माणूस जीव माझा जाळीत फार होता
त्याच्या पुढे चितेचा अंगार गार होता

आलो जगात तेव्हा भारीच त्रास झाला
गर्भात माउलीच्या आराम फार होता

ही वाट पावसाची पाहून फार झाली
म्हणतात तो ढगाला भलताच भार होता

मी टाळलेच होते भेटायला सखीला
चंद्रा तुझा पहारा रात्रीस फार होता

ते शब्द भावनेचे सांगून खूप गेले
तो अर्थ सांगणारा माझाच शेर होता


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२५ जून २०१७

Saturday 20 May 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

गझल

येथे महत्व मोठे जन्मास फार आहे 
दुःखास मीच आता केलेच ठार आहे

पेरून कर्ज झाले धान्यास भाव नाही 
पर्याय शेवटाचा फाशी तयार आहे

मी हाक मारली पण आले कुणी न तेव्हा
मसनात न्यायला ही गर्दीच फार आहे 

संभाळुनी जगावे वाटे मलाच आता
माझ्याच माणसांच्या शब्दात वार आहे

झालेच बंद आहे दारे पहा मनाची
का आज हे घराला मोठेच दार आहे?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ मे २०१७

दुःखाला जपतो उराशी

दुःखाला जपतो उराशी

सारे राहतात आपल्याच धुंदीत
कुणालाही कळेना माझी उदासी
जो-तो करतो विचार स्वतःचा
म्हणूनी दुःखाला जपतो उराशी

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० मे २०१७

जागे व्हा मित्रांनो

जागे व्हा मित्रांनो

बापानं लावलेल्या रोपट्याचं
आज मुलगा फळ खातोय
काहीही मेहनत न करता
येथे मुलगा श्रीमंत होतोय

वेळ जराही नाही लागत
अंगात आळस शिरायला
तरूणांना त्रास लय भारी
जीव जातो कष्ट करायला!

लागली सवय बहूतेकांना
आयतं बसून खाण्याची
आई-बापाचा विचार नाही
परवड झाली जगण्याची

जागे व्हा आता मित्रांनो
लढवा आता शक्कल नवी
पांगळा झालेल्या कुटूंबाला
कुबडी तुमचीच आता हवी

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ मे २०१७

Thursday 18 May 2017

निशा धुंद होते

वृत्त  - भुजंगप्रयात

ल गा गा ल गा गा.... ल गा गा ल गा गा
१ २ २ १ २ २.... १ २ २ १ २ २ = २० मात्रा

निशा धुंद होते तुझ्या आठवांनी
कसे लोचने ही भिजे आसवांनी।।धृ।।

मिठी सैल होता दुरावा कशाला?
निशा धुंद होते पुरावा कशाला?
मला वेड लागे तुझ्या या खुणांनी।१।।

तुलाही कळेना मलाही कळेना
जगाया जिवाला निमित्ते मिळेना!
खुळा जीव होतो तुझ्या पैंजणांनी।।२।।

किती आठवू मी तुला रोज आता?
तुझा होत आहे कसा भास आता
दिली हाक तुला कसे स्वप्नांनी।।३।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ मे २०१७

गझल

वृत्त  - भुजंगप्रयात

ल गा गा ल गा गा.... ल गा गा ल गा गा
१ २ २ १ २ २.... १ २ २ १ २ २ = २० मात्रा

कळे आज नाते पहाटे कशाला?
तुही धुंद होते पहाटे कशाला?

निशा आज आली तुला भेटण्याला
मिठी सैल होते पहाटे कशाला?

तुझा हात हाती कसा आज आला?
भिती आज वाटे पहाटे कशाला?

प्रिये सांग आता उगा लाजते का?
बहाणेच खोटे पहाटे कशाला?

कुठे झोप गेली कळेना मलाही
मला जाग येते पहाटे कशाला?

Wednesday 17 May 2017

कवितेतून व्यक्त होतो

कवितेतून व्यक्त होतो

दूर असणार्‍या नात्यांसाठी
चार शब्द लिहून काढतो
वाचता कविता माझी कधी
आपल्यांचाच कंठ दाटतो

मनात साठलेलं मोठं वादळ
कवितेतून नेहमी होते शांत
कधीकधी दुःखाचा नकळत
कवितेत तात्पुरता होतो अंत

कधी वाटतं आपलं नातं
शब्द-कविते सारखं असावं
ऐकण्यात कोणाच्याही न येता
कधीच नातं हे ना तुटावं!

धकाधकीच्या या जीवनात
फक्त नाते जपत होतो
नाही वेळ म्हणून मी
कवितेतूनच व्यक्त होतो

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ मे २०१७

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

ते सत्य मांडताना होऊन त्रास गेला
तो शब्द आज माझा होऊन दास गेला

मी मुक्त आज झालो देहात प्राण नाही
माझ्याच मानसांचा वाढून ध्यास गेला

होतीच आठवांची यादी तयार माझी
तेव्हा तुझाच राणी होऊन भास गेला

त्या चांदण्यात होती ती एकटीच ऊभी
तो चंद्र स्वागताला धावून खास गेला

बोलून गोड लोकां जिंकून घेतले मी
आत्ताच शेवटाचा जिंकून श्वास गेला


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ मे २०१७

Saturday 13 May 2017

किती सांगू दुःखाला

किती सांगू दुःखाला

किती सांगू दुःखाला सारखेच
कशासाठी करतो गर्दी मनात?
शिल्लक राहीलेलं आयुष्य हे
जगू दे की मला एकांतात!

सांगायचं इतकं सारं दुःखाला
अधिकार काय आहे मला!
बजावतो त्याचा तो हक्क
वळण वेगळे देतो जगण्याला

दोष किती देऊ त्यालाही
काम त्याचं तो करून जातो
थोड्यासाठी जरी निघून गेला
चाहूल सुखाची देऊन जातो

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ मे २०१७ 

Sunday 7 May 2017

कोणाकडे नाही वेळ

कोणाकडे नाही वेळ आता
फक्त बहाणेच बहाणे आहेत
वेळ मारून घेत त्यांच्याकडे
पळ काढण्याची कारणे आहेत

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ मे २०१७

Saturday 6 May 2017

आयुष्य-गंभीर प्रश्न

आयुष्य-गंभीर प्रश्न

झाले वेचून आज हे
आयुष्य माझे सांडलेले
पण श्वासात अंतर हे
आहे केव्हाच संपलेले

हरवलेलं बालपण कधी
मिळेल का कुठे शोधून?
आयुष्य या गंभीर प्रश्नाचं
फार दमलो, उत्तर शोधून

शोधायला निघालो मी
हरवलेलं, चुकलेलं सुख
मला न सांगता माझी
वाट पहात होतं दुःख

हे जगणं इतकं का?
रोज कठीण होत आहे
ओळखीचे सुर का?
आज बेसूर होत आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६  मे २०१७ 

Friday 5 May 2017

सुरेश भट: गझलकार

http://www.india.com/marathi/others/suresh-bhat-birth-anniversary-2017-special-all-time-hits-gajalkar/

सुरेश भट: गझलकार...

‘लाभले भाग्य आम्हास…बोलतो मराठी’, ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा… गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा…’, ‘सरणावरीत जाताना इतुकेच मजला कळले होते… मरण्याने केली सुटका जगन्याने छळले होते’ किंवा ‘उष:काल होता होता काळरात्र जाहली… अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ एकापाठोपाठ एक अशा अनेक गझल आपल्यापैकी अनेकांच्या तोंडी सहज पहायला मिळतात. या सर्वच गझल कविवर्य सुरेश भट यांच्या आहेत. मराठी गझल म्हटले की, डोळ्यासमोर पहिल्यांदा समोर येते ते सुरेश भट यांचे नाव. मराठी गझलेचा इतिहास पाहायचा तर, सुरेश भट यांच्या नावाची व्याप्तीही समजून घ्यावी लागेल. कारण मराठी गझलला खऱ्या अर्थाने वेगळी उंची मिळवून दिली ती सुरेश भटांनीच. सुरेश भटांचे अवघे आयुष्यच गझल होते. अशा या मराठीतील गझलनवाजाची आज जयंती. कविवर्य सुरेश भटांच्या जयंतिनिमित्त…
मराठी गझलकार म्हणून सुरेश भट काही पहिलेच गझलकार नव्हेत. यापूर्वीही मराठीमध्ये अनेक लोकांनी गझल हा काव्यप्रकार हाताळला आहे. पण, सुरेश भटांनी हाताळलेला गझल हा काव्यप्रकार हा काहीसा हटके आहे. ज्यामुळे मराठी गझलेला एक वेगळीच उंची मिळाली. सुरूवातीच्या काळात गझल हा काही मर्यादीत वर्तुळातील लोकांनाच माहित असलेला आणि आवडीचा असलेला विषय. पण, सुरेश भटांनी जेव्हा का प्रकार हाताळायला सुरूवात केली तेव्हा, हा काव्यप्रकार मराठीत सर्वमान्य झाला. सुरेश भटांच्या गझलेमुळे मराठी साहित्याला अनेक नवे रसीक तर, मिळालेच. पण, अनेक नवे गझलकारही मिळाले. एरवी केवळ लावणी आणि गाण्यांचा भरणा अधिक असलेल्या आणि फारफारतर अपवादात्मक स्थितीत एखादा पोवाडा असलेल्या मराठी चित्रपटात खऱ्या अर्थाने गझलेचा शिरकाव झाला तो, सुरेश भट यांच्यामुळेच. भावनांनी ओथंबलेला आणि मनाला स्पर्ष करून जाणार नाजूक दर्द ते आपल्या गझलांमधून मांडतात.
मुळात गझल हाही एक काव्याप्रकारच. पण, हिंदी आणि उर्दूमध्ये लोकप्रिय असलेला हा प्रकार मराठीत मात्र काहीसा उपरा होता. त्यामुळे सुरूवातीच्या काळात मराठी रसिकांनी या काहीशा नव्या लेखणप्रकाराकडे दुर्लक्षच केले. तसे होणे स्वाभावीकही होते. कारण तोपर्यंत मराठी रसिकाला अभंग, ओव्या, कवीता, लोकगिते, शाहिरी पोवाडे आदिंची चांगलीच ओळख होती. पण, ‘गझल’ काय किंवा ‘हायकू’ काय हे काव्य प्रकारच मराठी लोकांना नवे होते. याचा अर्थ गझल हा काव्य प्रकार मराठीत नव्हताच असे नाही. पण, त्याची व्याप्ती एकुणच कमी होती. त्यामुळे गझलेला लोकाश्रय मिळावा, ती जनमानसात रूजावी यासाठी सुरेश भटांनी गझलचे सादरीकरण करत महाराष्ट्र आणि देश-विदेशात अनेक कार्यक्रम केले. ज्यामुळे मराठी गझलेचा प्रचार-प्रसार झाला. गझलला मान मिळवून देण्याचं काम सुरेश भटांनी केलं. सुरेशजी यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी, गझल यांचा आयुष्यभर मनापासून आभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला.

एका सधन कुटूंबात सुरेश भट यांचा जन्म विदर्भातल्या अमरावतीचा. त्यांचे वडील पेशाने डॉक्टर होते. त्यांना कवितेची फारशी गोडी नव्हती. पण, सुरेश भटांच्या आईला मात्र कवितेची भारी आवड. त्यांना अनेक कविंच्या अनेक कवीता तोंडपाठ होत्या. त्यातूनच सुरेश भटांना कवितेची गोडी निर्माण झाली. त्या काळी पोलिओच्या आजारावर प्रभावी इलाज होत नसे. त्यामुळे अनेक मुलांना पोलिओच्या त्रासातून जावे लागे. जो त्रास आयुष्यभर सोसावा लागे. सुरेश भटांनाही तो सोसावा लागला. ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.
सुरेश भटांचा संपूर्ण शिक्षण त्यांच्या जन्मठिकाणी अमरावतीलाच झाले. कला शाखेतून पदवीधर असलेले सुरेश भट बी.ए. च्या शेवटच्या वर्षी दोन वेळा नापास झाले होते. पूढे १९५५ साली ते ते उत्तीर्ण झाले हा भाग वेगळा. शिक्षण संपल्यावर त्यांनी शिक्षकी पेशा स्विकारला. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. पण ते काही लिहित होते ती गझल आहे याची सुरेश भट यांना सुतराम माहिती नव्हती. त्यांचा उर्दू भाषेचाही चांगलाच अभ्यास होता. सुरेश भट हे जरी विदर्भातील असले तरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात त्यांची ओळख होती.

दरम्यान, भारतीय संगितात स्वत:चा अमिठ ठसा उमटवलेले संगितकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या नजरेला भटांचे लिखाण पडले. त्यांनी त्यांच्या गझल (तोपर्यंत भटांच्या लेखी असलेल्या कविता..) संगितबद्ध केल्या. इतकेच नव्हे तर, त्या संगितबद्ध केलेल्या गझल अनेक मराठी चित्रपटांमधूनही प्रसिद्ध झाल्या. ज्याचे चित्रपटरसिंकांनी प्रचंड स्वागत केले. सुरेश भटांनी एकूण पाच गझलसंग्रह लिहिले त्यात ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’, ‘सप्तरंग’ यांचा समावेश आहे. श्रृंगार, प्रेम, विरह तसेच मानवी जीवनातील दु:खाच्या (दर्द) विवीध छाटाही त्यांनी अत्यंत समर्थ आणि तितक्यात भावोत्कट पद्धतीने आपल्या गझलेतून व्यक्त केल्या.

त्याच्या गझलेची खोली पाहून विध्यापीठाने त्यांच्या गझल अभ्यासक्रमालाही ठेवल्या. आज त्यांच्यमुळे मराठी गझलला मानाचे स्थान मिळाले आहे. त्यांच्या गझल संग्रहांना आजही मोठी मागणी आहे. त्यांची गझल ही कोणत्याही एका वर्गाची नव्हती. अनेक साहित्यिकांनी गझलला मान्य केले नव्हते पण सुरेश भट लढले आणि त्यांनी गझलला अधिकॄत सन्मान मिळवून दिला.

सुरेश भट हे केवळ गझलकारच नव्हते तर, ते एक हाडाचे पत्रकारही होते. ते स्वत: एक साप्ताहीक चालवत. ज्यातून त्यांची बेधडक लेखणी तळपत असे. सुरेश भटांची गझल कधीच त्यांनी स्वत:पूरती ठेवली नाही. त्यांनी आपल्या गझलेतून रसिकांना चिंब केलेच. पण, अनेक नवे उमदे गझलकार तयार होण्यासही प्रोत्साहन दिले. गझल जनमानसात लोकप्रिय व्हावी यासाठी त्यांनी गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून ‘गझलेची बाराखडी’ नावाची एक पुस्तिका लिहिली होती. अनेक वाचकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलाच. पण, नवोदीत गझलकाराने ती हमखास सोबत बाळगावी आणि वरचेवर अभ्यसावी.

हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, गजलनवाज भिमराव पांचाळे यांसारख्या अनेक दिग्गज गायकांनी भटांच्या गझल आणि कवितांना स्वर दिला आहे. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. आपल्या दोन मुलांपैकी एकाच अपघाती मृत्यू भटांना उघड्या डोळ्यांनी पहावा लागला होता. त्यांचा दुसरा मुलगा गझलकार असून, वडीलांनी दाखवलेल्या वाटेवरून मार्गस्त आहे. मुलगा चितरंजन हा सुद्धा वडीलांच्याच पावलावर पाऊल देत एक उत्तम गझलकार म्हणून प्रसिद्ध आहे. 15 एप्रिल 1932 ला जन्मलेल्या या  गझलसम्राटाचे हृदयविकाराच्या झटक्याने १४ मार्च २००३ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले.