Sunday 9 April 2023

मोबाईलचा विळखा

मोबाईलचा विळखा

    कधी कधी असं वाटतं की फोनचा (भ्रमणध्वनी) शोध लागला नसता तर आज परिस्थिती काहीशी वेगळी दिसली असती. फोनचा शोध तर लागलाच पण या शोधामुळे माणसाचा शोध घेणं कमी झालं आहे. प्रत्यक्ष भेटण्याची ओढ कमी झाली आहे. नात्यातला गोडवा निघून गेला आहे. मनातील दुःख, आनंद खऱ्या अर्थाने मोकळे होताना दिसत नाही. काहीही छोटी गोष्ट असेल तर लगेच फोन हातात घेतला जातो व आपला संदेश दुरूनच पोहचवला जातो. जर हाच संदेश आपण प्रत्यक्ष भेटून दिला असता तर ते सारे क्षण अविस्मरणीय झाले असते. आपण कशाचाही विचार न करता आपल्या हातात लगेच फोन घेतो व बोलून मोकळे होतो. रोजचा प्रवास करतानादेखील प्रत्येकाच्या हातात फोन असतो आणि त्या फोनमधून माणूस स्वतःचे मनोरंजन करीत असतो. त्याच प्रवासात फोन बाजूला ठेवून एकमेकांशी आपले विचार मांडले तर मन मोकळं होऊन वेगळाच आनंत प्राप्त होईल. या फोनमुळे शेजारी काय घडतं आहे याचा जरासुद्धा अंदाज लागत नाही. रेल्वे, बस प्रवासात गर्दीच्या ठिकाणी काहीजण मोबाईलमध्ये इतके गुंतलेले असतात की दुसऱ्यांना आपला त्रास होतो आहे याची त्यांना जरासुद्धा कल्पना येत नाही. "निदान गर्दीच्या वेळेत तरी मोबाईल वापरू नका" असे सांगितल्यास त्यांच्या चेहर्‍यावर काहीही बदल दिसत नाही कारण मोबाईल वापरणारा हा मोबाईल मध्ये फार गुंतलेला असतो. उलट कधीकधी मोबाईल वापरणाराच आपल्याशी भांडण करतो. भ्रमणध्वनी हे शाप की वरदान हाच प्रश्न सारखा भेडसावत आहे. कित्येक वेळा हा फोन मृत्यूचे कारणही ठरला आहे. या फोनमुळे रेल्वे/रोड अपघात होताना पाहीले आहे. समाजात घरात व बाहेर अपघात होताना दिसत आहे. उद्यानात पालक मुलांना खेळायला घेऊन येतात. मुलांना खेळायला सोडतात व फोनवर संगीत ऐकतात वा बोलण्यात मग्न होऊन जातात. मुलं खेळताना जखमी होतात हे पालकांच्या लवकर लक्षात येत नाही. असे लोक भान हरपलेले असातात. यांना भानावर आणावं लागतं हे फार मोठं दुर्दैव आहे. घरात जर शाळकरी मुलं असतील तर पालक मुलांना फोन लवकर हातात देत नाही. पालकांच्या अनुपस्थित मुलं मोबाईलवर तासंतास खेळ खेळताना दिसतात. यामुळे काही विद्यार्थ्यांचं अभ्यासावर लक्ष नसतं ही बाब समोर आली आहे. मोबाईलवर असे काही खेळ की ते खेळ खेळता मुलांनी आपले प्राण देखील गमावले आहे.
    काही दिवसांपूर्वी एक पब्जी नामक खेळाने तर मुलांना फार वेडं करून सोडलं होतं. माझ्या परिचयातील एका कुटुंबात लहान मुलाने घरात कोणी नसाताना पब्जी खेळ खेळत चक्क गळफास लावून घेतला व तेथेच त्याचे जीवन संपले. यामुळे या मोबाईलच्या युगात लहान मुलांवर पालकांनी लक्ष देणे फार गरजेचं आहे. नाहीतर काहीही होऊ शकतं. मुलांना मोबाईलचे जर वेड लागले असेल तर पालकांनी त्वरित यावर मर्यादा आखावी. काही भागात लहान मुलांना खेळण्यासाठी आता मैदानं उरलेली नाही. अशा वेळेस पालक मनोरंजन म्हणून मुलांच्या हाती मोबाईल देतात. पालकांनी मोबाईल द्यावं पण त्यावर वेळेचं बंधन असावं. वेळ सरत नाही म्हणून काहीजण तासंतास मोबाईलवर बोटं फिरवत बसतात. प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते आणि ज्यामुळे आपलं नुकसान होत असतं त्या गोष्टीवर आपली बारीक नजर असली पाहिजे आणि त्या गोष्टीचा अतिरेक लगेच थांबवला पाहिजे.
    घरात मोठ्या माणसांचं अनुकरण लहान मुलं करत असतात. एक गोष्ट सारखी निदर्शनास येते ती म्हणजे घरात सहकुटुंब जेवण करताना मोठी माणसं हातात मोबाईल घेऊन काहीतरी चाळत असतात किंवा फोनवर बोलत असतात. चक्क हातातला घास हा बराच वेळ हातातच असतो आणि मोबाईलकडे लक्ष असतं. तेथे अन्नाचा अपमान होतो आणि आपल्या शरीरासाठी अन्न हे काम करत नाही. याचा लहान मुलांवर फार मोठा परिणाम होतो हे मोठ्यांनी ओळखलं पाहीजे आणि असं करणं त्वरित थांबवलं पाहिजे. मोबाईलमध्ये चित्रिकरण करत असताना प्राण गमावताना समाजात काही घटना घडताना पाहिल्या आहेत. इंस्टाग्राम, युटूबवर रिल्स बनवण्यासाठी माणूस नको त्या थराला जातो आणि कधी कधी आपले प्राण गमावून बसतो.
या सर्व गोष्टी थांबायच्या असतील तर "स्वतःच्या वागणुकीत व विचारात चांगले बदल केले तर जग सहजच बदलेलं दिसेल." काहीजण रात्री मोबाईल पाहत पाहत झोपी जातात. विज्ञानात सांगितल्याप्रमाणे रात्री झोपताना मोबाईल पाहत झोपू नये. असे केल्यास त्याचा आपल्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. असे निदर्शनास येते की या धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा म्हणून आपण मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये गप्पा मारत असताना किंवा एखाद्या विनोदावर मनसोक्त हसताना त्यात एखादी व्यक्ती अशी असते की ती व्यक्ती गप्पांमध्ये सामिल असते पण लक्ष सारं मोबाईलमध्ये असतं. इतर सर्वजण हसतात पण ती व्यक्ती गंभीर चेहरा करून मोबाईल हाताळत असते.
    मान्य आहे की, आजच्या स्पर्धेच्या युगात मोबाईलचा वापर हा फायद्यासाठीही केला जातो. त्या मोबाईलमुळे बरीच महत्त्वाची कामं होतात. महत्त्वाची कामं करताना काही मर्यादाही पाळल्या पाहीजे. मर्यादा पाळल्या की त्याचा फायदा हा आपल्याच होतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ एप्रिल २०२३