Saturday 17 August 2019

माणूसकी हरवली

    हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला माणसाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. घरात, समाजात, प्रवासात, माणूसकी हरवत चालली आहे याचं फार दु:ख आहे. प्रत्येक क्षणाला माणूसकी हरवल्याचं दर्शन घडत आहे. आज माणसातला माणूस मरून पडलाय की काय असं वाटू लागलं आहे. मोठी दुर्घटना घडते, इमारत कोसळते, अपघात होतो. ढिगाऱ्याखाली माणसं मरून पडली असताना हे सारं पाहण्यासाठी गर्दी होते ती माणूसकी हरवलेल्या माणसांची. अशा वेळी मोठी व्यक्ती येते व मदत (अर्थिक) करण्याचे अश्वासन देते आणि निघून जाते. त्याच ठिकाणी दुसरीकडे गर्दीतलाच एक माणूस ढिगाऱ्याखाली मेलेल्या, गाडल्या गेलेल्या हाडामासाच्या माणसाच्या अंगावरचे मौल्यवान वस्तू काढण्यात मग्न असतो व दुसरा अपघाताचे छायाचित्रे, चलचित्र काढण्यात मग्न असतो. जर एखादी मौल्यवान वस्तू माणूस काढू शकत नाही तर अक्षरशः हातात सोन्याची अंगठी असलेले बोटंच छाटून घेऊन जाण्याचा प्रकार घडताना दिसतो. अशावेळी मदतीचा हात देणाऱ्या गर्दीची फार गरज असते. 

    रस्त्यावर वाहणाचा अपघात झाल्यावर हीच तोबा गर्दी जमते. माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना तो जीव वाचवण्यासाठी मदतीचा हात मागत असतो. तेथेही गर्दीत माणसांची अपघाताचे छायाचित्रे काढण्यास चढाओढ लागलेली असते. अशावेळी जखमीला वेळेवर मदत न मिळाल्यामुळे प्राणही गमवावे लागतात. काहीजण तर असेही असतात कि ते गर्दीत येत नाही.  लांबूनच पाहून निघून जातात कारण त्यांच्या मनाला असं वाटत असतं कि, आपण ज्या कामाला जात आहे तेथे जाण्यास उशीर होत आहे. पण त्यांना हे कळत नाही की, आपण जर जखमीला मदत करण्यास उशीर केला तर तो देवाघरी लवकर निघून जातील.

    खूप दान धर्म करणारी मंडळी या जगात आहेत. एकीकडे असेही चित्र दिसतं की, दान धर्म करणारी व्यक्ती घरात असणाऱ्या (थकलेले) आई वडीलांकडे अजिबात लक्ष देत नाही. कधी काळी थकलेल्या आई वडिलांना त्रासही दिला जातो. घरात आई वडिलांना उपाशी ठेवून बाहेर दान धर्म करत असताना त्यांना पुण्य कसे लाभेल. माणूसकी हरवलेला मुलगा घरात असेल तर आई वडिलांचे असेच हाल होणारच.

    जीवाला वैतागलेली व्यक्ती जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न करत असते तेव्हा आजूबाजूची जनता फक्त तमाशा बघत असते. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. याच्या उलट ती व्यक्ती कशी आत्महत्या करत आहे हे सारे भ्रमणध्वनी मध्ये टिपण्याचा प्रयत्न माणूसकी मेलेली गर्दी करत असते. ही आत्महत्या जलद गतीने जगाकडे कशी पसरेल याचाही प्रयत्न सर्वांचा सुरू असतो.

    एक गोष्ट मान्य आहे की आपल्या स्वतःच्या एका चुकीमुळे फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. आजच्या जगात समोरचा व्यक्ती चुकत आहे व त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं याची जाणीव असुनही कोणीही चुका करणाऱ्या व्यक्तीला थांबवत नाही. याचंच एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर ते आहे रेल्वेचा प्रवास. रेल्वेच्या डब्यात बसण्यासाठी जागा असूनही तरूण चालत्या गाडीत दरवाजाला लटकलेला असतो. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी दरवाजाला लटकून "स्टंटबाजी" करीत असतो. असे करू नको तुझ्या जीवाला धोका आहे असं बोलणारी माणसं त्या क्षणी दिसत नाही उलट मागे उभा राहून तो किती खतरनाक खेळ खेळत आहे याचे चित्रीकरण तो भ्रमणध्वनी मध्ये टिपत असतो. शेवटी असा क्षण येतो की स्टंटबाजी करणाऱ्याचा चुकून हात सुटतो व तो खाली पडतो आणि मरण पावतो. असे चलचित्र लगेच सोशल मिडीयावर पसरवले जातात. मागे उभे राहून चित्रीकरण करण्यापेक्षा स्टंटबाजी थांबवली असती तर एकाचा जीव वाचवला असता. पण नाही,  माणसातली माणूसकीच मेली आहे ना त्याचा दोष तरी कोणाला देणार!

    अतिवृष्टी होते, पूर येऊन जातो गरीबांचे घरं वाहून जातात अशा वेळी समाजसेवक, राजकारणी मंडळी, संस्था, बरेच मंडळ पूरग्रस्त भागात येऊन मदत करतात. त्याच पूरग्रस्त भागात वास्तव्यास असलेली व राजकारणात मुरलेली एक-दोन मंडळीही असतात. तीच मंडळी भेदभाव करत नागरिकांपर्यंत कमी-जास्त मदत पोहचवतात. काहीजणांकडे तर मदत पोहचतच नाही (मुद्दाम मदत केली जात नाही). नुकसान तर प्रत्येकाचे झालेले असते. मग प्रत्येकाला समान मदत का मिळत नाही? राजकारणात मुरलेल्यांची काही जणांची माणूसकीच हरवलेली असते त्याला आपण तरी काय करणार! पूरामध्ये एकीकडे माणूस आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो तर दुसरीकडे त्याच पूराच्या पाण्यात गुडघाभर उभा राहून काही जणांना स्वतःचे छायाचित्र (सेल्फी) काढण्याचा मोह आवरत नाही. पूरात वाहून जात असलेले संसार पाहत गर्दी उभी असते. एखाद्याचा जीव किंवा संसार वाचवण्याचा प्रयत्न न करता संसार किंवा माणूस वाहत असताना छायाचित्र काढण्यात माणसं व्यस्त असतात.

    पूरग्रस्त भागात राहणाऱ्यांना जेव्हा  शासकीय मदत मिळण्याची वेळ येते तेव्हाही माणूसकी मेलेल्या, राजकारणात असलेल्या माणसांचे दर्शन घडते. सरकार प्रत्येक कुटुंबाला ठराविक रक्कम देण्याचे ठरवते. ठरलेली रक्कम पूरग्रस्त भागात पोहचत नाही कारण सरकार आणि सामान्य जनता या दोघांत भ्रष्ट नेते मंडळी असतात. राजकारणात असलेली मंडळी आपली तिजोरी भरून घेतात व नंतर उरलेली रक्कम गरीब जनतेमध्ये वाटतात. येथेही राजकारणात असलेल्या, व समाजाच्या कल्याणासाठी निवडलेल्या व्यक्तींची माणूसकी मेलेली असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१३ ऑगस्ट २०१९