Wednesday 30 November 2016

व्याकूळ माझा जीव होतो

रोज सकाळी बाहेर पडतो
नोकरी साठी दिमाखात,
व्याकूळ माझा जीव होतो
रोजच्या त्या प्रवासात!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ एप्रिल २०१५

आजारपण

आजारपण

रुसलेत शब्द आज माझे
लाडक्या माझ्या लेखणी वर,
आहे त्रस्त आजारात म्हणूनी
उमटली नाही कविता कागदावर !

तयार झाल्या मनात रचना 
शब्दांत मांडता आल्या नाही,
रूग्णालयी उपचार घेता घेता
कागदावर टिपता आल्या नाही !

होते भयाण चार दिवस ते
गेली थकून माझी भार्या,
पैसा वेळ झाला खर्ची
झाली दुबळी माझी काया !

नको रे, आजारपण देऊ कोणा
ताळमेळ सारा बिघडून जातो,
गेलेल्या वेळेची करता भरपाई
पुन्हा येथे जीव थकुन जातो !

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ एप्रिल २०१५

माय माझी माऊली तू

माय माझी माऊली तू
नाही शब्द मजकडे आभारासाठी
चीज करीन घेतल्या कष्टाची
बळ देतेस जगी वावरण्यासाठी

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ एप्रिल २०१५

आरशाला मी खरी कळलेच नाही

सौंदर्य न्याहळत उभी त्याच्या समोर
त्याने अंतर मन कधी जाणलेच नाही
आपल्याने ओळखले मन हे माझे
आरशाला मी खरी कळलेच नाही

यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ एप्रिल २०१५

सारे दुःख विसरण्यासाठी

सारे दुःख विसरण्यासाठी,
कवितेत मी रमून जातो.
न सांगता येणार्‍या गोष्टी,
कागदावरती टिपून घेतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ एप्रिल २०१५

एक तर्फी प्रेमात हे असच होतं

खुप दिवसांनी आज ती दिसली,
काळीज माझं धडधडत होतं.
काहीच हावभाव न दाखवता ती गेली,
एक तर्फी प्रेमात हे असच होतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ एप्रिल २०१५

ग्रीष्मात ही मनी गुलमोहर फुलला

भेट घडली खुप दिवसांनी आज,
हा वेडा जीव माझा बावरला.
कसे सांगु सखे तुजला,
ग्रीष्मात ही मनी गुलमोहर फुलला.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ एप्रिल २०१५

एकांतात आज

एकांतात आज
याद तुझी आली
ओली कडा झाली
पापण्यांची

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ एप्रिल २०१५

ट्रेनचा प्रवास

मेंढरं कोंबावी तशी इथे,
माणसं कोंबली जात आहे.
रोज ट्रेनच्या प्रवासामध्ये,
हाडं मोकळी होत आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ मार्च २०१५

एकांत असताना

एकांत असताना जवळ असते,
ही सुगंधी फुलांची दुनिया.
सख्या रे तु चोरलेस मन माझे,
काय केलीस हि किमया.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ मार्च २०१५

रेल्वे पोलीस

रेल्वे पोलीस

महिला रेल्वे डब्यात,
तो एकच पुरुष होता.
तो दुसरा तिसरा कोणी नाही,
बंदुक धारी रेल्वे पोलीस होता.
नजर त्याची तीक्ष्ण होती,
संकटाचा मनी तो अंदाज धरी.
मनात कसली भीती न बाळगता,
महिला बिनधास्त प्रवास करी.
तासंतास रक्षणासाठी उभा.
आपली तहान भूक हरवून,
सलाम माझा त्या जवानाला,
ते भीतीला लावतात पळवून.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१/०३/२०१५

भारत पाकिस्तान मॅच असली कि

भारत पाकिस्तान मॅच असली कि,
सर्वच जण भारतीय होतात.
दुसर्‍या दिवसापासून परत एकदा,
ते आपल्या धर्मात जातात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७/०२/२०१५

गालात हसतो निसर्ग सारा

आंब्याच्या वनी नाचे मोर,
फुलवून आपला पिसारा.
बघून सारे मनमोहक दृश्य,
गालात हसतो निसर्ग सारा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४/०२/२०१५

बदलापूर महोत्सव कार्यक्रमात

एकिकडे बदलापूर महोत्सव कार्यक्रमात,
संपूर्ण बदलापूर खूप खूप हसत होतं.
दुसरीकडे विक्री करणारे गरीब,
एक एक गिराइकाला तरसत होतं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८/०२/२०१५

प्रियेची भेट झाली नदीच्या किनारी

प्रियेची भेट झाली नदीच्या किनारी,
गहिवरून आला आसमंत सारा.
तिच्या पदराला भुलवून बटाशी खेळत,
अंगाला झोंबतो गार गार वारा.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६/०१/२०१५

कुटुंबाचा आणि माझा सहवास

कार्यालयात संपूर्ण दिवस जातो,
अन् तासंतास घडतो प्रवास.
काही वेळापुतरताच राहीला आहे,
कुटुंबाचा आणि माझा सहवास.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४/०२/२०१५

जैसे कर्म तैसे फळ

जैसे कर्म तैसे फळ,
हेच सत्य आहे जीवनी.
जरी गेल्यास असत्याच्या मार्गी,
येईल दुखः आपल्या जीवनी.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
03/01/2015

माझ्या मृत्यूची झुंज

काल रात्री स्वप्नात मी,
माझ्या मृत्यूची झुंज पाहिली.
दुःखात पळवाट शोधणा-याची,
शेवटच्या दर्शनास रांग पाहिली.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
03/01/2015

जीव वैतागला आहे येथे

जीव वैतागला आहे येथे,
जो तो जगतो स्वतःचे मन मारून.
कष्ट आपण करतोय अन्,
झोळी देतो दुसर्‍याची भरुन.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
28/01/2015

निरभ्र अशा मोकळ्या नभी

निरभ्र अशा मोकळ्या नभी,
स्वच्छंद फिरतो पक्षांचा थवा.
जमीनीवर घुसमटला प्रत्येक माणूस,
म्हणतो, क्षणभर तरी विसावा हवा.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
26/01/2015

नाते तुझे माझे शब्दांच्या पलिकडले

हृदयात कोंडलेल्या मुक्या भावना,
व्यक्त करण्यास शब्दांना कोडे पडले.
आतातरी समजुन घेशील का प्रिये,
नाते तुझे माझे शब्दांच्या पलिकडले.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
30/01/2015

जग किती लहान आहे

जग किती लहान आहे,
आज मला हे कळलं.
शहरात राहणारी सुंदरी तु,
गावात अचानक तुझं दर्शन घडल.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
24/01/2015

तुझ्या आठवणींचे ओझे

तुझ्या आठवणींचे ओझे
वेड शब्दांचे मला लागले,
क्षण तुझे नि माझे लिहतो.
मन हलकं करुन आज,
तुझ्या आठवणींचे ओझे वाहतो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
24/01/2015

हळूच वेच रंग मनातला

स्पर्धेच्या युगात वावरताना,
घे ठाव तु जगातला.
जन उधळतील रंग अनेक,
हळूच वेच रंग मनातला.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
23/01/2015

आज नेहमी पेक्षा तु

आज नेहमी पेक्षा तु,
खुपच सुंदर दिसत आहे.
नजर हटत नाही तुझ्यावरुन,
अन् कामात चूका होत आहे.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
23/01/2015

भक्ति-शक्ति

भक्ति-शक्ति
माझ्या परमेश्वराच्या भक्तित,
गेलो मी मंत्र मुग्ध होऊनी.
करिता सेवा आई वडीलांची,
अंगी आली शक्ति संचारुनी.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
20/01/2015

त्या तिथे वळणावर

त्या तिथे वळणावर
तु अशीच गेल्यावर
अश्रू ओघळले गालावर ॥
वळूनही नाही पाहिले
त्या तिथे वळणावर॥धृ॥
कशी विसरलीस प्रित
मला काही कळेना ॥
तू छेडलेल्या तारांना
सुर कसे जुळे ना ॥
नजरेत मी येताच
फूले खळी तुज गालावर॥
वळूनही नाही पाहिले
त्या तिथे वळणावर॥1॥
उभी दूर अशी तु
परकी नजर जोडीला ॥
काय उपमा द्यावी
अनोळखी तुज खोडीला ॥
अंग चोरून उभी
पांघरून लाज मनावर
वळूनही नाही पाहिले
त्या तिथे वळणावर॥2॥
विसरु पाहते मज
लपती तुझी नजर ॥
नकोस करू खंत
फुटल्या दगडा पाझर ॥
नकोस ढाळू अश्रू
मी असताना सरणावर
वळूनही नाही पाहिले
त्या तिथे वळणावर॥3॥
यल्लप्पा सटवाजी कोकणे
27/04/2004

आयुष्य

आयुष्य
रोज रोज त्याच गोष्टी,
नवीन काही घडत नाही.
घर ते ऑफिस, ऑफिस ते घर,
याच्या शिवाय पाऊल कुठे वळत नाही.
आयुष्य झालय धावपळीचं,
स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
घरचे सुखी रहावे म्हणून,
मार्ग शोधत फिरतो दिशा दाही.
स्वतःसाठी काय करावं,
हे ही मी विसरून जातो.
कुटूंब सुखी राहीलं पाहिजे,
याच विचारात वाहून जातो.
घड्याळ्याच्या काट्यासोबत,
मी देखील धावतो आहे.
ते वेळा वेळाने एकत्र तरी भेटतात,
पण घरच्यांसोबत वेळ घालवायला क्षणासाठी मी तरसतो आहे.
हे जीवन म्हणावे कि संघर्ष,
श्वास माझा कोंडतो आहे.
जिवंत मी असुनही,
मेल्यासारखे जगतो आहे.
या वळणावर सुखी असलो तरी,
पुढच्या वळणावर दुःख हे भेटत असतं.
सुख दुःखाच हे चक्र,
न थांबता फिरतच असत.
आयुष्यावर लिहायला मला,
"आयुष्य" ही कमी पडणार आहे.
काय कमावलं नी काय गमावलं,
हे विचार करत आयुष्य माझे जाणार आहे.
यल्लप्पा कोकणे
15/01/2015

झोपी गेला गाव सारा

किरर अंधार दाटला,
अन झोपी गेला गाव सारा.
तरीही संत वाहते "उल्हास नदी",
त्याच बरोबर वाहतो हा गार वारा.
यल्लप्पा कोकणे
11/01/2015

दोघांचा भुतकाळ

आपल्या दोघांच्या भूतकाळात,
मी भलताच रमून गेलो.
क्षणासाठी आज मी,
माझा वर्तमान विसरून गेलो.
यल्लप्पा कोकणे
09/01/2015

निसर्ग

निसर्ग
दाट दुरवर धुके दाटले,
वारा हळूच स्पर्शून गेला.
पाखरांची किलबिल मनमोहक,
फुलपाखरू फुलांची खोडी काढून गेला.
कोणी सांडले दवबिंदू येथे,
जशी मोती माळून धरती सजली.
सुर्याने हि भर घातली त्यात,
भाळी टिळा लावून धरती लाजली.
संथ वाहते उल्हास नदी,
हळूच कानमंत्र देऊन जाते.
सर्व अडथळे पार करत,
जगण्याचा संदेश देऊन जाते.
यल्लप्पा कोकणे
06/01/2015

नुतन वर्ष

नुतन वर्ष जणू कोरे पुस्तक
नव संकल्पनांनी सजवू या,
ध्येय उच्च स्मरूनी मनी
स्वागत नववर्षाचे करू या !
यल्लप्पा कोकणे
०१/०१/२०१५

भुतकाळात रमून गेलो

आज मी या सालच्या,
नकळत भुतकाळात रमून गेलो.
घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टीच्या,
विचारात वाहून गेलो.
यल्लप्पा कोकणे
३१/१२/२०१४

अनोळखी तु

आज त्या गर्दीमध्ये,
माझी नजर सारखी तुलाच शोधत होती.
अनोळखी असुनही तु,
का तु आपलीच वाटत होती.
यल्लप्पा कोकणे
३१/१२/२०१४

प्रेम विरोधी जग

चुंबन घेऊन तो तुला खेटून गेला,
देवाने का बनविले नाही मला नटखट वारा?
या प्रेम विरोधी जगात लक्षात ठेव,
तु लाट आहेस व मी किनारा.
यल्लप्पा कोकणे
०७/०३/२०००

आभारी आहे समाजाचा क्षणोक्षणी

आशिर्वाद पाठिशी आई वडिलांवडिलांचा,
साथ लाभली भावाची जीवनी,
संघर्षमय जीवन जगण्यास शिकवले,
आभारी आहे समाजाचा क्षणोक्षणी.
यल्लप्पा कोकणे

मनासारखं घडत गेल तर

मनासारखं घडत गेल तर,
खुप खुप जगावं वाटत.
असेच प्रत्येक क्षण असावे,
स्वच्छंद नभी उडावं वाटत.
यल्लप्पा कोकणे
२८/१२/२०१४

वाट पाहून नयन थकले

वाट पाहून नयन थकले,
आतातरी येशील का.
या आतुरलेल्या जीवाची,
रुप दाखवून तहान तु भागवशील का.
यल्लप्पा कोकणे
२५/१२/२०१४

कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर

कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर
कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर,
पाण्याचा ग्लास घेऊन बायको येते.
थांबा कपभर चहा ठेवते म्हणत,
कंबर कसून स्वयंपाक घरात जाते.
आल्या आल्या लगेच माझी दोन मुलं.
पप्पा खाऊ काय आणले म्हणत गळ्याला पडतात,
नेहमी प्रमाणे चॉकलेट घेत,
ते खेळायला निघून जातात.
कामाच्या कचाट्यातून सुटून घरी आल्यावर,
अशी माया रोज पाहतो.
दिवसभराचा सर्व थकवा,
मी क्षणातच विसरून जातो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७/१२/२०१४

तुझे लाजणे

आज तुझे लाजणे,
मज वेड  लावुन गेले.
गालावर खळी पाडून,
तू मान माझे चोरून नेले.
यल्लप्पा सटवाजी कोकणे

प्रेरणादायी विचार

मानसाच्या मनात असलेली भीती किंवा शंका त्याच्या मनातच राहीली की त्याचं दडपण वाढत जातं. वेळीच त्याचं निरसन झालं की जगणं सोपं होतं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० नोव्हेंबर २०१६

जीव मुठीत

जीव मुठीत
जगताना जीव मुठीत घेऊन
प्रत्येकजण घाबरतो जीवाला
कारण त्याचे एकच आहे
जीव असतो प्रियजनात गुंतलेला
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ नोव्हेंबर २०१६

शेवटची भेट

शेवटची भेट
बरेच वर्षे लोटली
शेवटची भेट होऊन।।
हृदयातून तू जात नाहीस
कितीही प्रयत्न करून।।१।।
तुला विसरण्याचे प्रिये
झाले करून प्रयास।।
तु जवळ असण्याचा
आजही होतो भास।।२।।
दुर केव्हाच गेलीस तु
जुळण्या अगोदर नाते।।
आता फक्त आपली
स्वप्नातच भेट होते।।३।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ नोव्हेंबर २०१६

माणूस

अनेक रूपे मानवाची
जन्मापासून ते मृत्यूपर्यंत
बर्‍याच नात्यात अडकला
माणूस शेवटच्या श्वासापर्यंत
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ नोव्हेंबर २०१६

नाजूक नाती

नाजूक नाती टिकतात
आपल्यांची मनं जपल्यावर
कधी तडा ही जातो
कटू शब्द वापरल्यावर
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ नोव्हेंबर २०१६

मनं मेली माणसांची

मनं मेली आहेत माणसांची
सुख दुःख नाही घेत जाणून,
संवेदनशीलता हरवली जणू
दुसर्‍याच्या दुःखात घेती हौस करून.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० ऑक्टोबर २०१६

पहिली नजर

पहीली नजर
तुझ्या आठवणी सोबत
रोज झुरतो आहे।।
केल्या प्रेमाची सजा
मी भोगतो आहे।।१।।
जादू काय होती
पहिल्या तूझ्या नजरेत?
हरवुन गेले आहे
मन गं तुझ्या कैदेत।।२।।
जमलंच तर भेटून जा
ह्रदयी बाग फुलवुन जा।।
एकदा तरी सखे तू
मज सारखी वागून जा।।३।।
विचलीत होते मन
त्रास होतो जगायला।।
बघ जमतंय का तुला?
माझा विचार करायला।।४।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ ऑक्टोबर २०१६

आठवण तुझी आल्यावर

आठवण तुझी आल्यावर
मन गहिवरून आले।।
आठवता सहवास तुझा
मन पाखरू झाले।।१।।
गुंतला जीव तुझ्यात
वेड तुझेच लागले।।
सावरू कसा जीवाला
बेचैन मन हे झाले।।२।।
दूर असली जरी
भास तुझेच होई।।
जाणून घे तु मजला
आठवणीत जीवन जाई।।३।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ ऑक्टोबर २०१६

जीवन गाणे

जीवन गाणे
जीवन गाण्याला सुर, आज मला मिळाले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।धृ।।
होता अबोला दुःखाचा, शब्द फुटत नव्हते।।
काळीज चिरून सुर, कधीच जुळत नव्हते।।
सुर्यापरी तेज अंगी, आज संचारून गेले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।१।।
उजळून दाही दिशा, गेला पळून अंधार।।
नाही कोणी सोबती, फक्त आसवांचा आधार।।
दु:खाशी करून सामना, जगण्यास बळ आले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।२।।
जीवन गाण्याला सुर, आज मला मिळाले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।धृ।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ ऑक्टोबर २०१६