Friday, 5 May 2017

सुरेश भट: गझलकार

http://www.india.com/marathi/others/suresh-bhat-birth-anniversary-2017-special-all-time-hits-gajalkar/

सुरेश भट: गझलकार...

‘लाभले भाग्य आम्हास…बोलतो मराठी’, ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा… गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा…’, ‘सरणावरीत जाताना इतुकेच मजला कळले होते… मरण्याने केली सुटका जगन्याने छळले होते’ किंवा ‘उष:काल होता होता काळरात्र जाहली… अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ एकापाठोपाठ एक अशा अनेक गझल आपल्यापैकी अनेकांच्या तोंडी सहज पहायला मिळतात. या सर्वच गझल कविवर्य सुरेश भट यांच्या आहेत. मराठी गझल म्हटले की, डोळ्यासमोर पहिल्यांदा समोर येते ते सुरेश भट यांचे नाव. मराठी गझलेचा इतिहास पाहायचा तर, सुरेश भट यांच्या नावाची व्याप्तीही समजून घ्यावी लागेल. कारण मराठी गझलला खऱ्या अर्थाने वेगळी उंची मिळवून दिली ती सुरेश भटांनीच. सुरेश भटांचे अवघे आयुष्यच गझल होते. अशा या मराठीतील गझलनवाजाची आज जयंती. कविवर्य सुरेश भटांच्या जयंतिनिमित्त…
मराठी गझलकार म्हणून सुरेश भट काही पहिलेच गझलकार नव्हेत. यापूर्वीही मराठीमध्ये अनेक लोकांनी गझल हा काव्यप्रकार हाताळला आहे. पण, सुरेश भटांनी हाताळलेला गझल हा काव्यप्रकार हा काहीसा हटके आहे. ज्यामुळे मराठी गझलेला एक वेगळीच उंची मिळाली. सुरूवातीच्या काळात गझल हा काही मर्यादीत वर्तुळातील लोकांनाच माहित असलेला आणि आवडीचा असलेला विषय. पण, सुरेश भटांनी जेव्हा का प्रकार हाताळायला सुरूवात केली तेव्हा, हा काव्यप्रकार मराठीत सर्वमान्य झाला. सुरेश भटांच्या गझलेमुळे मराठी साहित्याला अनेक नवे रसीक तर, मिळालेच. पण, अनेक नवे गझलकारही मिळाले. एरवी केवळ लावणी आणि गाण्यांचा भरणा अधिक असलेल्या आणि फारफारतर अपवादात्मक स्थितीत एखादा पोवाडा असलेल्या मराठी चित्रपटात खऱ्या अर्थाने गझलेचा शिरकाव झाला तो, सुरेश भट यांच्यामुळेच. भावनांनी ओथंबलेला आणि मनाला स्पर्ष करून जाणार नाजूक दर्द ते आपल्या गझलांमधून मांडतात.
मुळात गझल हाही एक काव्याप्रकारच. पण, हिंदी आणि उर्दूमध्ये लोकप्रिय असलेला हा प्रकार मराठीत मात्र काहीसा उपरा होता. त्यामुळे सुरूवातीच्या काळात मराठी रसिकांनी या काहीशा नव्या लेखणप्रकाराकडे दुर्लक्षच केले. तसे होणे स्वाभावीकही होते. कारण तोपर्यंत मराठी रसिकाला अभंग, ओव्या, कवीता, लोकगिते, शाहिरी पोवाडे आदिंची चांगलीच ओळख होती. पण, ‘गझल’ काय किंवा ‘हायकू’ काय हे काव्य प्रकारच मराठी लोकांना नवे होते. याचा अर्थ गझल हा काव्य प्रकार मराठीत नव्हताच असे नाही. पण, त्याची व्याप्ती एकुणच कमी होती. त्यामुळे गझलेला लोकाश्रय मिळावा, ती जनमानसात रूजावी यासाठी सुरेश भटांनी गझलचे सादरीकरण करत महाराष्ट्र आणि देश-विदेशात अनेक कार्यक्रम केले. ज्यामुळे मराठी गझलेचा प्रचार-प्रसार झाला. गझलला मान मिळवून देण्याचं काम सुरेश भटांनी केलं. सुरेशजी यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी, गझल यांचा आयुष्यभर मनापासून आभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला.

एका सधन कुटूंबात सुरेश भट यांचा जन्म विदर्भातल्या अमरावतीचा. त्यांचे वडील पेशाने डॉक्टर होते. त्यांना कवितेची फारशी गोडी नव्हती. पण, सुरेश भटांच्या आईला मात्र कवितेची भारी आवड. त्यांना अनेक कविंच्या अनेक कवीता तोंडपाठ होत्या. त्यातूनच सुरेश भटांना कवितेची गोडी निर्माण झाली. त्या काळी पोलिओच्या आजारावर प्रभावी इलाज होत नसे. त्यामुळे अनेक मुलांना पोलिओच्या त्रासातून जावे लागे. जो त्रास आयुष्यभर सोसावा लागे. सुरेश भटांनाही तो सोसावा लागला. ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.
सुरेश भटांचा संपूर्ण शिक्षण त्यांच्या जन्मठिकाणी अमरावतीलाच झाले. कला शाखेतून पदवीधर असलेले सुरेश भट बी.ए. च्या शेवटच्या वर्षी दोन वेळा नापास झाले होते. पूढे १९५५ साली ते ते उत्तीर्ण झाले हा भाग वेगळा. शिक्षण संपल्यावर त्यांनी शिक्षकी पेशा स्विकारला. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. पण ते काही लिहित होते ती गझल आहे याची सुरेश भट यांना सुतराम माहिती नव्हती. त्यांचा उर्दू भाषेचाही चांगलाच अभ्यास होता. सुरेश भट हे जरी विदर्भातील असले तरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात त्यांची ओळख होती.

दरम्यान, भारतीय संगितात स्वत:चा अमिठ ठसा उमटवलेले संगितकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या नजरेला भटांचे लिखाण पडले. त्यांनी त्यांच्या गझल (तोपर्यंत भटांच्या लेखी असलेल्या कविता..) संगितबद्ध केल्या. इतकेच नव्हे तर, त्या संगितबद्ध केलेल्या गझल अनेक मराठी चित्रपटांमधूनही प्रसिद्ध झाल्या. ज्याचे चित्रपटरसिंकांनी प्रचंड स्वागत केले. सुरेश भटांनी एकूण पाच गझलसंग्रह लिहिले त्यात ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’, ‘सप्तरंग’ यांचा समावेश आहे. श्रृंगार, प्रेम, विरह तसेच मानवी जीवनातील दु:खाच्या (दर्द) विवीध छाटाही त्यांनी अत्यंत समर्थ आणि तितक्यात भावोत्कट पद्धतीने आपल्या गझलेतून व्यक्त केल्या.

त्याच्या गझलेची खोली पाहून विध्यापीठाने त्यांच्या गझल अभ्यासक्रमालाही ठेवल्या. आज त्यांच्यमुळे मराठी गझलला मानाचे स्थान मिळाले आहे. त्यांच्या गझल संग्रहांना आजही मोठी मागणी आहे. त्यांची गझल ही कोणत्याही एका वर्गाची नव्हती. अनेक साहित्यिकांनी गझलला मान्य केले नव्हते पण सुरेश भट लढले आणि त्यांनी गझलला अधिकॄत सन्मान मिळवून दिला.

सुरेश भट हे केवळ गझलकारच नव्हते तर, ते एक हाडाचे पत्रकारही होते. ते स्वत: एक साप्ताहीक चालवत. ज्यातून त्यांची बेधडक लेखणी तळपत असे. सुरेश भटांची गझल कधीच त्यांनी स्वत:पूरती ठेवली नाही. त्यांनी आपल्या गझलेतून रसिकांना चिंब केलेच. पण, अनेक नवे उमदे गझलकार तयार होण्यासही प्रोत्साहन दिले. गझल जनमानसात लोकप्रिय व्हावी यासाठी त्यांनी गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून ‘गझलेची बाराखडी’ नावाची एक पुस्तिका लिहिली होती. अनेक वाचकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलाच. पण, नवोदीत गझलकाराने ती हमखास सोबत बाळगावी आणि वरचेवर अभ्यसावी.

हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, गजलनवाज भिमराव पांचाळे यांसारख्या अनेक दिग्गज गायकांनी भटांच्या गझल आणि कवितांना स्वर दिला आहे. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. आपल्या दोन मुलांपैकी एकाच अपघाती मृत्यू भटांना उघड्या डोळ्यांनी पहावा लागला होता. त्यांचा दुसरा मुलगा गझलकार असून, वडीलांनी दाखवलेल्या वाटेवरून मार्गस्त आहे. मुलगा चितरंजन हा सुद्धा वडीलांच्याच पावलावर पाऊल देत एक उत्तम गझलकार म्हणून प्रसिद्ध आहे. 15 एप्रिल 1932 ला जन्मलेल्या या  गझलसम्राटाचे हृदयविकाराच्या झटक्याने १४ मार्च २००३ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले.

No comments:

Post a Comment