Monday, 26 November 2018

मुलगी वाचली

मुलगी वाचली

पोलिस ठाण्यातील फोन वाजतो. जान्हवी फोन उचलते. जान्हवी ही या पोलिस ठाण्यातील वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी आहे. घडलेली घटना फोनवरून ऐकून घेते. दोन हवालदार आपल्या सोबत घेऊन घटनास्थळी पोहचते. घटनास्थळी एका कचराकुंडीत जान्हवीला एक नवजात मुलगी सापडते. ती नवजात मुलगी खुप जोरजोरात रडत असताना जान्हवी तिला उचलते व तिथे जमलेल्या जमावाशी त्या नवजात मुलीची चौकशी करते. या मुलीला तेथे कोणी व कधी ठेवून गेले हे कोणीच पाहीले नाही. जान्हवी वेळ न घालवता पोलिस वाहनात बसते व तातडीने रूग्णालयात त्या नवजात मुलीला दाखल करते. नवजात मुलीचे आई वडील कोण आहे याचा शोध ती घेते पण तिला यश मिळत नाही. ती नवजात मुलगी बरी झाल्यावर तिला अनाथ आश्रमात ठेवण्याचा जान्हवी निर्णय घेते.
जान्हवी पोलिस वाहनात बसून जात असताना अचानक एक वयस्कर व थकलेली स्री रस्ता ओलांडताना जान्हवीच्या पोलिस वाहनाला येऊन धडकते व ती जमीनीवर कोसळते. त्या स्त्रीला डोक्याला खुप मार लागलेला आहे. रक्त वाहत आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्त्रीला शुद्ध नाही. तशाच अवस्थेत जान्हवी त्या स्त्रीला रूग्णालयात दाखल करते. रूग्णालयात जाईपर्यंत सखुचे रक्त खुप वाहत होते. जान्हवीच्या गाडीला धडकते तिचे सखु नाव आहे.  रूग्णालयात दाखल केल्यावर सखुला रक्ताची गरज होती. रक्त मिळाले तरच ती जगू शकत होती. डाॅक्टरांनी खुप प्रयत्न करूनही तिला रक्त मिळू शकले नाही. शेवटी जान्हवीने डाॅक्टरांकडे तिच्या रक्ताचा गट तपासण्यास सांगितले. देवाच्या कृपेने जान्हवीचा आणि सखुचा रक्तगट जुळला आणि सखुचा जीव वाचला. सखु बरी होईपर्यंत डाॅक्टरांच्या देखरेखीखाली होती. सखु पुर्ण बरी झाल्यावर जान्हवीने तिची चौकशी केली. सखुला कोणी नव्हते. ती एकटीच राहत होती. मिळेल ती कामं करून आपलं पोट भरत होती. सखुला जान्हवीने रूग्णालयात दाखल केले व रक्तही दिले म्हणून सखुचा जीव वाचला हे सखुला डाॅक्टरांकडून कळाले तेव्हापासून सखु जान्हवीला देव मानू लागली.
तिला कोणी नसल्यामुळे जान्हवी सखुला स्वतःच्या घरी घेऊन येते. जान्हवी आपल्या घरात शिरताना उंबरठ्यावरूनच तिच्या आई वडीलांना आवाज देत घरात शिरते. जान्हवीबरोबर सखुला पाहून रावसाहेब व मालतीबाई यांना आश्चर्य वाटते. रावसाहेब हे जान्हवीचे वडील व मालतीबाई आई आहे. रावसाहेब व मालतीबाईंना समोर पाहून सखुच्या पायाखालची जमीनच सरकते. ती घाबरते व हातात पदराचं टोक धरून तोंडापर्यंत घेते. त्या दोघांना समोर पाहून सखुच्या डोळ्यात पाणी येते. तिघेही सखुला तिच्या रडण्याचं कारण विचारतात पण सखु काहीही सांगत नाही. जान्हवीने सखुच्या हालचाली पाहून असा अंदाज लावला की नक्कीच सखु काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी काहीतरी महत्वाची बाब आहे जी सखु सर्वांपासून लपवत आहे. खुप दिवसांनी सखुला चांगलं जेवायला मिळालं. त्या रात्री जान्हवीला झोप आली नाही. सखु का रडली असावी? काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे? अशा विचारांनी जान्हवी गोंधळून गेली. नेहमीप्रमाणे जान्हवी ड्युटीवर गेली. सखु आता जान्हवी आणि तिच्या कुटूंबात चांगलीच  रूळत होती. पण एक अशी गोष्ट होती जी सखुची चिंता वाढवत होती. रावसाहेब व मालतीबाई यांनी सुद्धा सखुला विचारण्याचा प्रयत्न केला पण सखु काहीही सांगत नव्हती. जान्हवी संध्याकाळी घरी आली. ती आज जास्तच थकली होती आणि वैतागली सुद्धा होती. घरी आल्यावर तीने आपल्या डोक्यावरील पोलिस टोपी टेबलवर ठेवत तीची बडबड व चिडचिड सुरू झाली.  नेहमी शांत राहणारी जान्हवी आज इतकी का चिडली आहे हे जान्हवीच्या आई वडीलांना कळत नव्हते. तीची चिडचिड सखु देखील पाहत होती. थोडा वेळ थांबून मालतीबाईने जान्हवीला चिडचिडीचे पुन्हा कारण विचारले तेव्हा जान्हवी सांगू लागली की, "रोज वेगवेगळ्या तक्रारी माझ्याकडे येतात. त्यात जास्त म्हणजे महिलांवरील अत्याचार, वृद्धांचा छळ आणि रस्त्यावर, देऊळात, कचरापेटीत सापडणारी नवजात बालके. अशा नवजात बालकांना सोडून जाणाऱ्या आई वडिलांचा मला खुप राग येतो."

हे सारं सखुही ऐकत होती. सखु जोरजोरात रडू लागली. तिच्या रडण्याचं कारण कोणालाच कळत नव्हतं. सखु जान्हवीच्या दिशेने जोरात धावत आली आणि तिच्या दोन्ही पायाला हात लावत माफी मागू लागली. जान्हवी, रावसाहेब आणि मालतीबाईंनाही हा प्रकार लक्षात येत नव्हता. ही नुकतीच घरी आलेली बाई जान्हवीची माफी का मागत आहे हे कोणाच्या लक्षात येत नव्हतं. जान्हवीने सखुला माफी मागण्याचं कारण विचारलं तेव्हा सखु भुतकाळात शिरली आणि घडलेली घटना सांगू लागली. सखुची परिस्थिती फार गरीब होती. सखुचा नवरा आजारपणात मरण पावला तेव्हा सखुने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीला कसं पोसायचं, शिक्षण कसं होणार या विचारात सखु असायची म्हणून सखुने आपल्या नवजात मुलीला फार दुरवर जाऊन एका रस्ताच्या कडेला असलेल्या कचरापेटीत ठेवून आली. हे सारं सांगत असताना सखु ही रावसाहेब व मालतीबाई यांच्याकडे पाहत रडत बोलू लागली की, "साहेब आणि बाईसाहेब जेव्हा मी माझ्या मुलीला कचरा पेटीत ठेवून आडोशाला उभी असताना तेथून एक चारचाकी गाडी जात होती. माझ्या मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून तेथे गाडी थांबली व त्या गाडीतून एक जोडपे उतरले आणि माझ्या मुलीला घेऊन गेले. ते जोडपे म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही ते म्हणजे तुम्हीच होतात. मी या घरात पाऊल ठेवताच तुम्हाला पाहीलं आणि ओळखलं." हे ऐकताच जान्हवी, रावसाहेब आणि मालतीबाई आश्चर्यचकित झाले. त्यावर रावसाहेब आणि मालतीबाई एकत्र बोलले, "म्हणजे, तुम्ही जान्हवीच्या आई?" आज जान्हवीला तिची आई मिळाली. तिला खुप आनंद झाला. परिस्थितीमुळे सखुने आपल्या पोटच्या मुलीला कचराकुंडीत टाकले होते ती मुलगी आज वरिष्ठ पोलिस आहे. सखुने सर्वांची माफी मागितली. जान्हवीने सखुला म्हणजे तिच्या सख्खा आईला कडकडून मिठी मारली.

यल्लप्पा कोकणे
२६ नोव्हेंबर २०१८

No comments:

Post a Comment