Monday, 31 July 2023

बाप

बापाची जरी चाहूल लागली तरी मुलं मनातली भीती, संकटे विसरून जातात व आनंदाचं वातावरण निर्माण होऊन उत्सव साजरा केल्यासारखं वाटतं. कारण "बाप" या नावातच एक अद्भुत शक्ती आणि सकारात्मक उर्जा आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
३१ जुलै २०२३

Tuesday, 25 July 2023

वायफळ खर्च

नोकरी करून किंवा एखादा व्यवसाय करून ईमानदारीने कमावलेले पैसे खर्च करताना हजार वेळा विचार केला जातो. हौसमौजसाठी पैसा खर्च करण्याचं धाडस अजिबात होत नाही. याउलट, चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा हा व्यसन, वायफळ खर्च यावर होत असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२४ जुलै २०२३

Monday, 24 July 2023

पाणी वाहत चालले

पाणी वाहत चालले

पाणी वाहत चालले
डुलवित शेतरान सारे
शेतकरी सारे खुशीत 
वाहती आनंदाचे वारे

पाणी वाहत चालले
चिंता गावाची वाढली
खचले डोंगर वस्तीवर
किती प्रेतं ही गाढली?

पाणी वाहत चालले 
गमवला जीव पुरात
गेला! माणूस वाहून 
राही आठवण उरात 

पाणी वाहत चालले
दिला पावसाने धोका
ठप्प होई जनजीवन 
चुके काळजाचा ठोका

पाणी वाहत चालले 
पाऊस हा माजलेला
असेलही तो कसाही
आहे नेहमी गाजलेला

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२४ जुलै २०२३

Wednesday, 12 July 2023

सुखाला मिठी

दुःखाची चाहूल लागल्यावर भोगत असलेल्या सुखाचा विसर पडायला लागतो. काळजी वाढायला लागते आणि समोर आलेल्या सुखाला मिठी मारायचं राहून जातं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१२ जुलै २०२३

Saturday, 8 July 2023

मायेचा पाझर

मायेचा पाझर

जन्म तर घेतला आपण
उद्देश काय माहीत नाही!
कोणासाठी जगत आहे?
उत्तर काय माहीत नाही!

कोण आहेत ही सारी नाती
ज्यासाठी जीव जळत आहे
का बरं यांच्यासाठीच फक्त?
आयुष्य आपलं पळत आहे

स्वतःसाठी जगता येत नाही
आपल्यात नाती दडली आहे
मुळापासून काढता येत नाही
इतकी खोलवर जडली आहे

कोणत्याही स्वभावाची असो
त्यांच्यासाठी जीव तुटत आहे
दगड मनाच्या माणसांसाठी ही 
का? मायेचा पाझर फुटत आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ जुलै २०२३

Saturday, 1 July 2023

ममता आणि प्रेरणा

एखादी हलकी जखम झाली किंवा इतरांचं दुःख कानावर पडलं तर ओठातून नकळत "आई गं" शब्द निघतो. आणि एखादं स्फूर्तीच/ताकदीचं काम असेल तर "बाप रे" असा शब्द ओठातून सहज निघतो.

अर्थातच, आपल्या आयुष्यात आईची ममता आणि वडिलांपासून मिळालेली प्रेरणेला फार महत्त्वाची आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०१ जूलै २०२३