जो नको तो प्रकार मी केला
या जगाचा विचार मी केला
वेदना दे अजून थोडीशी
शब्द माझा तयार मी केला
मी स्मितानेच मारले अश्रू
हुंदका हद्दपार मी केला
पाहिले एकदाच स्वप्न तुझे
एक सौदा उधार मी केला
जीवनाशी अता पटे माझे
सोसण्याचा करार मी केला
- प्रदीप निफाडकर
No comments:
Post a Comment