Wednesday, 31 January 2018

मलई

अंथरतो मी जेव्हा चटई
डोळे मिटती वासे तुळई

मुले टिव्हीच्या समोर बसली
शुभंकरोती गाते समई

गरिबी अपुली अशीच राहो
आपण दोघे एकच दुलई

हळद उतरली पोर जळाली
कोपऱ्यात ही रडते सनई

कसेबसे जगतात कवी हे
कुबेर झाले सारे गवई

कविता माझी दुधाप्रमाणे
गझला म्हणजे नुसती मलई

-- प्रदीप निफाडकर

No comments:

Post a Comment