Wednesday, 31 January 2018

पाखराला तमा न दाण्याची

पाखराला तमा न दाण्याची
वेळ आहे मजेत गाण्याची

ठेवले मी सजून हदयाला
सोय केली तुझ्या रहाण्याची

मी न गेलो तिच्याच वाटेला
वाट होती जिथे ठिकाण्याची

आवडू लागली जगास गझल
(लेक आहेच ती शहाण्याची)

काढले चित्र मेनकेचे मी
भूक होती तुला पहाण्याची

दुःख उधळून टाकले सारे
रीत आहेच ही घराण्याची

चंद्र माझ्याचसारखा आहे
पाहतो वाट सूर्य जाण्याची

पाय सोडून बैसले कोणी
थांबली हालचाल पाण्याची

वाढले भाव सर्व वस्तूंचे
जिदगी फत्त* चार आण्याची

संमती द्या ‘प्रदीपराजे’ हो !
हौस पुरवा तिच्या उखाण्याची

— प्रदीप निफाडकर

No comments:

Post a Comment