*लघु गुरु शंका निरसन*
-इंदू
*fb.me/INDUJI.in
दोन लघूंचा गुरु करणे एकंदर काव्यलेखनात वापरली जाणारी एक प्रकारची सवलत आहे. ती वापरणे हाही एक कलेचाच भाग आहे. कारण ती वापरताना ती अतिशय चपखलपणे वापरता आली पाहिजे. खास करून गजलेत तर थोडी जास्तच काळजी घ्यावी लागते. कारण गजल हा गेय काव्यप्रकार आहे. गजलेत लय, यती, आणि चाल या तिन्ही निकषावर कुठेही तडजोड चालत नाही. गजलेत यती घेण्याचे जरी स्वातंत्र्य असले तरी ती कायम ठेवणे हाही एक महत्वाचा निकष आहे. यती हा मुद्दा अलग आहे. त्यावर योग्यवेळी अलग भाष्य करूच.
एक महत्वाचा नियम म्हणजे कि आपण फक्त एका शब्दातील दोन लघूंचा गुरु करू शकतो. दोन वेग वेगळ्या शब्दातील लघूंचा गुरु करू नये. हा अगदी बेसिक नियम आहे. हा जोवर तुम्ही गजल हा काव्यप्रकार अनुभवणार आहात तोपर्यंत लक्षात ठेवा..
पण, तूर्त इतकेच सांगावेसे वाटते की, दोन लघुचा गुरु करताना तो इतका सहज झाला पाहिजे की गजलेच्या वाचनात किंवा गायनात कुठेही त्याची जाणीव होता कामा नये. यासाठी विशेष असे लिखित नियम नाहीत पण अलिखित पणे बरेच नियम व निकष आहेत. जस जसे आपण पुढे जाऊ तसतसे आपण आणखी खोलवर समजावून घेत जाऊ.
तूर्त काही उदाहरणे देत आहे.
*नियम* = लगा (गाल होत नाही)
*मरण* = लगा (गाल होत नाही)
*रुजवले, हसवले, रडवले, बसवले* = लललगा किंवा याचा लगागा होऊ शकतो पण गालगा होत नाही आणि केला तर तो इतका सहज होत नाही. त्यामुळे तसा तो करू नये.
अशी बरीच उदाहरणे आहेत.
शिवाय.
*य, व, न, र, ण, म* या अकारांत अक्षरांचा लघु पासून गुरु बनविताना विशिष्ठ प्रकारे बनवावा लागतो. एखाद्या शब्दात जर हि अक्षरे येत असतील तर प्रथम या अक्षरांच्या आधीच्या अकारांत अक्षराशी याची संधी करून गुरु साधावा कारण हि अक्षरे अशा वेळी व्यंजनासारखा व्यवहार करतात. इकारांत उकारांत, ओकारांत वेळी ती त्रयस्थ राहतात
उदा:
*व हा आधीच्या अक्षरावर एक काना एक मात्रा याप्रमाणे येतो*
*अवयव (लललल)* = अवयौ/औयौ/औयव = हा शब्द लगागा, गागा गालल असाही होऊ शकतो
*मानव (गालल)* = मानौ = गागा होऊ शकतो
*य हा आधीच्या अक्षरावर मात्र्याप्रमाणे येवू शकतो.*
*सवय (ललल)* = सवै = लगा (गाल नाही) (इथे मध्ये व असूनही य ने प्राधान्य घेतले आहे, हे लक्षात घ्यावे)
*मनोदय (लगालल)* = मनोदै = लगागा
*न म व ण हि अक्षरे आधीच्या अक्षरावर अनुस्वाराप्रमाणे येवू शकतात*
*नियम (ललल)* = नियं = लगा (इथे तुमच्या लक्षात आले असेल कि इथे य हा त्रयस्थ होतो कारण नि इकारांत आहे. त्याचमुळे हा शब्द गाल होत नाही.)
*समजूत(ललगाल)*= सम्जूत = गागाल होतो
*सणवार (ललगाल)* = संवार = गागाल
*सदन (ललल)* = सदं = लगा (इथे गाल होऊ शकत नाही)
*संगम (गालल)* = संगं = गागा होऊ शकतो
*र हा नंतरच्या अक्षरावर रफाराचे काम करतो व त्याच्या आधीचे अक्षर गुरु करतो*
*सरदार (ललगाल)* = सर्दार = गागाल
*घरदार (ललगाल)* = घर्दार = गागाल
*सरकार (ललगाल)* = सर्कार= गागाल
*अजून भरपूर उदाहरणे घेता येतील पण, हा सर्व व्यापा पाहता ते अतिशय अशक्य आहे. अर्थात हे सर्व अक्षरांचा उच्चार कसा होतो त्यानुसार ठरत असल्याने प्रत्येक वेगळ्या शब्दाला वेगळी लगावली लागू होते. इथे मी विषद केलेले सर्वच नियम सर्वत्र तसेच्या तसे लागू होतीलच असे नाही. याला बरेच अपवाद आहेत व ते अनुभवातून समोर येतील तसे ते उलगडत जातील. ज्या दोन लघुंची सहज संधी होऊन गुरु बनतो तेच उत्तम. सवलतही अशी घ्यावी कि ती सवलत वाटूच नये. उलट घेतलेली सवलत इतकी आकर्षक असावी की त्यामुळे संपूर्ण रचनेची शोभा वाढावी अशा वेळी ती सवलत स्वागतार्ह ठरते. म्हणूनच मी सुरवातीला सवलत घेणे सुद्धा एक कला आहे असे नमूद केले होते.*
मीही अजून गजल लेखन शिकत आहे... अजून खूप शिकणे बाकी आहे. माझ्या अल्पमतीने व गुरूंच्या आशीर्वादाने जे शिकलो तेच आपणा सर्वांच्या उपयोगी पडावे म्हणून इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चूकभूल देणे घेणे.
धन्यवाद
-इंदू
No comments:
Post a Comment