Thursday, 24 February 2022

श्रद्धांजली

गझल : श्रद्धांजली

संपून राख गेली , हाडे विकून गेली !
ते मागतात आता आपापली दलाली !

गेली निघून मंदी, आली फिरून  तेजी  ,
केल्या सटोडियांनी वेगात हालचाली

त्यांच्या जुन्या फडाची आली नवीन बारी ,
सारी नवीन गाणी ! साऱ्या  नवीन चाली !

हे चेहरे कुणाचे नाहीत ओळखीचे ?
काही जुने लफंगे ! काही नवे मवाली !

नाही मुळी तसा तो ओसाड राजवाडा ,
आहेत राजवंशी तेथे अजून पाली !

आम्हांस हुंदक्यांचा धंदा जरी जमेना ,
त्यांच्याच आसवांची वाहे तुडुंब नाली  !

नाही दिला फुकाचा त्यांनी विनम्र खांदा ,
ते प्रेत वाहण्याची आता घेती हमाली !

कंटाळले जसे ते गाऊन शोकगीते ,
आली त्यांच्या ओठांवरी कवाली !

त्यांनाच हाक मारा पिंडासही शिवाया !
त्यांचा 'खुराक' आता त्यांच्या करा हवाली !

त्यांनी दिवंगताची  केली कशास पूजा ?
पेल्यामध्येच त्यांची श्रद्धांजली बुडाली !

त्यांनी हिशेब केला तेथेच लाकडांचा 
त्यांना कमावण्याची संधी पुन्हा मिळाली !

गझलसम्राट : सुरेश भट

No comments:

Post a Comment