Sunday, 26 January 2020

जेव्हा लढाईचा खरा डंका

जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला
आपापल्या तंबूमध्ये जो तो दडाया लागला

माझा अखेरीचा अता घेऊ कसा हा घोट मी
हातातला पेला पुन्हा खाली पडाया लागला

ह्या पांगळ्या पायांसवे मी चाललो होतो जरी
बेमान आयुष्या अता रस्ता अडाया लागला

गेला वधस्तंभाकडे कैदी सुखाने शेवटी
ज्याने दिली होती सजा तो आवडाया लागला

त्याला न आले बोलता आजन्म ज्याने सोसले
ज्याला हवे ते लाभले तो ओरडाया लागला

वाया न गेले शेवटी जे रक्त माझे सांडले
माझा जुना मारेकरी आता रडाया लागला

सुरेश भट

Sunday, 19 January 2020

कवी

कवी

दुनिया झोपली गाढ सारी
कवी रात्री कशाला जागतो?
अंधार खोलीत एकटा बसून
जगाच्या तो भावना मांडतो

माणसांची गर्दी आहे तरी
कवी जातो शब्दात हरवून 
एकटा लिहीत असला तरी
शब्दात घेतो जग सामावून 

अक्षरांचा प्रवास हा नेहमी
थांबतो कोऱ्या कागदावर
मनात दाटलेलं मांडताना
राज्य करतो कवी शब्दांवर 


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१९ जानेवारी २०२०

Friday, 3 January 2020

माणूसकी

पैशाच्या मागे धावत असताना नात्याच्या वळणावर थोडं थांबून आपल्या माणसांत रमून जो माणूसकी कमवतो तोच खरा श्रीमंत माणूस असतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ डिसेंबर २०१९