Thursday, 31 May 2018

हसण्याचे हे नाटक आहे

वृत्त :- पादाकुलक
मात्रा वृत्त

एका ओळीत
८+८ असे मात्रांचे दोन गट

हसण्याचे हे नाटक आहे
पण ओठांना जाचक आहे

किती वाईट नेता होता
किती चांगले स्मारक आहे

या विश्वाचा कवी लाडका
कुठेतरी संपादक आहे

काल मला हे दु:ख म्हणाले
"तुझे सोसणे काटक आहे"

ह्रदय म्हणाले तिला भेट जा
मी ही आज्ञाधारक आहे

:- प्रदीप निफाडकर

Thursday, 17 May 2018

मी मराठी

अभिमान आहे बोलतो मराठी
वाचतो मराठी ऐकतो मराठी
सेवा मराठीची करीत घडतो
हृदयात फक्त जपतो मराठी

माय मराठी माझी भाषा
सांगतो मी जगाला गर्वाने
आहे लाभले भाग्य मोठे
वाहते रक्तात तीच वेगाने

दिले झोकून स्वतःला आता
नांदते कवेत माझ्या मराठी
झाले संस्कार माझ्यावर सदा
रूजते कलेत माझ्या मराठी

अर्पितो तनमन मराठीस  सारे
गर्व आहे मराठी असण्याचा
नसात भिनली मराठी  आता
हर्ष आहे अस्मिता जपण्याचा

प्राण ओतून जपतो मराठी
श्वासात संचार करते  मराठी
गोडवा मराठीचा गातो आहे
ध्यासात सदा राहते  मराठी

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ मे २०१८

Saturday, 12 May 2018

नजर पक्षी

होऊन सखी रात्र हल्ली
आठवण तुझी घेऊन येते,
"लाजून हासणे" आठवत
नकळत रात्र सरून जाते !

लगबग नजरेची सुरू होते
रोज चोरून तुला पाहण्याची,
हो, यात खरी गम्मत आहे
तुलाच आठवत जगण्याची

कळेल का माझी प्रित तुला?
कळेल का चाललेली धडपड?
यालाच म्हणावे का "प्रेम" सखे?
आठवणीतही असते धडधड !

करून प्रयत्न खुप झाले
सापडेना मार्ग भेटण्याचा,
वाट पाहतोय नजर पक्षी
प्रेम जाळ्यात फसण्याचा !

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ मे २०१८

Wednesday, 2 May 2018

भेटीचा क्षण

हरवलेलं मन तुझ्या प्रेमात
तुझाच फक्त शोध घेतो
काय सांगू प्रिये तुला
भेटीचा क्षण आधार देतो

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ मे २०१८

मन वेडे प्रेमात झुरलेले

वाढलेले असते वादळ
दोघांच्या मनात चाललेले
कसे कळणार एकमेकांना
मन वेडे, प्रेमात झुरलेले

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ मे २०१८

होत नाही धाडस

छंद मी जोपासला
मनातलं लिहायचे
होत नाही धाडस
थेट तुला बोलायचे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ मे २०१८