राख संभाळून ठेवा राख झालेल्या घराची
संपली नाही लढाई यार हो नामांतराची....
ह्या भिकारी भामट्यांची जिंदगी आहे कितीशी ?
वाजते जोरात पुंगी चोरलेल्या गाजराची...
संतहो, आम्ही जरी हे जन्मण्याचे पाप केले
लागली नाही अम्हाला लुत रोगी ईश्वराची...
काय न्यायाचा निवाडा एवढा दुर्बोध होता...?
ही कशी आताच झाली मागणी भाषांतराची...?
कालही अंधार होता..आजही अंधार आहे..
काल सूर्यालाच दारे बंद झाली अंबराची...?
चालती रेतीवरी ही मोडकी त्यांची जहाजे
पाहिली कोठे तयांनी लाट साधी सागराची...?
कालच्यापेक्षा दयाळू हा नवा आला कसाई
घालतो गाईस हाडे कापलेल्या वासराची....
जे उद्या होणार त्याचा आज मी आहे पुरावा
घे भविष्या नोंद माझ्या बोलक्या हस्ताक्षराची...
सुरेश भट
No comments:
Post a Comment