Friday, 23 February 2018

नम्र माझ्या वागण्याने घातला हा घोळ मी

नम्र माझ्या वागण्याने घातला हा घोळ मी
जो मला भेटेल त्याला वाटतो किरकोळ मी

झाड, पक्षी, लाट, वारा लागले नाचायला
फत्त* गुणगुणलो मनाशी एक साधी ओळ मी

मी कुठे बोलेन म्हणुनी जीभ त्यांनी छाटली
पेरला बोटात माझ्या मग विजेचा लोळ मी

दाद रसिकांनी दिली पण ऐकली नाहीच मी
(काय मौनाच्या कुणाचा ऐकला कल्लोळ मी)

ती तिथे नाही सुखी हे मी बरोबर ताडले
फत्त* भिजलेल्या उशीची पाहिली रे खोळ मी

रोज अंगाला चिकटते वैर, मत्सर, वासना
ते धुण्यासाठीच करतो रोजची अंघोळ मी

— प्रदीप निफाडकर

No comments:

Post a Comment