Friday, 19 January 2018

पराभव - सुरेश भट

सुरेश भट आणि त्याच्या गझल हा मराठी साहित्याचा महत्वाचा भाग आहे. त्यांच्या गझलांमधील आशावाद आणि खंबीरपणा यांना तोडच नाही. कितीही दुर्दम्य परिस्थिती उद्भवली, संकटांचे डोंगर समोर उभे राहिले, तरी परिस्थितीला शरण न जाता त्या परिस्थितीला नमवायची धमक तरी त्यांच्या गझल मधून दिसून येते; नाहीतर वाईटातून चांगले शोधून काढून त्याचे उदात्तीकरण करण्याची खासीयत तरी आढळून येते. त्यांची अशीच एक भावलेली गझल...

             पराभव - सुरेश भट

झालो तसा कुठे मी बदनाम बोलवांनी?
झाला समुद्र केव्हा घायाळ तारवांनी?

येथील माणसांशी माझे जीवंत नाते,
वाळीत टाकलेले आहे मला शवांनी!

त्या मैफलीत माझी होती कुठे हजेरी?
ते धन्य धन्य झाले त्यांच्याच वाहवांनी!

आता कुणी कधीही घेऊ नये भरारी...
ओलांडले नभाला केव्हाच कासवांनी!

आरोपही कराया मिळतो कुठे पुरावा?
सारे गुन्हेच आता सजतात उत्सवांनी!

तेव्हा तुझ्यापुढे मी वठलो तरूप्रमाणे...
आता फुलारतो मी नुसत्याच आठवांनी!

आता उजाडताना माझा निरोप घे तू...
सांगू नये फुलांना भलतेच या दवांनी!

आली न याद माझी कुठल्याच श्रावणाला,
विझवून टाकले मी आयुष्य आसवांनी!

एकेक युद्ध माझे मी हारलो, तरीही
मजला अजिंक्य केले माझ्या पराभवांनी..!!

No comments:

Post a Comment