पुर्वी आम्ही पोस्टमन काकाची खुपच वाट पाहत असे. कारण, ताईच पत्र येणारं असतं. ताई आम्हाला आठवड्यातून दोनदा तरी पत्र लिहायची. आम्हीही तिला पत्राचे उत्तर लगेच पाठवत असे. पत्र वाचताना माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत असत कारण तो वेगळाच आनंद असायचा. ती एक माया, ममता होती. पत्रातील प्रत्येक अक्षरात ताईचा चेहरा दिसत असे. रात्रीचे जेवण व सर्व आवरून झाले की आम्ही सर्वजण एकत्र बसून पत्र लिहत असे. तो अनुभव फार वेगळाच होता. आई-पप्पा पत्राचा मजकूर सांगत असत व ते मी लिहायचं काम करायचो. खुप छान वाटायचं पत्र लिहताना. आम्ही तर पोस्ट ऑफिसमधून अंतरदेशीय पत्र व पोस्ट कार्ड खुप आणून ठेवायचो.
आता ते सारे दिवस बदलले आहे. पोस्टमन काकांची क्वचितच भेट होते. त्यांच्या हातात पत्र असतात पण बहुतेक सरकारी कामकाजाची. आम्ही पुर्वी पत्र लिहायचो ते म्हणजे नाती जोडण्यासाठी आणि आता कोर्टाकडून पत्र (नोटीस) पोस्टमन काकाकडे आलेली असतात ते म्हणजे संसार मोडण्यासाठी. खुप अवघड परिस्थिती आहे. आजच्या काळात कोणीही दूरच्या नातेवाईकांना पत्र लिहिताना पाहीलं नाही. पत्र लिखाण फार कमी झालंय (पत्र लिखाण थांबलेच आहे असं म्हणायला हरकत नाही). आजच्या काळात आठवण आली की सरळ फोन उचलतात आणि दोन शब्द बोलून मोकळे होतात. आजच्या टेक्नाॅलाॅजीच्या युगात नवेनवे स्मार्ट फोन येत आहेत. समोरच्या व्यक्तीला जरी मोबाईल वरून संदेश पाठवायचा असेल तर लिखाण कमी व चिन्हच (emoji) जास्त असतात. एवढं जग व्यस्त/कामात गुंतलेला असतो. या अशा काळात पत्र हरवलं आहे.
आपण जे कधी प्रत्यक्ष बोलू शकत नाही ते पत्राच्यारूपात मत मांडल्यावर मनावरचं ओझं हलकं होतं. मुख्य म्हणजे आपल्या हातून काहीतरी लिखाण झालं आहे याचा आनंद आपल्याला मिळतो. चला मग थोडा वेळ काढून पत्र लिहूया. पहा किती धम्माल येईल.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ नोव्हेंबर २०१७
No comments:
Post a Comment