Friday, 16 December 2016

आई

रक्त मांसाच्या गोळ्याला
जपून ठेवले तू पोटात।।
सोसून कित्येक यातना
आणलेस मला जगात।।१।।

भूक माझी भागवली
स्वतः उपाशी राहून।।
आई, मला तू जपले
संकटाशी सामना करून।।२।।

देवाला नमन करताना
तुझा चेहरा आठवतो।।
देवापेक्षा महान आई तू
मनात तुलाच साठवतो।।३।।

पर्वतासारखी ऊभी तू
रक्षण माझे करण्यास।।
पाहून तुझी जिद्द आई
बळ येई मला जगण्यास।।४।।

आई कधी तू सावली
कधी रखरखते ऊन।।
शीस्त लावण्यास मला
जगलीस कठोर होऊन।।५।।

चूकीच्या वाटेने जाताना
नेहमी मला अडविले।।
सत्याचा मार्ग दाखवत
आई, मला तू घडविले।।६।।

अपूरा आहे जन्म
सेवा तुझी करण्यास।।
आई, शिकवले मला तू
माणूस म्हणून जगण्यास।।७।।

तू लावलेल्या शीस्तीमुळे
आहे समाजात मान।।
आहे तुझा मी लेकरू
वाटतो मला अभिमान।।८।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ डिसेंबर २०१६ 

No comments:

Post a Comment