साथ हवी जगण्याला
सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।धृ।।
विरल्या धुक्यात वाटा, धुंद झाल्या दिशा
भास तुझाच होतो, जडली प्रेमाची नशा
नाते आपले अतूट, सांगे ते दव पानाला
सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।१।।
पदराशी खेळ करता, पाहसी रोखून नजरा
खिळवून ठेवतो मला, सुगंधी तुझा गजरा
समजावू किती,कसा, रात्री जागत्या स्वप्नाला
सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।२।।
आठवण तूझी ओली,पावसाळी बरसून गेली
क्षणात मनी प्रितीची वीज चमकावून गेली
सुगंध लपल्या फुलांचा, मोहवून गेला मनाला
सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।३।।
गंध मातीचा ओला, सांगे पाऊस पडून गेला
स्मरता रूप साजिरं, जीव हा वेडा झाला
सजवून ठेवतो मनी, त्या एक एक क्षणाला
सुर देऊन जा गाण्याला, स्पर्शून जा मनाला
साथ हवी जगण्याला, स्पर्शून जा मनाला।।४।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ मार्च २०१६
No comments:
Post a Comment