Thursday, 26 April 2018

तुझ्या घरी वळणाऱ्या रस्त्याकडे

तुझ्या घरी वळणाऱ्या रस्त्याकडे
पाऊल वळायला लागलं आहे
आपल्या पहील्या भेटीनंतर हे
असं घडायला लागलं आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ एप्रिल २०१८

Monday, 23 April 2018

तुझा चेहरा

आज तुझा, फक्त तुझाच
चेहरा का आठवत आहे?
मला तर काहीच कळेना
मी, का रात्र जागवत आहे?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ एप्रिल २०१८

दिसत नाही आंधळ्या कायद्याला

दिसत नाही आंधळ्या कायद्याला
दिरंगाई करतो जाणून बुजून
राजकीय वर्तुळ वाढले जाते
जात धर्माला आडवे आणून

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ एप्रिल २०१८

कळी जाते चिरडून

कळी जाते चिरडून
विझतो दिवा घरातला
का होत नाही बदल?
त्या जुनाट घटनेतला

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ एप्रिल २०१८

Monday, 9 April 2018

विचार मांडताना

चूका साऱ्या पदरात घेत
मार खाणारी ताई आहे
त्रास दिला जरी कितीही
हट्ट पुरवण्यास आई आहे

बोट धरूनी बाबांचे तेव्हा
हळूहळू चालायला शिकलो
नाते जपण्यास वेळ नाही
पैसे कमवण्याची घाई आहे

लहान असताना भाऊ, जो
मित्रा प्रमाणे वागत होता
संसार लागता त्याच्या मागे
अंतर पाडण्यास बाई आहे

करता विचार या साऱ्याचा
त्रास जीवाला फार होतो
विचार शब्दांत मांडताना
साथ देण्यास शाई आहे

– यल्लप्पा कोकणे
०९ एप्रिल २०१८

Sunday, 1 April 2018

मेल्यावरी जगाचे आभार मानले मी!

मेल्यावरी जगाचे आभार मानले मी!
जाऊ दिले मला हे उपकार मानले मी!!

तेव्हा जरी जरासा होतो.. जिवंत होतो!
सारेच श्वास खोटे उपचार मानले मी!!

केव्हाच सांत्वनाची केली न मी अपेक्षा!
अपुल्याच आसवांना नादार मानले मी!!

होत्या सुन्या घराच्या भिंती विवंचनांच्या!
बाहेरच्या बिळांना शेजार मानले मी!!

माझ्याच बोलण्याशी आजन्म बोललो मी!
विजनातल्या हवेला संसार मानले मी!!

आयुष्य संपतना इतकीच खंत होती!
काही भिकारड्याना दिलदार मानले मी!!

माझ्या पराभवाची समजूत घातली मी!
जे वार खोल गेले, ते यार मानले मी!!

प्रत्येक आरतीच्या तबकात मीच होतो!
प्रत्येक तोतयाला अवतार मानले मी!!

सुरेश भट