Wednesday, 31 January 2018

चुकलेच माझे

मी कशाला जन्मलो? - चुकलेच माझे!
ह्या जगाशी भांडलो! - चुकलेच माझे!

मान्यही केलेस तू आरोप सारे,
मीच तेव्हा लाजलो! - चुकलेच माझे!

सांग आता, ती तुझी का हाक होती?
मी खुळा भांबावलो! - चुकलेच माझे!

भोवतीचे चेहरे सुतकीच होते,
एकटा मी हासलो - चुकलेच माझे

चालताना ओळखीचे दार आले..
मी जरासा थांबलो! - चुकलेच माझे!

पाहिजे पूजेस त्यांना प्रेत माझे!
मी जगाया लागलो! - चुकलेच माझे!

वाट माझ्या चार शब्दांचीच होती..
मी न काही बोललो! - चुकलेच माझे!

सुरेश भट

कोण जाणे कोण हे जवळून गेले?

कोण जाणे कोण हे जवळून गेले?
चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!

जिंकला होता जरी मी डाव तेव्हा,
दान जे पडले मला उधळून गेले!

भेटण्यासाठी कुणी आलेच नाही...
लोक आलेले मला चघळून गेले!

हे खरे की, मी जरा चुकलोच तेव्हा,
लोकही वाटेल ते बरळून गेले!

लागली चाहूल एकांती कुणाची?
कोण माझ्या लोचनी तरळून गेले?

काय माझ्या मालकीचे अर्थ होते?
शब्द माझे भाबडे हुरळून गेले!

या दुपारी मी कुणाला हाक मारु?
ओळखीचे चेहरे वितळून गेले!

कोणता कैदी इथे कैदेत आहे?
रंग भिंतींचे कसे उजळून गेले!

पाठमोरा मी जरी झालो,तरीही
सूर्य येणारे मला कवळून गेले!

सुरेश भट

व्यर्थ

सुर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा,मी असा!

तू मला ,मी तुला पाहिले,
एकमेकांस न्याहाळिले;
-दुःख माझातुझा आरसा!

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा;
-खेळलो खेळ झाला जसा!

खूप झाले तुझे बोलणे,
खूप झाले तुझे कोपणे,
-मी तरीही जसाच्या तसा!

रंग सारे तुझे झेलुनी,
शाप सारे तुझे घेउनी
-हिंडतो मीच वेडापिसा!

काय मागून काही मिळे?
का तुला बात माझे कळे?
-व्यर्थ हा अमृताचा वसा

(रंग माझा वेगळा)

सुरेश भट

दर्जेदार

हा कसा आता उन्हाचा निर्दयी पाऊस आला?
मी मघाशी पाहिलेला मेघ काळाशार होता!

गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते...
हा कळीचा दंश होता! तो फुलांचा वार होता!

ह्या करंट्यांनी स्वतःचे फोडले आधीच डोळे..
(त्यांचियासाठी उद्याचा सूर्य अत्याचार होता!)

स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने
थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता!

गाडल्या त्यांनी पिढ्या अन् ठेवला नाही पुरावा
ह्या स्मशानाच्या धन्यांचा देव ताबेदार होता!

लागला आहे अताशा वेदनेचा शौक त्यांना
(एरवी, त्यांचा सुखाचा चोरटा व्यापार होता!)

चोरली माझ्या घराची राखही त्याने परंतू
मी न केला ओरडा..तो चोर अब्रूदार होता!

पाहिला नाही जरी मी चेहरा मारेकर्‍याचा
लोकहो, माझा तरीही खून दर्जेदार होता!

सुरेश भट

जगत मी आलो असा

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळिले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिर्‍हाइत;
सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा...
लोक मज दिसले अचानक, मी कुठे दिसलोच नाही!

(रंग माझा वेगळा)

सुरेश भट

आलाप

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते!

वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?

कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना...
करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते!

असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!

जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत होते!

बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!

मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल रात्री उसासणार्‍या हवेत होते!

 

(झंझावात)

सुरेश भट

ओठ

तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा ?

आज का तुला माझे एव्हढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा ?

हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा ?

बोलली मिठी माझी - ' दे प्रकाश थोडासा'
तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा ?

कालच्या वसंताला ठेवतेस का नावे ?
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा ?

चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ?

(एल्गार)

 
सुरेश भट