Showing posts with label गझल. Show all posts
Showing posts with label गझल. Show all posts

Sunday, 2 May 2021

छोटी रात्र

ध्येयास साथ माझी स्वप्नात रंगतो मी
वाटे भिती कशाची छोटीच रात्र आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ मे २०२१

Thursday, 1 February 2018

काही रडून गेले काही हसून गेले

गझल

काही रडून गेले काही हसून गेले
जळताच प्रेत माझे सारे निघून गेले

शेरामध्ये जरासे मी दु:ख मिसळले अन्
'क्या बात..'ओठ त्यांचे हसुनी म्हणून गेले

नाही दुखावले मी कोणासही कधीही
त्यांचेच शब्द सारे वांदे करून गेले

कोणास देत नाही मी दोष कोणताही
आयुष्य एकट्याने अर्धे सरून गेले

होताच छंद माझा नात्यात राहण्याचा
मी संकटात होतो सारे दुरून गेले

– यल्लप्पा कोकणे
३० मार्च २०१८

Wednesday, 29 November 2017

गझल

एक शेर

विश्वास फार होता ज्याच्यावरीच माझा
त्यानेच "हाय" केला पाठीत वार माझ्या

Sunday, 22 October 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा


हातून पालकांच्या संस्कार फार झाले?
पोरास जन्मदाते का आज भार झाले? 

कोणास काय बोलू माझाच दोष आहे
मरणे सुद्धा पहा ना घाईत फार झाले

सोडून एकटे मज दुःखात जे पळाले
माझ्या सुखात आता, ते भागिदार झाले

देतो कशास थारा गर्वास रोज आता
नाती तुटून गेली अन् बंद दार झाले

विश्वास खूप होता नात्यावरी म्हणोनी 
बहुदा असे हजारो पाठीत वार झाले

का? बाळगून आहे देहात राग तू रे
बघ शेवटी स्मशानी अंगार गार झाले

खर्चून जन्म माझा मी झेलले टिकांना
येताच वेळ माझी सारे फरार झाले


यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० जानेवारी २०१८

Sunday, 15 October 2017

गझल

कोणास का कळेना आयुष्य राज आहे
दुःखातल्या छटांचा भारीच साज आहे

नाती कशी जपावी याचा विचार आहे 
शब्दात गोडवा हा याचा इलाज आहे

ती भेटण्यास आली तोडून बंध सारे
अंगी तिच्या शहारे डोळ्यात लाज आहे

मी वाचतो मराठी मी ऐकतो मराठी 
संचारली मराठी याचाच माज आहे

मी राहतो मुक्याने कोठेच बात नाही
आवाज हुंदक्याचा का शांत आज आहे 

Friday, 6 October 2017

गझल

आनंदकंद

मद्यालयात जेव्हा पेला भरून घेतो
विसरून विश्व सारे थोडे जगून घेतो

धावून येत होते सारे सुखात माझ्या
दुःखात एकटा मी डोळे पुसून घेतो

सोसून घेत आहे तारूण्य हाय! माझे
तो भुतकाळ माझा थोड़े फिरून घेतो

मी घेतला पवित्रा आनंद पाहण्याचा
लपवून दुःख माझे खोटे हसून घेतो

झाली भरून झोळी साऱ्याच मालकांची
सोसून रक्त सारे  तो राबवून घेतो

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ ऑक्टोबर २०१७

Friday, 15 September 2017

गझल

आनंदकंद

नेत्यावरी भरोसा ठेवून आज आहे
त्यांच्यात का कळेना आजन्म माज आहे

गेलो झिजून पुरता, पर्वा कधी न केली
गोतावळा तरीही नाराज आज आहे

नाती कशी जपावी मोठाच प्रश्न आहे
शब्दात गोडवा हा याचा इलाज आहे

हासून पाहते ती घायाळ जीव होतो
भेटीत का सखीच्या डोळ्यात लाज आहे?

राखेत लीन झाला आत्मा जळून गेला
तू एकटा स्मशानी हा अंत आज आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ नोव्हेंबर २०२४

Saturday, 9 September 2017

गझल

एक शेर

शहरामधून पैसे गावात येत गेले
जागा पडीक होती आता महाग झाली

Tuesday, 4 July 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

नेता खुशाल गेला फसवून देश माझा
आता कशास झाला हैराण देश माझा?

झाले महाग सारे जगणेच भारताचे
घेतो कसे तरीही सोसून देश माझा?

सृष्टीत देश सारा आहे नटून ऊभा
सार्‍या जगात आहे शोभून देश माझा

स्वातंत्र्य मागण्याला सामील लाख झाले
रक्तात न्हात होता हासून देश माझा

तेथे जवान होता झेलीत ऊन वारा
सीमा अजून आहे राखून देश माझा

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ ऑगस्ट २०१७ 

Tuesday, 27 June 2017

गझल

काळोख सत्य सारे सांगून पहाट गेली
त्या चांदण्यात आता न्हाऊन पहाट गेली

आहे अबोल का तू भीती मनास वाटे
शृंगार आज सारा सांगून पहाट गेली

नाही समोर आता ती दूर फार गेली
अस्तित्व आज सारे भासून पहाट गेली

सांडून रक्त त्यांचे तो देश लाल झाला
स्वातंत्र्य एकदाचे देऊन पहाट गेली

Tuesday, 20 June 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद
गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

शेतात राबणारे जीवा उदार होते
ते मेघ वाहणारे ईमानदार होते

सर्वस्व अर्पिले मी सारे तिलाच माझे
का आजही सखीच्या ओठी नकार होते?

मी चोरपावलांनी भेटावयास आलो
तैनात चांदणेही रात्रीस फार होते

चिंता कधीच नाही केली कशाची मी
देण्यास हात हाती ते जाणकार होते

देहात प्राण होता कोणी नसे समोरी
निष्प्राण देह जेव्हा खांदे तयार होते

Monday, 22 May 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

माझ्याच माणसाचा खेळून डाव झाला 
त्यांच्या सुखात माझा मारून जीव झाला

लाथाडलेच त्याला कोणास काय त्याचे
पाषाण तोच होता तो आज देव झाला

गोतावळा कधीही देतोच फार धोका
एकांत राहण्याचा माझा सराव झाला

मी एकटाच होतो झेलीत वेदना त्या
दावी स्मशान आता गोळाच गाव झाला

डोळ्यांतही सखीच्या ती धार फार होती 
ते वार रोखताना झेलून घाव झाला

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२९ मे २०१७

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

गझल

माणूस जीव माझा जाळीत फार होता
त्याच्या पुढे चितेचा अंगार गार होता

आलो जगात तेव्हा भारीच त्रास झाला
गर्भात माउलीच्या आराम फार होता

ही वाट पावसाची पाहून फार झाली
म्हणतात तो ढगाला भलताच भार होता

मी टाळलेच होते भेटायला सखीला
चंद्रा तुझा पहारा रात्रीस फार होता

ते शब्द भावनेचे सांगून खूप गेले
तो अर्थ सांगणारा माझाच शेर होता


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२५ जून २०१७

Saturday, 20 May 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

गझल

येथे महत्व मोठे जन्मास फार आहे 
दुःखास मीच आता केलेच ठार आहे

पेरून कर्ज झाले धान्यास भाव नाही 
पर्याय शेवटाचा फाशी तयार आहे

मी हाक मारली पण आले कुणी न तेव्हा
मसनात न्यायला ही गर्दीच फार आहे 

संभाळुनी जगावे वाटे मलाच आता
माझ्याच माणसांच्या शब्दात वार आहे

झालेच बंद आहे दारे पहा मनाची
का आज हे घराला मोठेच दार आहे?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ मे २०१७

Thursday, 18 May 2017

गझल

वृत्त  - भुजंगप्रयात

ल गा गा ल गा गा.... ल गा गा ल गा गा
१ २ २ १ २ २.... १ २ २ १ २ २ = २० मात्रा

कळे आज नाते पहाटे कशाला?
तुही धुंद होते पहाटे कशाला?

निशा आज आली तुला भेटण्याला
मिठी सैल होते पहाटे कशाला?

तुझा हात हाती कसा आज आला?
भिती आज वाटे पहाटे कशाला?

प्रिये सांग आता उगा लाजते का?
बहाणेच खोटे पहाटे कशाला?

कुठे झोप गेली कळेना मलाही
मला जाग येते पहाटे कशाला?

Wednesday, 17 May 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

ते सत्य मांडताना होऊन त्रास गेला
तो शब्द आज माझा होऊन दास गेला

मी मुक्त आज झालो देहात प्राण नाही
माझ्याच मानसांचा वाढून ध्यास गेला

होतीच आठवांची यादी तयार माझी
तेव्हा तुझाच राणी होऊन भास गेला

त्या चांदण्यात होती ती एकटीच ऊभी
तो चंद्र स्वागताला धावून खास गेला

बोलून गोड लोकां जिंकून घेतले मी
आत्ताच शेवटाचा जिंकून श्वास गेला


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ मे २०१७

Sunday, 30 April 2017

गझल

कोणास काय बोलू मी शांत आज आहे
घे ओळखून आता रक्तात लाट आहे



यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ एप्रिल २०१७

Wednesday, 26 April 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

केव्हाच काढलं मी काळीज आज हाती
हासून तू जराशी केलास वार तेव्हा

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ एप्रिल २०१७

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

माझेच एकट्याने अश्रू पुसून झाले
प्रवास जीवनाचा भारीच लांब होता

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ एप्रिल २०१७

गझल


वृत्त  - आनंदकंद
 गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

तो एकटाच होता अश्रूच मित्र माझा
अंतीम दर्शनाला भारीच रांग होती

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ एप्रिल २०१७