Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Monday, 26 November 2018

मुलगी वाचली

मुलगी वाचली

पोलिस ठाण्यातील फोन वाजतो. जान्हवी फोन उचलते. जान्हवी ही या पोलिस ठाण्यातील वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी आहे. घडलेली घटना फोनवरून ऐकून घेते. दोन हवालदार आपल्या सोबत घेऊन घटनास्थळी पोहचते. घटनास्थळी एका कचराकुंडीत जान्हवीला एक नवजात मुलगी सापडते. ती नवजात मुलगी खुप जोरजोरात रडत असताना जान्हवी तिला उचलते व तिथे जमलेल्या जमावाशी त्या नवजात मुलीची चौकशी करते. या मुलीला तेथे कोणी व कधी ठेवून गेले हे कोणीच पाहीले नाही. जान्हवी वेळ न घालवता पोलिस वाहनात बसते व तातडीने रूग्णालयात त्या नवजात मुलीला दाखल करते. नवजात मुलीचे आई वडील कोण आहे याचा शोध ती घेते पण तिला यश मिळत नाही. ती नवजात मुलगी बरी झाल्यावर तिला अनाथ आश्रमात ठेवण्याचा जान्हवी निर्णय घेते.
जान्हवी पोलिस वाहनात बसून जात असताना अचानक एक वयस्कर व थकलेली स्री रस्ता ओलांडताना जान्हवीच्या पोलिस वाहनाला येऊन धडकते व ती जमीनीवर कोसळते. त्या स्त्रीला डोक्याला खुप मार लागलेला आहे. रक्त वाहत आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्त्रीला शुद्ध नाही. तशाच अवस्थेत जान्हवी त्या स्त्रीला रूग्णालयात दाखल करते. रूग्णालयात जाईपर्यंत सखुचे रक्त खुप वाहत होते. जान्हवीच्या गाडीला धडकते तिचे सखु नाव आहे.  रूग्णालयात दाखल केल्यावर सखुला रक्ताची गरज होती. रक्त मिळाले तरच ती जगू शकत होती. डाॅक्टरांनी खुप प्रयत्न करूनही तिला रक्त मिळू शकले नाही. शेवटी जान्हवीने डाॅक्टरांकडे तिच्या रक्ताचा गट तपासण्यास सांगितले. देवाच्या कृपेने जान्हवीचा आणि सखुचा रक्तगट जुळला आणि सखुचा जीव वाचला. सखु बरी होईपर्यंत डाॅक्टरांच्या देखरेखीखाली होती. सखु पुर्ण बरी झाल्यावर जान्हवीने तिची चौकशी केली. सखुला कोणी नव्हते. ती एकटीच राहत होती. मिळेल ती कामं करून आपलं पोट भरत होती. सखुला जान्हवीने रूग्णालयात दाखल केले व रक्तही दिले म्हणून सखुचा जीव वाचला हे सखुला डाॅक्टरांकडून कळाले तेव्हापासून सखु जान्हवीला देव मानू लागली.
तिला कोणी नसल्यामुळे जान्हवी सखुला स्वतःच्या घरी घेऊन येते. जान्हवी आपल्या घरात शिरताना उंबरठ्यावरूनच तिच्या आई वडीलांना आवाज देत घरात शिरते. जान्हवीबरोबर सखुला पाहून रावसाहेब व मालतीबाई यांना आश्चर्य वाटते. रावसाहेब हे जान्हवीचे वडील व मालतीबाई आई आहे. रावसाहेब व मालतीबाईंना समोर पाहून सखुच्या पायाखालची जमीनच सरकते. ती घाबरते व हातात पदराचं टोक धरून तोंडापर्यंत घेते. त्या दोघांना समोर पाहून सखुच्या डोळ्यात पाणी येते. तिघेही सखुला तिच्या रडण्याचं कारण विचारतात पण सखु काहीही सांगत नाही. जान्हवीने सखुच्या हालचाली पाहून असा अंदाज लावला की नक्कीच सखु काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी काहीतरी महत्वाची बाब आहे जी सखु सर्वांपासून लपवत आहे. खुप दिवसांनी सखुला चांगलं जेवायला मिळालं. त्या रात्री जान्हवीला झोप आली नाही. सखु का रडली असावी? काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे? अशा विचारांनी जान्हवी गोंधळून गेली. नेहमीप्रमाणे जान्हवी ड्युटीवर गेली. सखु आता जान्हवी आणि तिच्या कुटूंबात चांगलीच  रूळत होती. पण एक अशी गोष्ट होती जी सखुची चिंता वाढवत होती. रावसाहेब व मालतीबाई यांनी सुद्धा सखुला विचारण्याचा प्रयत्न केला पण सखु काहीही सांगत नव्हती. जान्हवी संध्याकाळी घरी आली. ती आज जास्तच थकली होती आणि वैतागली सुद्धा होती. घरी आल्यावर तीने आपल्या डोक्यावरील पोलिस टोपी टेबलवर ठेवत तीची बडबड व चिडचिड सुरू झाली.  नेहमी शांत राहणारी जान्हवी आज इतकी का चिडली आहे हे जान्हवीच्या आई वडीलांना कळत नव्हते. तीची चिडचिड सखु देखील पाहत होती. थोडा वेळ थांबून मालतीबाईने जान्हवीला चिडचिडीचे पुन्हा कारण विचारले तेव्हा जान्हवी सांगू लागली की, "रोज वेगवेगळ्या तक्रारी माझ्याकडे येतात. त्यात जास्त म्हणजे महिलांवरील अत्याचार, वृद्धांचा छळ आणि रस्त्यावर, देऊळात, कचरापेटीत सापडणारी नवजात बालके. अशा नवजात बालकांना सोडून जाणाऱ्या आई वडिलांचा मला खुप राग येतो."

हे सारं सखुही ऐकत होती. सखु जोरजोरात रडू लागली. तिच्या रडण्याचं कारण कोणालाच कळत नव्हतं. सखु जान्हवीच्या दिशेने जोरात धावत आली आणि तिच्या दोन्ही पायाला हात लावत माफी मागू लागली. जान्हवी, रावसाहेब आणि मालतीबाईंनाही हा प्रकार लक्षात येत नव्हता. ही नुकतीच घरी आलेली बाई जान्हवीची माफी का मागत आहे हे कोणाच्या लक्षात येत नव्हतं. जान्हवीने सखुला माफी मागण्याचं कारण विचारलं तेव्हा सखु भुतकाळात शिरली आणि घडलेली घटना सांगू लागली. सखुची परिस्थिती फार गरीब होती. सखुचा नवरा आजारपणात मरण पावला तेव्हा सखुने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीला कसं पोसायचं, शिक्षण कसं होणार या विचारात सखु असायची म्हणून सखुने आपल्या नवजात मुलीला फार दुरवर जाऊन एका रस्ताच्या कडेला असलेल्या कचरापेटीत ठेवून आली. हे सारं सांगत असताना सखु ही रावसाहेब व मालतीबाई यांच्याकडे पाहत रडत बोलू लागली की, "साहेब आणि बाईसाहेब जेव्हा मी माझ्या मुलीला कचरा पेटीत ठेवून आडोशाला उभी असताना तेथून एक चारचाकी गाडी जात होती. माझ्या मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून तेथे गाडी थांबली व त्या गाडीतून एक जोडपे उतरले आणि माझ्या मुलीला घेऊन गेले. ते जोडपे म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही ते म्हणजे तुम्हीच होतात. मी या घरात पाऊल ठेवताच तुम्हाला पाहीलं आणि ओळखलं." हे ऐकताच जान्हवी, रावसाहेब आणि मालतीबाई आश्चर्यचकित झाले. त्यावर रावसाहेब आणि मालतीबाई एकत्र बोलले, "म्हणजे, तुम्ही जान्हवीच्या आई?" आज जान्हवीला तिची आई मिळाली. तिला खुप आनंद झाला. परिस्थितीमुळे सखुने आपल्या पोटच्या मुलीला कचराकुंडीत टाकले होते ती मुलगी आज वरिष्ठ पोलिस आहे. सखुने सर्वांची माफी मागितली. जान्हवीने सखुला म्हणजे तिच्या सख्खा आईला कडकडून मिठी मारली.

यल्लप्पा कोकणे
२६ नोव्हेंबर २०१८

Saturday, 2 December 2017

कथा - संघर्ष

कथा - संघर्ष
    रोजच्याप्रमाणे अजय आणि अश्विनी सकाळी लवकर उठले. घरातल्या सर्व सामानांची रात्रीच बांधाबांधी झाली होती. त्यांनी ठरवलं होतं की आज कोणत्याही परिस्थितीत हे राहतं घर सोडायचं. याचं कारण एकच की घरातील वडीलधारी मंडळी बरोबर अश्विनीचे नेहमी वाद होत असतं. यामध्ये अजयला आपली बायको अश्विनी बरोबर की घरातील वडीलधारी मंडळी बरोबर याचा निर्णयच तो लावू शकला नाही. या घरातील भांडणामुळे अश्विनी च्या अंगाला मास राहीलं नाही. ती वरचेवर शरीराने बारीक होत चालली होती. झुरत चालली होती. अजयला हेच कळत नव्हतं की आपली बायको जे काही वागते ते बरोबर आहे की घरातील वडीलधारी मंडळी. त्याचं मन त्याला हेच सांगत होतं की या घरापासून थोडं दूर राहून पाहूया की काय घडतंय पुढे. असा विचार करून दोघांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. यांचा मुलगा तीन वर्षाचा आहे. त्याला नर्सरीत प्रवेश घेतला होता. त्याचं नुकसान होऊ नये म्हणून जवळच त्यांनी भाड्याची खोली पाहून ठेवली होती. यांनी कसलाच विचार केला नाही की आपल्याला कमी पगार आहे. किंवा आपलं घर चालेल की नाही. भाडं भरणं होईल की नाही. याचा काहीही विचार न करता त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. कारण परिस्थितीच तशी होती. लग्नात आहेर म्हणून आलेली दोन भांडी आणि कपडे याची रात्रीच बांधाबांधी झाली होती.
    अजयने मालवाहतूक वाहन ठरवले. वाहन दारात आल्यावर अजयच्या आई वडीलांना खुप आश्चर्य वाटले. कारण कोणाला काही खबर न लागता या दोघांनी इतका मोठा निर्णय कसा घेतला. सर्व सामान वाहनात भरून झाल्यावर वाहन निघताच अश्विनीची सासू वाहनाकडे आली आणि एकदम तुच्छ भाषेत (शिवीगाळ करत) अश्विनीशी बोलू लागली. अश्विनी याच रोजच्या सासूच्या भांडणाला खुप वैतागली होती. त्या क्षणी तिच्या मनात विचारांचे वादळ वाहू लागले. ती मनातच म्हणाली की हे तुझे शेवटचे बोलणे असेल. मी चालले आहे ते परत कधी न येण्यासाठी. भाडेतत्वावर जी खोली पाहीली होती त्याचे भाडे देण्यासाठी अश्विनीने गळ्यातील मंगळसुत्र गहाण ठेवले होते. आदल्या दिवशीच अजयने त्या खोलीत स्वयंपाक करण्याची व्यवस्था करून ठेवली होती. खोली फार लहान होती. सरकारी कर्मचारी इमारत होती. थोडेच दिवस येथे काढायचे आहे असे दोघांनी ठरवले.
    अश्विनीला पोलीस भरतीसाठी मैदानी खेळासाठी पत्र आले होते. सर्व सामान नवीन घरात तसेच ठेवून अजय आणि अश्विनीने तीन वर्षाच्या मुलाला घेऊन टॅक्सी पकडून ताबडतोब मैदान गाठले. तिघेही सकाळ पासून उपाशी होते. अश्विनी तशीच मैदानी परीक्षेसाठी हजर झाली. परीक्षा बराच वेळ चालणार होती. अजय आपल्या लहान मुलाला घेऊन गेटच्या बाहेर थांबला. अजय बरोबर बरेच जण होते. ऊन वाढत होतं. थोडीशी सावली पाहून अजय मुलाला घेऊन बसला. मुलाला खुप भुक लागली म्हणून मुलाच्या आवडीचा खाऊ मुलाला घेऊन दिला. तब्बल तीन तासानंतर अश्विनीची परीक्षा संपली. मैदानी परीक्षेत धावणी होती. त्यात ती पास झाली. दुसऱ्या दिवशी परत अजुन एक परीक्षा होती. दोघांनाही खुप भुक लागली होती. जवळच्या हाॅटेलमधून त्यांनी पोटाला आधार म्हणून थोडं खाऊन घेतलं. दोघेही आजचा दिवस कधी विसरणारे नव्हते कारण घर सोडल्यावर पहिल्याच दिवशी खुप त्रास सोसला आहे. दोघेही खुप थकले होते. संध्याकाळी घरी आल्यावर अश्विनीने फक्त  फोडणीचा भात केला. जेवण झाल्यावर पुढील आयुष्याचा विचार करत होते. दोघेही एकमेकांचे विचार समजून घेत होते वर आपलेही मत मांडत होते. या दोघांच्या घर सोडण्यामुळे अजयचे आई वडील व नातेवाईकांनी या दोघांशी बोलणे बंद केले व नाती तोडून टाकली. दुसऱ्या दिवशी अश्विनी पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी जाऊ शकली नाही कारण तिचे शरीर फार दुःखत होते. मैदानी परीक्षा ती पास झाली नसती.
    ज्या घरात दोघे भाड्याने राहत होते घर फार लहान होते. घरमालकाला चाळीस हजार रूपये दिले होते. नाईलाजाने त्यांना तेथे राहवे लागत होते. सहा महिन्यातच त्यांनी ती खोली सोडली व कमी भाडे असणारे व शहराच्या दुर असे घर पाहीले. त्यांचे कर्जावर कर्ज काढण्याची वेळ येऊ लागली. अजयला पगार फार कमी होता. नवीन घराच्या शेजारी एक लहान मुलांचे प्ले ग्रूप होते. मुलाला त्यांनी तेथे प्रवेश घेतला. घर शहरापासून फार लांब असल्यामुळे अजयला कामावर जाण्यास भयंकर त्रास होत होता. त्याला ते करावेच लागत होते. रेल्वेचा प्रवास, बसचा प्रवास त्याच्या मागे लागला. रेल्वे प्रवास त्याचे दोन-तीन वेळा प्राण जाता जाता वाचला. अजयने हे अश्विनीला कधीच सांगितले नाही. अश्विनीला स्वतःचे घर घ्यायचे होते. अश्विनीने तिच्या वडीलांकडून थोडे व नातेवाईकांकडून थोडे पैसे घेऊन स्वतःचे घर घेतले. नवीन घर त्यांनी शहराच्या बाहेर घेतले. हे कर्ज फेडण्यासाठी बॅंकेतून त्यांनी मोठे कर्ज काढले. व ज्यांचे पैसे घेतले होते ते परत केले व बँकेचा एकच हप्ता सुरू ठेवला. कर्जचा बोजा वाढतच होता. नवरा बायकोला याची काळजी फार वाटत होती. निसर्गाच्या सान्निध्यात असं हे घर होतं. सर्व सुरळीत सुरू होतं. कोणाचाही कसलाच दबाव नव्हता. मुलालाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला. अजयने ऑफिसमध्ये चांगले काम केल्यामुळे त्याचा चांगला पगार वाढला. अशी दोन वर्षे त्यांची सुखात गेली. अजयच्या घरच्यांनी बोलणं बंद केलं होतं. आता यांचा मुलगा पाच वर्षाचा झाला होता. दोघांनी दुसऱ्या मुलाबद्दल विचार केला. दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळी डाॅक्टरांनी क्रीटीटल केस आहे असे सांगितले. मुल आडवे आले आहे असे डाॅक्टरांनी सांगितले.  अजयला व घरच्यांना खुप काळजी वाटू लागली. डाॅक्टरांना शेवटी यश आलं.  कळा आल्यापासून तब्बल सहा ते सात तासांनी बाळाचा जन्म झाला.  सर्वांना फार आनंद झाला. दुसरा मुलगा झाल्यापासून अजयचे नातेवाईक आता सर्व विसरून अजयला येऊन भेटू लागले. दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे सर्वांनी मनातला राग काढून टाकला. सर्व सुखाने नांदू लागले. घरात सुख नांदू लागताच या सुखाला नजर लागेल असे काही घडू लागले. कधी आजारी न पडणारी अश्विनी आता  सारखी आजारी पडू लागली. सुखाची झुळूक लागते न लागते लगेच पुन्हा दुःखाचे वारे वाहू लागले होते. छोट्या छोट्या आजारातून अश्विनीला टीबी ची लागण झाली. पुन्हा खर्च वाढला. अजयच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच होता. पगार कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. टीबी झाल्यावर तब्बल एक महिनाभर अश्विनी रूग्णालयात होती. अश्विनीकडे रूग्णालयात थांबायला कोणी नव्हते म्हणून अजय महिनाभर कामाला गेला नाही.  महिनाभरानंतर डाॅक्टरांनी अश्विनी घरी जाण्याची परवानगी दिली व पथ्य पाळायला सांगितले. या आजारात अश्विनी शरीराने खुप दुबळी झाली आहे. हे पाहून अजयला फार काळजी वाटत होती. घरात आता दोन लहान मुलं होती खर्च वाढत होता. अश्विनीची तब्येत कधी सुधारत असे तर कधी ती आजारी पडत असे. औषधांबरोबर अजय अश्विनीला चांगले खाऊ घालण्यात कमी पडत नव्हता. औषधांबरोबर अजय अश्विनीला धीर देत त्याने तिला लवकर बरे केले. अश्विनी हळू हळू आजारातून सावरली. तिने व अजयने दोन्ही मुलांवर पुर्ण लक्ष देण्याचे ठरवले. लहान मुलगा तीन वर्षाचा झाल्यावर त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत छोट्या शिशू साठी प्रवेश मिळाला. चारही बाजूंनी खर्च वाढतच होता. यावर मात करत दोघांचे शिक्षण सुरू होते. स्वतःचं घर झालं, मुलं चांगल्या शाळेत शिकू लागली आणि अजयचा पगारही चांगला वाढला होता. अजयचे आणि अश्विनीचे नातेवाईक आता गर्वाने या दोघांची वाह वाह करू लागले. पैसा-पाणी वाढत होता. दुर झालेली सारेजण आता जवळ येऊ पहात होती. कोणाचा त्रास नको म्हणून अजयने शहरापासून फारच लांब घर घेतलं होतं. काही कार्यक्रम असेल तरच पाहूणे घरी येत असत. दूर असल्यामुळे सहज म्हणून कोणाला येणे जमत नव्हते.
    एके दिवशी नगरपालिकेचे कर्मचारी अचानक अजय अश्विनी राहतात त्या चाळीवर आली आणि संपुर्ण चाळीची पहाणी केली. पहाणी करत असताना चाळीतील रहिवाशांना हे कसली पहाणी करत आहे हे समजत नव्हतं. अधिकाऱ्यांच्या हातात ज्या जागेवर चाळी बांधल्या आहेत त्या जागेचा नकाशा होता. हळूहळू सर्व गोष्टी चाळकरांच्या लक्षात येऊ लागल्या. ही चाळ अनाधिकृत आहे असे कर्मचाऱ्यांनी चाळकऱ्यांना सांगितले. सर्वांना मोठा धक्काच बसला. पुन्हा एकदा सुखाला मागे सारत दुःखाने बाजी मारली होती. इतर संकटांपेक्षा हे सर्वात मोठं संकट होतं. बिल्डर कडून साऱ्यांची फसवणूक झाली हे आता साऱ्यांच्या लक्षात आलं. बिल्डर च्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल झाली. चाळी अधिकृत कशा करून घेला येईल. याची धावपळ सुरू झाली. याचे कारण हेच की पहाणी करून झाल्यावर चाळीला नोटीसा येणार होत्या व त्या जमीनदोस्त होणार होत्या. या मंत्र्याला भेट त्या मंत्र्याला भेट. याची मदत घे त्याची मदत घे. हे सारं चाळीत सर्वजण करत होते. सर्वांनी एक गट तयार केला व चाळी कशा वाचवता येईल याचा विचार सर्वजण एकत्र येऊन करू लागले.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ डिसेंबर २०१७