Showing posts with label लेख-Articles. Show all posts
Showing posts with label लेख-Articles. Show all posts

Sunday, 9 April 2023

मोबाईलचा विळखा

मोबाईलचा विळखा

    कधी कधी असं वाटतं की फोनचा (भ्रमणध्वनी) शोध लागला नसता तर आज परिस्थिती काहीशी वेगळी दिसली असती. फोनचा शोध तर लागलाच पण या शोधामुळे माणसाचा शोध घेणं कमी झालं आहे. प्रत्यक्ष भेटण्याची ओढ कमी झाली आहे. नात्यातला गोडवा निघून गेला आहे. मनातील दुःख, आनंद खऱ्या अर्थाने मोकळे होताना दिसत नाही. काहीही छोटी गोष्ट असेल तर लगेच फोन हातात घेतला जातो व आपला संदेश दुरूनच पोहचवला जातो. जर हाच संदेश आपण प्रत्यक्ष भेटून दिला असता तर ते सारे क्षण अविस्मरणीय झाले असते. आपण कशाचाही विचार न करता आपल्या हातात लगेच फोन घेतो व बोलून मोकळे होतो. रोजचा प्रवास करतानादेखील प्रत्येकाच्या हातात फोन असतो आणि त्या फोनमधून माणूस स्वतःचे मनोरंजन करीत असतो. त्याच प्रवासात फोन बाजूला ठेवून एकमेकांशी आपले विचार मांडले तर मन मोकळं होऊन वेगळाच आनंत प्राप्त होईल. या फोनमुळे शेजारी काय घडतं आहे याचा जरासुद्धा अंदाज लागत नाही. रेल्वे, बस प्रवासात गर्दीच्या ठिकाणी काहीजण मोबाईलमध्ये इतके गुंतलेले असतात की दुसऱ्यांना आपला त्रास होतो आहे याची त्यांना जरासुद्धा कल्पना येत नाही. "निदान गर्दीच्या वेळेत तरी मोबाईल वापरू नका" असे सांगितल्यास त्यांच्या चेहर्‍यावर काहीही बदल दिसत नाही कारण मोबाईल वापरणारा हा मोबाईल मध्ये फार गुंतलेला असतो. उलट कधीकधी मोबाईल वापरणाराच आपल्याशी भांडण करतो. भ्रमणध्वनी हे शाप की वरदान हाच प्रश्न सारखा भेडसावत आहे. कित्येक वेळा हा फोन मृत्यूचे कारणही ठरला आहे. या फोनमुळे रेल्वे/रोड अपघात होताना पाहीले आहे. समाजात घरात व बाहेर अपघात होताना दिसत आहे. उद्यानात पालक मुलांना खेळायला घेऊन येतात. मुलांना खेळायला सोडतात व फोनवर संगीत ऐकतात वा बोलण्यात मग्न होऊन जातात. मुलं खेळताना जखमी होतात हे पालकांच्या लवकर लक्षात येत नाही. असे लोक भान हरपलेले असातात. यांना भानावर आणावं लागतं हे फार मोठं दुर्दैव आहे. घरात जर शाळकरी मुलं असतील तर पालक मुलांना फोन लवकर हातात देत नाही. पालकांच्या अनुपस्थित मुलं मोबाईलवर तासंतास खेळ खेळताना दिसतात. यामुळे काही विद्यार्थ्यांचं अभ्यासावर लक्ष नसतं ही बाब समोर आली आहे. मोबाईलवर असे काही खेळ की ते खेळ खेळता मुलांनी आपले प्राण देखील गमावले आहे.
    काही दिवसांपूर्वी एक पब्जी नामक खेळाने तर मुलांना फार वेडं करून सोडलं होतं. माझ्या परिचयातील एका कुटुंबात लहान मुलाने घरात कोणी नसाताना पब्जी खेळ खेळत चक्क गळफास लावून घेतला व तेथेच त्याचे जीवन संपले. यामुळे या मोबाईलच्या युगात लहान मुलांवर पालकांनी लक्ष देणे फार गरजेचं आहे. नाहीतर काहीही होऊ शकतं. मुलांना मोबाईलचे जर वेड लागले असेल तर पालकांनी त्वरित यावर मर्यादा आखावी. काही भागात लहान मुलांना खेळण्यासाठी आता मैदानं उरलेली नाही. अशा वेळेस पालक मनोरंजन म्हणून मुलांच्या हाती मोबाईल देतात. पालकांनी मोबाईल द्यावं पण त्यावर वेळेचं बंधन असावं. वेळ सरत नाही म्हणून काहीजण तासंतास मोबाईलवर बोटं फिरवत बसतात. प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते आणि ज्यामुळे आपलं नुकसान होत असतं त्या गोष्टीवर आपली बारीक नजर असली पाहिजे आणि त्या गोष्टीचा अतिरेक लगेच थांबवला पाहिजे.
    घरात मोठ्या माणसांचं अनुकरण लहान मुलं करत असतात. एक गोष्ट सारखी निदर्शनास येते ती म्हणजे घरात सहकुटुंब जेवण करताना मोठी माणसं हातात मोबाईल घेऊन काहीतरी चाळत असतात किंवा फोनवर बोलत असतात. चक्क हातातला घास हा बराच वेळ हातातच असतो आणि मोबाईलकडे लक्ष असतं. तेथे अन्नाचा अपमान होतो आणि आपल्या शरीरासाठी अन्न हे काम करत नाही. याचा लहान मुलांवर फार मोठा परिणाम होतो हे मोठ्यांनी ओळखलं पाहीजे आणि असं करणं त्वरित थांबवलं पाहिजे. मोबाईलमध्ये चित्रिकरण करत असताना प्राण गमावताना समाजात काही घटना घडताना पाहिल्या आहेत. इंस्टाग्राम, युटूबवर रिल्स बनवण्यासाठी माणूस नको त्या थराला जातो आणि कधी कधी आपले प्राण गमावून बसतो.
या सर्व गोष्टी थांबायच्या असतील तर "स्वतःच्या वागणुकीत व विचारात चांगले बदल केले तर जग सहजच बदलेलं दिसेल." काहीजण रात्री मोबाईल पाहत पाहत झोपी जातात. विज्ञानात सांगितल्याप्रमाणे रात्री झोपताना मोबाईल पाहत झोपू नये. असे केल्यास त्याचा आपल्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. असे निदर्शनास येते की या धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा म्हणून आपण मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये गप्पा मारत असताना किंवा एखाद्या विनोदावर मनसोक्त हसताना त्यात एखादी व्यक्ती अशी असते की ती व्यक्ती गप्पांमध्ये सामिल असते पण लक्ष सारं मोबाईलमध्ये असतं. इतर सर्वजण हसतात पण ती व्यक्ती गंभीर चेहरा करून मोबाईल हाताळत असते.
    मान्य आहे की, आजच्या स्पर्धेच्या युगात मोबाईलचा वापर हा फायद्यासाठीही केला जातो. त्या मोबाईलमुळे बरीच महत्त्वाची कामं होतात. महत्त्वाची कामं करताना काही मर्यादाही पाळल्या पाहीजे. मर्यादा पाळल्या की त्याचा फायदा हा आपल्याच होतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ एप्रिल २०२३

Saturday, 26 February 2022

विचारांशी गप्पा

विचारांशी गप्पा

    शेवटच्या श्वासापर्यंत एकच जीवलग आपल्यासोबत असतो, तो म्हणजे 'विचार'. रोज अनेक विचार आपल्याला मिठी मारून जातात. मग ते विचार चांगलेही असतात व वाईटही असतात. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की आपल्या मनात एका दिवसात साठ हजारांहून अधिक विचार येत असतात. त्यातले वाईट किती व चांगले किती हे बाह्य मन ठरवते व ते ठरवलेले विचार अंतर्मनाकडे सत्यात उतरविण्यास पाठवत असतात. वयानुसार विचार बदलतात आणि विचाराने माणूस घडतो. मनात चालणाऱ्या विचारांशी गप्पा मारत आपल्याच जगात वावरत असताना दुर दुरचा प्रवास अगदी लवकर संपतो अशी नेहमीच जाणीव होत असते. ती जाणीव होणं स्वाभाविक आहे कारण एका एका विचारात आपण इतकं गुंतलेले असतो की त्याची सुटका आपल्याला भान आल्यावर होत असते. विचार म्हणजे एक प्रकारचा अडकित्ताच आहे. विचारांमध्ये अडकलेल्या व्यक्तीचा पार भुगा होऊन जातो.
    आपल्या नावाला, आपल्या अस्तित्वाला समाजात टिकून ठेवण्याचं काम आपले विचार करीत असतात. कारण आपल्या विचारांचे परिणाम सर्वत्र उमटत असतात. आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्याचे मुख्य कारण म्हणजे आपण केलेले विचार व त्या विचारावर केलेली कृती आहे. आपल्या विचाराने समाजाला शहाणे करण्याचं काम हे विचारांच वेड लागलेली माणसंच करू शकतात. अशी विचाराची वेड लागलेली माणसं समाजाच्या प्रगतीसाठी असणं गरजेचं आहे. माणूस घडतो आणि बिघडतोही फक्त विचारांमुळेच. या गोष्टीचा विचार करूनच आपण विचार करायला हवा. आपल्याला घडायचे आहे की आपले स्वतःचे नुकसान करून घ्यायचे आहे हा निर्णय वेळेवर घेता आला पाहीजे. ठराविक वेळेत कोणत्या विचाराने आपल्या मनात प्रवेश केला पाहीजे याचेही नियम असायला हवे. असे असल्यास माणसाची 'चिंता' वाढणार नाही. चांगल्या क्षणी मनात वाईट विचार येत असतात आणि शुभ कार्य होता होता राहून जातं. कोणताही विचार करायला अडथळा येत नाही पण जे विचार केलं आहे ते पूर्ण करण्यास कोणकोणते अडथळे येऊ शकतात याचाच विचार मनात घोळत असतो. अशा विचारातून कोणीही सुटू शकत नाही. मनात आलेल्या एका विचारावर हजार वेळा विचार करणे हे कधीही हितकारक असतं. चांगले विचार हे चांगलेच असतात पण वाईट विचारांवर चांगला विचार केला तर सुरक्षित मार्गही सापडतो.
    मनातील विचार आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करीत असतात. त्यासाठी वाईट विचार मनात न आणता चांगला विचार करण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे स्वतःला व आपल्या माणसाला त्रास होत नाही. आपल्याला त्रास होईल असे विचार करणे थांबवून चांगले विचार केल्यास शरीरात एक सकारात्मक ऊर्जा वाहू लागते. त्यामुळे भविष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. सर्वात जास्त वेगवान आपले विचार असतात. विचारांच्या वाटेवर एका वळणावर थांबणे (विचार करायचे थांबणे) फार गरजेचे असते. नाही थांबलो तर मानसिक संतुलन बिघडून मनावर आघात होण्याची दाट शक्यता असते. चालताना पायात खडा अडकला की व्यवस्थित चालणे होत नाही. तो खडा बाजूला केल्यावर आपण न अडखळता चालायला लागतो, याचप्रमाणे मनाला टोचणारे विचार काढून फेकून दिल्यावर अस्वस्थता कमी होते. वर्तमानात आपली जी परिस्थिती आहे, आपण जे जीवन जगतो आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे आपले विचार आहे. आपल्या मनात जर कमी विचार असतील तर त्यावर तोडगा लगेच सापडतो आणि जर मनात खूप विचार साठवून ठेवले असतील तर त्या विचारांचा पूर येतो व आपलं जगणं वाहून जातं. सर्वात उंच दुसरं तिसरं काही नसून उंच हे आपले विचार असतात. त्याच विचारांच्या जोरावर माणूस उंची गाठतो. मग ती चांगल्या कामात असो वा वाईट कामात. वेगात धावणारे फक्त माणसाचे विचार असतात. त्याच विचारांचा पाठलाग करत माणूस घडत असतो. माणसातलं माणूसपण संपलं कि संशयाला जागा मिळते. नाती दुरावली व दुखावली जातात. म्हणून अंतरमनाने विचार करून खरे कोण आणि खोटे कोण हे जाणून घेणे फार गरजेचं असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२६ फेब्रुवारी २०२२

Saturday, 17 August 2019

माणूसकी हरवली

    हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला माणसाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. घरात, समाजात, प्रवासात, माणूसकी हरवत चालली आहे याचं फार दु:ख आहे. प्रत्येक क्षणाला माणूसकी हरवल्याचं दर्शन घडत आहे. आज माणसातला माणूस मरून पडलाय की काय असं वाटू लागलं आहे. मोठी दुर्घटना घडते, इमारत कोसळते, अपघात होतो. ढिगाऱ्याखाली माणसं मरून पडली असताना हे सारं पाहण्यासाठी गर्दी होते ती माणूसकी हरवलेल्या माणसांची. अशा वेळी मोठी व्यक्ती येते व मदत (अर्थिक) करण्याचे अश्वासन देते आणि निघून जाते. त्याच ठिकाणी दुसरीकडे गर्दीतलाच एक माणूस ढिगाऱ्याखाली मेलेल्या, गाडल्या गेलेल्या हाडामासाच्या माणसाच्या अंगावरचे मौल्यवान वस्तू काढण्यात मग्न असतो व दुसरा अपघाताचे छायाचित्रे, चलचित्र काढण्यात मग्न असतो. जर एखादी मौल्यवान वस्तू माणूस काढू शकत नाही तर अक्षरशः हातात सोन्याची अंगठी असलेले बोटंच छाटून घेऊन जाण्याचा प्रकार घडताना दिसतो. अशावेळी मदतीचा हात देणाऱ्या गर्दीची फार गरज असते. 

    रस्त्यावर वाहणाचा अपघात झाल्यावर हीच तोबा गर्दी जमते. माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना तो जीव वाचवण्यासाठी मदतीचा हात मागत असतो. तेथेही गर्दीत माणसांची अपघाताचे छायाचित्रे काढण्यास चढाओढ लागलेली असते. अशावेळी जखमीला वेळेवर मदत न मिळाल्यामुळे प्राणही गमवावे लागतात. काहीजण तर असेही असतात कि ते गर्दीत येत नाही.  लांबूनच पाहून निघून जातात कारण त्यांच्या मनाला असं वाटत असतं कि, आपण ज्या कामाला जात आहे तेथे जाण्यास उशीर होत आहे. पण त्यांना हे कळत नाही की, आपण जर जखमीला मदत करण्यास उशीर केला तर तो देवाघरी लवकर निघून जातील.

    खूप दान धर्म करणारी मंडळी या जगात आहेत. एकीकडे असेही चित्र दिसतं की, दान धर्म करणारी व्यक्ती घरात असणाऱ्या (थकलेले) आई वडीलांकडे अजिबात लक्ष देत नाही. कधी काळी थकलेल्या आई वडिलांना त्रासही दिला जातो. घरात आई वडिलांना उपाशी ठेवून बाहेर दान धर्म करत असताना त्यांना पुण्य कसे लाभेल. माणूसकी हरवलेला मुलगा घरात असेल तर आई वडिलांचे असेच हाल होणारच.

    जीवाला वैतागलेली व्यक्ती जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न करत असते तेव्हा आजूबाजूची जनता फक्त तमाशा बघत असते. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. याच्या उलट ती व्यक्ती कशी आत्महत्या करत आहे हे सारे भ्रमणध्वनी मध्ये टिपण्याचा प्रयत्न माणूसकी मेलेली गर्दी करत असते. ही आत्महत्या जलद गतीने जगाकडे कशी पसरेल याचाही प्रयत्न सर्वांचा सुरू असतो.

    एक गोष्ट मान्य आहे की आपल्या स्वतःच्या एका चुकीमुळे फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. आजच्या जगात समोरचा व्यक्ती चुकत आहे व त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं याची जाणीव असुनही कोणीही चुका करणाऱ्या व्यक्तीला थांबवत नाही. याचंच एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर ते आहे रेल्वेचा प्रवास. रेल्वेच्या डब्यात बसण्यासाठी जागा असूनही तरूण चालत्या गाडीत दरवाजाला लटकलेला असतो. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी दरवाजाला लटकून "स्टंटबाजी" करीत असतो. असे करू नको तुझ्या जीवाला धोका आहे असं बोलणारी माणसं त्या क्षणी दिसत नाही उलट मागे उभा राहून तो किती खतरनाक खेळ खेळत आहे याचे चित्रीकरण तो भ्रमणध्वनी मध्ये टिपत असतो. शेवटी असा क्षण येतो की स्टंटबाजी करणाऱ्याचा चुकून हात सुटतो व तो खाली पडतो आणि मरण पावतो. असे चलचित्र लगेच सोशल मिडीयावर पसरवले जातात. मागे उभे राहून चित्रीकरण करण्यापेक्षा स्टंटबाजी थांबवली असती तर एकाचा जीव वाचवला असता. पण नाही,  माणसातली माणूसकीच मेली आहे ना त्याचा दोष तरी कोणाला देणार!

    अतिवृष्टी होते, पूर येऊन जातो गरीबांचे घरं वाहून जातात अशा वेळी समाजसेवक, राजकारणी मंडळी, संस्था, बरेच मंडळ पूरग्रस्त भागात येऊन मदत करतात. त्याच पूरग्रस्त भागात वास्तव्यास असलेली व राजकारणात मुरलेली एक-दोन मंडळीही असतात. तीच मंडळी भेदभाव करत नागरिकांपर्यंत कमी-जास्त मदत पोहचवतात. काहीजणांकडे तर मदत पोहचतच नाही (मुद्दाम मदत केली जात नाही). नुकसान तर प्रत्येकाचे झालेले असते. मग प्रत्येकाला समान मदत का मिळत नाही? राजकारणात मुरलेल्यांची काही जणांची माणूसकीच हरवलेली असते त्याला आपण तरी काय करणार! पूरामध्ये एकीकडे माणूस आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो तर दुसरीकडे त्याच पूराच्या पाण्यात गुडघाभर उभा राहून काही जणांना स्वतःचे छायाचित्र (सेल्फी) काढण्याचा मोह आवरत नाही. पूरात वाहून जात असलेले संसार पाहत गर्दी उभी असते. एखाद्याचा जीव किंवा संसार वाचवण्याचा प्रयत्न न करता संसार किंवा माणूस वाहत असताना छायाचित्र काढण्यात माणसं व्यस्त असतात.

    पूरग्रस्त भागात राहणाऱ्यांना जेव्हा  शासकीय मदत मिळण्याची वेळ येते तेव्हाही माणूसकी मेलेल्या, राजकारणात असलेल्या माणसांचे दर्शन घडते. सरकार प्रत्येक कुटुंबाला ठराविक रक्कम देण्याचे ठरवते. ठरलेली रक्कम पूरग्रस्त भागात पोहचत नाही कारण सरकार आणि सामान्य जनता या दोघांत भ्रष्ट नेते मंडळी असतात. राजकारणात असलेली मंडळी आपली तिजोरी भरून घेतात व नंतर उरलेली रक्कम गरीब जनतेमध्ये वाटतात. येथेही राजकारणात असलेल्या, व समाजाच्या कल्याणासाठी निवडलेल्या व्यक्तींची माणूसकी मेलेली असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१३ ऑगस्ट २०१९

Tuesday, 11 June 2019

ऐतिहासिक भुईकोट किल्ला - खर्डा

    दिनांक ११ जून २०१९ रोजी ऐतिहासिक भुईकोट किल्ला (शिवपट्टण, खर्डा, जिल्हा अहमदनगर) पाहण्याचा योग आला. हा किल्ला सुलतानराव निंबाळकर यांनी बांधला असून सुलतानराजे निंबाळकर हे या किल्ल्याचे शेवटचे शासक होते. जामखेड तालुक्यातील शिर्डी-हैदराबाद महामार्गाने नगर जिल्ह्यात प्रवेश करताना भव्य तटबंदी असलेला खर्डा उर्फ शिवपट्टण उर्फ सुलतानगड भुईकोट किल्ला तीन एकरमध्ये पसरलेला आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर एक पर्शियन शिलालेख आहे. एक विशेष म्हणजे मुख्य दरवाजाच्या डाव्या आणि ऊजव्या बाजूला खालून सातव्या क्रमांकावर अखंड कोणा असलेले दोन दगड आहे. कोना असलेले फक्त दोनच दगड का? याचे उत्तर मिळाले नाही.
    पहील्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर उजवीकडे गडाचा साधारण तिस-चाळीस फुट उंचीचा मुख्य दरवाजा असुन या दरवाज्यावर मराठीतील एक शिलालेख आहे. या शिलालेखानुसार हा किल्ला १७४३ मध्ये सरदार सुलतानराव निंबाळकर यांनी बांधला. मुख्य प्रवेशद्वाराला भला मोठा लाकडी दरवाजा होता. दरवाजावर मोठमोठे धारदार लोखंडी आवरण होते. तो दरवाजा अशा पद्धतीने बनवला गेला होता कि, कितीही मोठ्या ताकतीने तो दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न अयशस्वी ठरणारा होता. पण आता तो दरवाजा येथे नाही. स्थानिक लोकांनी तो दरवाजा नष्ट केल्याचे स्थानिकांकडूनच समजले.  दरवाजातून आत प्रवेश केल्यावर संपूर्ण किल्ला व त्यातील मोकळे मैदान दिसते. किल्यात शिरल्यावर समोर एक मशीद आहे. या मशीदीचे बांधकाम औरंगजेब यांनी केले आहे. त्यावर जामा मशीद असा उल्लेख असणारा पर्शियन शिलालेख आहे. स्थानिक रहिवाशांकडून अशी माहिती मिळाली की, आताच्या काळात तेथे राहणारे स्थानिक मुस्लिम नमाज पडायला त्या मशिदीत येत असंत. हळूहळू त्या किल्यावर मुसलमांचा हक्क दाखवण्याचा प्रयत्न होत होता. भविष्यात हा किल्ला मुस्लिमांनी काबीज करू नये म्हणून स्थानिक रहिवाशांनी मुस्लिमांना किल्यात जाण्यास प्रवेश बंद केला.
मशिदीसमोर तोफेचा एक भाग पडलेला आहे. खुप जणांनी त्या तोफेचा भाग तेथून हलविण्याचा प्रयत्न केला पण तो तोफेचा भाग तेथून हलविता येत नाही. खुप प्रकारे प्रयत्न करून, हवी तेवढी ताकद वापरून प्रयत्न केले पण तो तोफेचा भाग तेथून हलविता आला नाही. कित्येक वर्षे ती तोफ पावसात, उन्हात आहे. त्या तोफेला अजूनही काही झाले. मशिदीच्या मागे एक विहीर आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली दगडाने बांधलेली चिरेबंदी व सुस्थितीत असलेली बारव पहायला मिळते. ही बारव किल्ल्यातील पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे. गोलाकार आकाराच्या १२० फुटापेक्षा जास्त खोल असणाऱ्या या विहिरीच्या वरील बाजूस पाणी उपसा करण्यासाठी दगडी मोट असून पाणी जास्त खोल गेल्यास विहीरीत उतरण्यासाठी दुसऱ्या बाजूने विहीरीच्या मध्यापर्यंत दगडी जिना आहे. साधारण ४० पायऱ्या उतरल्यावर विहिरीच्या आतील बाजुस ५x५ आकाराची खोली असुन तिला विहिरीच्या बाजूने कमान आहे.
किल्ल्याच्या आत उजवीकडे तटबंदीवर जाण्यासाठी जिना आहे. यावर चढून किल्ल्याच्या पुर्ण तटबंदीला फेरफटका मारता येतो. तटावर ये-जा करण्यासाठी तटबंदीमध्ये ठिकठिकाणी पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरताना खंदक (पाण्याचा वेढा) व रेवणी यांच्यात असणाऱ्या परकोटात ढासळलेले लहान आठ बुरूज व तटबंदी आजही काही प्रमाणात पहायला मिळतात. उरलेले बुरूज मात्र पुर्णपणे नष्ट झाले आहेत. तटावरून बंदुकीचा मारा करण्यासाठी अशी व्यवस्था होती की एका छिद्रांतून चार दिशेने बंदुकीचा मारा करता येतो. व काही ठिकाणी एका छिद्रांतून एकाच दिशेने बंदुकीचा मारा करता येतो. हे छिद्र अशा पद्धतीने बांधले होते की, गडाच्या पायथ्याशी उभे राहिलेल्या शत्रूंना त्या छिद्रांचा अंदाजही येत नव्हता. किल्ल्याच्या बाहेरच्या चारी बाजूने पाण्याचा वेढा घातला होता. त्याला खंदक असे म्हणतात. शत्रू किल्ल्याच्या दिशेने येताना त्या खंदकातून यावे लागत असे. तेथे आल्यावर पाण्याचा आवाज येत असतं व तो आवाज आल्यावर गडावर सर्वच सतर्क राहत असतं. गडावरून खाली पाहिल्यावर रावठ्या (राहण्याचे ठिकाण) दिसतात. या रावठ्या अशा पद्धतीने बांधल्या आहेत की शत्रूला याचा अंदाजही येत नव्हता. चारी बाजूने बुरूद (किल्यावरून सर्वच ठिकाणी पाहता येईल अशी जागा) आहे.
खर्डा हे खर्ड्याची लढाई या ऐतिहासिक घटनेसाठी प्रसिद्ध आहे. हैदराबादचा निजाम व मराठ्यांमध्ये ११ मार्च १७९५ रोजी लढाई झाली. या लढाईत मराठ्यांच्या फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला. पेशवे, दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या फौजांनी मार्च १७९५ मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले. मराठ्यांनी निजामावर आक्रमण केल्यावर निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली परंतु ब्रिटिशांनी मदत नाकारली आणि खर्डा येथे ही निर्णायक लढाई झाली. मराठ्यांशी उघड्या मैदानावर तोंड देण्याचे टाळत निजामाने खर्डा किल्ल्याचा आश्रय घेतला. मराठ्यांनी खर्ड्याच्या किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ल्याला होणारी रसद थांबवून तटबंदीभोवती तोफा रचल्या. शेवटी निजामाने १३ मार्च १७९५ रोजी तह करुन लढाईतून माघार घेतली. या लढाईत मालोजी घोरपडे, दौलतराव शिंदे, सवाई माधवराव पेशवे नागपूरचे रघुजीराजे भोसले आणि खर्डा येथील जहागीरदार सरदार सुलतानराजे निंबाळकर’ यांनी पराक्रम गाजविला आणि निजामाला धूळ चारली.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ जून २०१९











Sunday, 24 March 2019

....तर जीव वाचला असता

सकाळी घरातून कामानिमित्त बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी घरी सुखरूप येईल की नाही याची भिती घरातील मंडळींना लागलेली असते. लोकांच्या जीवाची किंमत अगदी शून्यच झालेली आहे असेच चित्र हल्ली काहीसे दिसत आहे. आपला माणूस घरी येईपर्यंत घरच्यांच्या जीवात जीव नसतो. वेळोवेळी टीवीवर बातम्या पाहिल्या जातात. कामावरून घरी येण्यास थोडा तरी उशीर झाला तर नातेवाईक सारखे फोन करून चौकशी करीत असतात.

एखादा कुठेतरी अपघात झाला तर लोक मदत करायचे सोडून भ्रमणध्वनीमध्ये चित्रफित काढण्यात मग्न असतात. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जखमी मदतीचा हात मागत असतो पण लोक त्याची मदत न करता बघ्याची भुमिका घेतात तर काहीजण भ्रमणध्वनीमध्ये त्या जखमीचे चित्रफित/ छायाचित्र काढत असतात. अशा वेळी जखमीला तातडीने मदत न मिळाल्याने त्याला त्याचे प्राण गमवावे लागते. एवढे निर्दयपणे लोक कसे वागतात हेच कळत नाही. चित्रफित काढताना त्यांच्या मनात जरा सुद्धा विचार येत नसेल का? की समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला किंवा मृत्यू पडलेला तो/ती एखाद्याचा/ची भाऊ-बहिण, आई-वडील, पती-पत्नी असेल . घरी कोणीतरी त्याची/तिची वाट पाहत असेल. देव न करो, समजा तुमच्यावरच अशी परिस्थिती आली असती तर? हा विचार करून लोकांनी अपघातग्रस्त लोकांना मदत केली पाहीजे. असे जर केले तर बरेच लोकांचे जीव वाचतील. आपले नाव होण्यासाठी, पत्रकार व लोकांचा जमाव चित्रफित, छायाचित्र काढतात व ते इतक्या जलद गती सोशल मिडियावर पसरवतील आणि आपण हे छायाचित्र काढले हे गर्वाने सांगतील. त्यात मिडियावाले तर कमालच करतात. सर्वांत प्रथम, सर्वांत जलद आम्हीच ही बातमी तुमच्यापर्यंत पोहचवली असे काहीतरी लक्ष वेधण्यासाठी सांगत असतात. काळजाचा ठोका चूकवणारी घटना घडली तरी कोणाला फरक पडत नाही कारण येथे माणूसकीच मरून गेलेली आहे.

    इमारत कोसळली, एखादा पुल कोसळला, रस्त्यावरील वाहनांचा अपघात झाला, रेल्वे दुर्घटना असे अपघात झाल्यावर आजूबाजूची जनताच जवळ असते. आणि तीच कामी येत असते.  बऱ्याच उशीराने पोलिस, अग्निशमन दल, पत्रकार, मिडीया व मदत कार्य करणाऱ्या संस्था तेथे पोहचतात. तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. काहींनी तर आपले प्राण गमावलेले असतात. कोण गंभीर जखमी झालेले असतात. अशा वेळेस जवळ असलेली जनताच कामी येते पण कोणीही असे करत नाही. अपघाताचे छायाचित्र, चित्रफिती काढण्यात ही जनता मग्न असते. अपघात झाल्यावर सरकार मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना दोन-दोन लाख रूपये व जखमी झालेल्या नातेवाईकांना प्रत्येकी पन्नास हजार रूपये देण्याचे जाहीर करते. विरोधक कोर्टात जातात. सरकारी अधिकारी वा राजकीय व्यक्तींची त्याची चूक आहे म्हणून खटला चालवला जातो. त्या घटनेतील सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित केले जाते. एक दोन दिवस ही चर्चा सुरू असते व तिसऱ्या दिवसापासून सर्व शांत. सारेजण आपापल्या मार्गाने कामाला लागलेले असतात. मिडीयावर पुन्हा एकदा मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची मुलाखत घेतली जाते. पुन्हा हळहळ सुरू होते. त्या मुलाखतीत पुन्हा एकदा अपघाताचे वेगळेच सत्य समोर येते. पिडीत नातेवाईकांची करूण कहाणी ऐकायला मिळते.  "आपला मुलगा, वडील, आई, भाऊ, बहिण अपघातात वाचू शकले असते जर जवळपास असणाऱ्या लोकांनी जखमींची मदत केली असती तर. ताबडतोब रूग्णालयात दाखल केले असते तर प्राण वाचले असते." असे काहीसे चित्र समोर येते.
    तंत्रज्ञानाची प्रगती झालेल्या देशात जागरूकता असेल तर सर्व काही शक्य आहे. थोडं विचार करण्याची गरज आहे. अपघात हा काही सांगून येत नाही. अपघात झाल्यावर सतर्कता, हुशारी दाखवली की आपल्याच सारख्या सामान्य जनतेचे प्राण वाचतील. आपल्या हातून एक चांगले कार्य झाले याचे समाधानही तुम्हाला मिळेल यासाठी आपली प्रसिद्धी बाजूला ठेवून मदत करा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ मार्च २०१९

Sunday, 19 November 2017

....पत्र हरवलं

    पुर्वी आम्ही पोस्टमन काकाची खुपच वाट पाहत असे.  कारण, ताईच पत्र येणारं असतं. ताई आम्हाला आठवड्यातून दोनदा तरी पत्र लिहायची. आम्हीही तिला पत्राचे उत्तर लगेच पाठवत असे. पत्र वाचताना माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत असत कारण तो वेगळाच आनंद असायचा. ती एक माया, ममता होती. पत्रातील प्रत्येक अक्षरात ताईचा चेहरा दिसत असे. रात्रीचे जेवण व सर्व आवरून झाले की आम्ही सर्वजण एकत्र बसून पत्र लिहत असे. तो अनुभव फार वेगळाच होता. आई-पप्पा पत्राचा मजकूर सांगत असत व ते मी लिहायचं काम करायचो. खुप छान वाटायचं पत्र लिहताना. आम्ही तर पोस्ट ऑफिसमधून अंतरदेशीय पत्र व पोस्ट कार्ड खुप आणून ठेवायचो.

    आता ते सारे दिवस बदलले आहे. पोस्टमन काकांची क्वचितच भेट होते. त्यांच्या हातात पत्र असतात पण बहुतेक सरकारी कामकाजाची. आम्ही पुर्वी पत्र लिहायचो ते म्हणजे नाती जोडण्यासाठी आणि आता कोर्टाकडून पत्र (नोटीस) पोस्टमन काकाकडे आलेली असतात ते म्हणजे संसार मोडण्यासाठी. खुप अवघड परिस्थिती आहे. आजच्या काळात कोणीही दूरच्या नातेवाईकांना पत्र लिहिताना पाहीलं नाही. पत्र लिखाण फार कमी झालंय (पत्र लिखाण थांबलेच आहे असं म्हणायला हरकत नाही).  आजच्या काळात आठवण आली की सरळ फोन उचलतात आणि दोन शब्द बोलून मोकळे होतात. आजच्या टेक्नाॅलाॅजीच्या युगात नवेनवे स्मार्ट फोन येत आहेत. समोरच्या व्यक्तीला जरी मोबाईल वरून संदेश पाठवायचा असेल तर लिखाण कमी व चिन्हच (emoji) जास्त असतात. एवढं जग व्यस्त/कामात गुंतलेला असतो. या अशा काळात पत्र हरवलं आहे.

    आपण जे कधी प्रत्यक्ष बोलू शकत नाही ते पत्राच्यारूपात मत मांडल्यावर मनावरचं ओझं हलकं होतं. मुख्य म्हणजे आपल्या हातून काहीतरी लिखाण झालं आहे याचा आनंद आपल्याला मिळतो. चला मग थोडा वेळ काढून पत्र लिहूया. पहा किती धम्माल येईल.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ नोव्हेंबर २०१७

Saturday, 30 September 2017

....आणि ते पोलिसच होते!

....आणि ते पोलिसच होते!

    शनिवारचा दिवस होता. कुटूंबाला घेऊन मुंबईला निघालो. रोजच्या सवयी प्रमाणे बदलापूरला प्लेटफार्म ला गाडी लागल्या-लागल्या चालत्या गाडीत चढलो व कुटूंबासाठी खिडकी जवळची जाग धरली. तेवढ्यात दोन तरूणीने ती खिडकी जवळची जागा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी नम्रपणे सांगितले कि माझी "माझी फॅमिली खाली उभी आहे." मग त्यांना समोरच्या जागेवर बसावं लागलं. समोर खिडकी शेजारी एक तरूण बसला होता. त्या तरूणींना तिथेही खिडकी जवळची जागा मिळाली नाही.

    मला एक सवय आहे कि एखादी नवीन व्यक्ती समोर असेल तर त्यांच्या देहबोली वरून त्यांच्या वागण्यावरून ती कोणते काम, व्यवसाय करत असेल याचा मी नेहमी मनातच अंदाज बांधत असतो. त्यांना पाहील्या पाहील्या मनात एका क्षेत्राचा विचार आला. ते याच क्षेत्रात कार्यरत असाव्यात. असे मनात विचारांचे युद्ध सुरू झाले. बदलापूर वरून गाडी मुंबई कडे निघाली. उजव्या बाजूस समोर त्या दोन तरूणींचा मित्र बसला होता. त्या तिघांना एकत्र बसायचे होते. दोघींनी शेजारील मुलाला दुसरीकडे बसण्याची विनंती केली व ते तिघे एकत्र बसले. ते फार खुश होते. एकमेकांची मस्करी करत जोर जोरात हसत होते. त्या तिघांत वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक  चर्चा सुरू होत्या. ते फार मनमोकळ्यापणाने चर्चा करीत होते की जशी त्यांना कशाचीही काळजी नसावी. एकदम बिनधास्त. तिघेही खुप भूकेले होते. दोन्ही तरूणीने वेळ न दवडता आपला जेवणाचा डब्बा काढला व तिघात खाण्यास सुरूवात केली. डब्ब्यात वरण, भात, चपाती, भेंडीची भाजी व चवीला चटणी होती. ते समोरच बसल्यामुळे हे सारं सर्वांनाच दिसत होतं. इतर प्रवासीही त्यांच्याकडे अधूनमधून लक्ष देत होते. डब्बा खाऊन झाल्यावर एकीने टाकावू वस्तू खिडकीतून बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. दुसर्‍या मैत्रीणीने तिला रोकलं. व म्हणाली "आपणच असे वागू तर कसं चालेल." मनात माझ्या पुन्हा शंका येऊ लागली की हे तिघे नेमके कोण असतील? एकीने सारा कचरा आपल्या बॅगेत भरला व म्हणाली "मी खाली उतरल्यावर कचरा पेटीत टाकेन."

    त्यांच्या कामावरील चर्चा सुरू झाल्या. मी विचार केला की, आतातरी कळेल की हे नेमके कोण आहेत? तिघांपैकी एकाची बॅग मोठी होती. बोलता बोलता ती बोलून गेली की "यात माझा युनिफॉर्म आहे. आता गेल्यावर कंट्रोल रूम मध्ये बसावे लागेल."  लगेच दूसरा बोलू लागला की "मलाही तासंनतास ऊभे रहावं लागेल." तिसरी म्हणाली "मला ही." त्यांनी मला बदलापूर ते घाटकोपर किती वेळ लागेल अशी विचारना केली. मी त्यांना सविस्तर सांगितले.
आमच्याबरोबर त्यांनी गप्पा ही मारल्या. वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही.

    जेवण झाल्यावर त्यातल्या एकाने पाणी नव्हते म्हणून कागदाने हात साफ केले होते व तो कागद तसाच बराच वेळ हातात घेऊन बसला होता. त्यांची उतरायची वेळ झाली व हातला कागद तो खिडकी बाहेर फेकणार तोच त्याच्या मैत्रिणीने त्याला अडवले व म्हणाली " अरे आपण "पोलीस" आहोत आणि आपणच असे केले तर कसे चालेल? कुठेही कचरा न फेकता त्या तिघांनी सर्व कचरा आपल्या बॅगेत भरला व ऊतरण्याच्या तयारीला लागले.

    ते गाडीत चढल्या चढल्या त्यांना पाहून, त्यांची शरीरयष्टी व हालचाली पाहून मला अंदाज आलाच होता की हे नक्कीच पोलिस असावेत! आणि माझा अंदाज खरा ठरला. "ते पोलीसच होते". मी पहील्यांदाच पोलीसांना एवढे आनंदी व मनमोकळ्यापणाने गप्पा मारताना पाहीलं आहे. शेवटी पोलिस हा माणूसच ना? त्यांनाही मन असतच ना!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० सप्टेंबर २०१७

Saturday, 14 January 2017

तरूणांनो जागे व्हा

तरूणांनो जागे व्हा....

    नेहमी प्रमाणे कामावर दुपारच्या जेवणानंतर मी व माझे सहकारी गप्पा मारत होतो. शक्यतो या वेळेत आम्ही कामाच्या गोष्टींचा विषय टाळतो. आज एकाने महाराष्ट्रातील वाढत्या लोकसंख्या याबद्दल प्रश्न उपस्थित केला. बाहेरून येणारे लोंढे, त्यांच्यामुळे होणारा त्रास या विषयी तो बोलत होता. बाहेरच्या राज्यातुन येणारे लोक हे व्यवसाय, धंदा करून आपलं स्थान आपल्या राज्यात पक्के करतात. त्यामुळे आपल्या अडचणीत भर पडली आहे. असं बरंच काही तो बोलत असताना कोणास ठाऊक माझ्या रागाचा पारा चढत होता. त्याचं कारणही तसच होतं. समजा एखादी अनोळखी व्यक्ती आपल्या घरात शिरते व त्या घरावर आपला हक्क दाखवु लागते तेव्हा तुम्ही काय कराल? सहाजिकच, काही विचार न करता तुम्ही रागाच्या भरात तुमच्या पद्धतीने त्याला धडा शिकविणार व वेळ न दवडता त्याला घराच्या बाहेर काढणार. हाच विचार जर तुम्ही आपल्या स्थानिक विभागाबद्दल, राज्याबद्दल कराल तर बराच मोठा फरक पडेल.
    कामावरून रात्री घरी परतताना बदलापूर स्टेशन पासून सोनिवली रोड ला जाण्यासाठी रिक्षात बसलो. आश्चर्य आहे तिथेही प्रवाशाने तोच विषय काढला. रस्त्यावर ऊभा असणाऱ्या एका मलाई कुल्फी विक्रेत्याकडे पाहून रिक्षा चालक व प्रवासी यांच्यात त्याच्या बद्दल चर्चा सुरू झाली. रिक्षा चालक त्याच्या बाजूने व प्रवासी त्याच्या विरोधात बोलत होता. ती चर्चा ऐकताना मी माझ्या रागावर ताबा धरून त्यांचं बोलणं ऐकत होतो. रिक्षा चालकाचं म्हणणं होतं की महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येतात, कुठेतरी भाड्याच्या घरात राहतात व मेहनत करून कमावतात. असे कमावतात की स्थानिकांनाही लाज वाटेल. रिक्षात बसलेल्यांचं म्हणणं होतं की बाहेरून येणाऱ्या अमराठी लोकांमुळे आपल्याला त्रास होतो. याबद्दल मला असं म्हणायचं आहे की यात कसला त्रास आहे जो मेहनत करतो तो कमवतो आणि तो जगतो. एवढाच त्यांचा तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हीही तुमची कला दाखवा किंवा काहीतरी करून दाखवा. जर महाराष्ट्राच्या बाहेरून येणारे अमराठी लोक आपले स्थान महाराष्ट्रात पक्के करतात मग आपण तर स्थानिक आहोत. आपणही आपली जिद्द दाखवली पाहिजे. तरूण पिढी म्हणते की बेरोजगारी वाढली. नोकऱ्या नाही मिळत. नोकरी असली तरी पगार कमी असतो.  ठीक आहे ना मग नोकरी शोधता शोधता किंवा करता करता स्वतः चा व्यवसायाचा देखील विचार करावा. नोकरी नसेल तर आपल्याला ज्या धंद्याबद्दल / व्यवसायाबद्दल माहीती आहे तर तो धंदा/व्यवसाय करावा कींवा एखाद्या आवडत्या धंद्याची/व्यवसायाची माहीती गोळा करून त्यात यशस्वी झालेल्या व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊन व्यवसायाला सुरूवात करावी असे मला वाटते. स्पर्धा खुपच वाढत आहे या स्पर्धेत बेरोजगारांनी भाग घेऊन यशस्वी बदल करून दाखवलं पाहीजे असं मला मनापासून वाटतं. बेरोजगार ही एक समस्या आहे आणि जर तरूणांनी मनावर घेतलं तर ते ही समस्या सहजच सोडवू शकतील. तरूणांना योग्य ते मार्गदर्शन करणारी व्यक्ती मिळणे हा ही एक महत्वाचा भाग आहे. यात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास. तरूणांमध्ये आत्मविश्वास हा थोडातरी निर्माण झाला की समजा तरूणांने अर्ध युद्ध जिंकलेलं आहे. जितका जास्त आत्मविश्वास तितकीच ती व्यक्ती यशस्वी होत जाते.
    तरूणांनो तुम्हाला सांगतो मनात एक पक्का निर्धार करा व प्रथम स्वतः मध्ये बदल करून घ्या. स्वतः बदला महाराष्ट्र घडवा. काही तरूण तर लवकर धीर सोडतात. चांगलं उच्च शिक्षण घेऊनही तरूणवर्ग नोकरीसाठी वणवण भटकत आहे. नोकरी जरी मिळाली तरी ती मनासारखी नसते. पगार फार कमी असतो. काहीजण तर अक्षरशः दबावाखाली काम करतात. अशा कामाचा काय फायदा की जो ना मन शांती देत ना कसले सुख देत. मिळेल ती नोकरी करण्याची जर तरूणाने तयारी दाखवली तर बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल असे मला वाटते.
    सव्वीस वर्षांपूर्वी, १९९१ साली महाराष्ट्रात नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या ३१ लाख ६० हजार एवढी होती. आता डिसेंबर २०१५ अखेर नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या तब्बल ३४ लाखांवर पोहोचली होती. हे असं का होत आहे? बेरोजगाराची संख्या का वाढते आहे? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातले सुमारे ५५% लोक २९ वर्षाच्या खालचे आहेत, आणि सुमारे २८% लोकसंख्या १५ ते २९ या वयोगटातच मोडते. ही तरूण पिढी आज नोकरी-व्यवसायाच्या शोधात आहे. भारतात सगळ्यात कमी बेरोजगारी गुजरात मध्ये आहे १.२ टक्के म्हणजेच गुजरात मध्ये दर हजार व्यक्ती मागे १२ व्यक्ति बेरोजगार आहेत. महाराष्ट्रात २८ तर कर्नाटकात १८. सिक्किम व हिमाचल प्रदेशात सर्वात जास्त बेरोजगारी आहे. तिथे प्रमाण हजारामागे १०० पेक्षा जास्त आहे. भारतातील ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारी ४ ते ५ टक्के आहे.तर शहरीभागात ५ टक्के आहे.
    एक महत्वाची बाब म्हणजे संधी. प्रत्येकाला संधी मिळत असते. काहीजण संधीच सोनं करतात व काहीजण संधीचा लाभही घेत नाहीत. मग नंतर वेळ निघून गेल्यावर दोष देत बसतात. तरूणांकडून त्यांच्या पालकांना व राज्याला/ देशाला बऱ्याच अपेक्षा असतात. तरूणांनी उद्योग / व्यवसाय याबद्दल माहीती देणाऱ्या व रोजगारासाठी पैसा (कर्ज) पूरविणाऱ्या संस्थाचीं माहीती गोळा करावी व वेळ वाया न घालवता धंदा/ व्यवसाय करावा. वाढती लोकसंख्या, स्थलांतर, स्थानिक बेरोजगारी यामूळे महाराष्ट्रात गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी तरूण पिढीने या सर्व गोष्टींचा विचार करावा व मनात जिद्द बाळगून  व्यवसाय/ धंदा करावा. कधी कधीतर मला असं वाटतं की आळस हा तरूणांचा मित्रच बनला आहे. मला एकच म्हणायचं आहे की तरूणांनो जागे व्हा. शरीरातील आळस झटकून कामाला लागा. आळस हा शत्रू आहे त्याला शत्रूच राहू द्या. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही भविष्य आहात. काहीतरी करून दाखवा व स्वतः मध्ये बदल करून महाराष्ट्रासहीत भारत देश घडवा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ जानेवारी २०१७ 

Wednesday, 21 December 2016

वाचन किती महत्वाचे?

    प्रेमात पडायचं असेल तर पुस्तकाच्या प्रेमात पडावं. आणि नाती जोडायची असतील तर पुस्तकाशी जोडावं. कारण जो एखाद्याच्या प्रेमात पडतो तो त्याची खुप काळजी घेतो व त्याला जीवापाड जपतो. जर तुम्ही पुस्तकांच्या प्रेमात पडाल तर सहजच तुम्हाला वाचनाची आवड लागेल. मी तर म्हणतो तुम्ही एकदा पुस्तकाच्या प्रेमात पडूनच बघा. आणि पहा काय फरक जाणवतो.

    वाचन म्हणजे कला. वाचन ही अशी कला जी व्यवहारात दैनंदिन जीवनात याची खुप मदत होते. माणसाला इतर व्यसनांपेक्षा वाचनाचं खुप व्यसन असावं. अडलेल्यांना मार्ग दाखवतो ते म्हणजे वाचन. समजा एखाद्या विषयावर चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेचा तूम्ही एक भाग आहात. खुप वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की चर्चेमधल्या विषयांवर तुम्ही पूर्वी काहीतरी वाचन केलं आहे व इतर कोणालाही त्याच्याबद्दल माहीती नाही आणि काहीच क्षण न दवडता तुम्ही लगेच त्याची माहीती त्या चर्चेत पूरविता. त्याक्षणी त्या चर्चेत तुमचा दरारा असेल. व इतर सर्व जण तुम्हाला एक हूशार व्यक्ती म्हणून पाहत असतात. त्यावेळी आपण इतरांवर एक वेगळीच छाप सोडतो. हे फक्त होतं वाचणामूळेच.

    तुम्हाला आवडत्या व्यक्तीची मैत्री करायची असेल तर काहीही करून जीवाचा आटापिटा करून तुम्ही त्या व्यक्तीची माहीती मिळवता व त्यांच्याशी संपर्क  साधण्याचा प्रयत्न करता, हेच पुस्तकाच्या बाबतीत घडलं तर. खुपच फरक पडेल. एकदा का तुम्हाला  वाचनाची सवय लागली की बघा फरक किती पडतो. ते स्वत:लाच विचारा. पुस्तक हा आपला गुरू असतो हे मानायला हरकत नाही कारण आपण ज्या गोष्टीचे वाचन केले आहे त्या वाचनातून आपण बरंच काही शिकतो व घडतो. शिकवण्याचं, मार्ग दाखवण्याचं, घडवण्याचं काम हे पुस्तक करतंच ना! मग पुस्तक म्हणजे आपला गुरूच आहे. पुस्तक हा आपला मार्गदर्शक असतो. बऱ्याच वेळी चुकलेला रस्ता सोडून सरळ मार्गाने चालण्यास भाग पाडण्याचे काम ते पुस्तकालाच जमतं.

    काही केलेलं वाचन हे आपल्या कधी काही तासांपुरतं स्मरणात राहतं तर काही केलेलं वाचन हे आपण कधी विसरूच शकत नाही. तुम्ही याचा विचार केलात का हो कधी! हे असं का घडतं. आपण काही वाचताना आजुबाजुला काही गडबड व गोंधळ असेल तर खरंच ते वाचन जास्त काळ आपल्या स्मरणात राहत नाही. वाचन करताना त्या पुस्तकातील प्रत्येक पात्रात आपल्याला पहावं. वाचन करताना त्या कथेचा वा त्या गोष्टींचा आपण एक भाग आहोत असे जर आपल्या मनात असेल तर तसे वाचन आपण लवकर विसरत नाही. कधी कधी ते आपल्या कायमच्या स्मरणात राहतात.

    निरीक्षण करणे ही माझी सवय. माझा दिवसभराचा बराच वेळ हा प्रवासात जातो. घर ते कार्यालयात, कार्यालय ते घर  (मी बदलापूर येथे राहतो व कामासाठी अंधेरी (एअरपोर्ट रोड-मेट्रो) येथे येतो. प्रवासात व्यक्ती आपला वेळ जात नाही म्हणून बहूतेक जण आपल्या मोबाईल मध्ये मग्न असतात हे मला नेहमी पहायला मिळतं. कोणी गेम खेळतो तर कोणी काणाला हिअर फोन लावून गाणी ऐकतो. हे करत असताना बहूतेक वेळा आपल्या अवती -भोवती काय घडतं आहे हे लवकर त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही. माझं असे म्हणणे आहे की हीच मग्नता आपण वाचनात दाखवली तर त्याचा बराच फायदा होईल. माझे तरूण वर्गाला हेच सांगायचं आहे की तुम्ही भविष्य आहात. जसा वेळ मिळेल तसे जास्तीत जास्त वाचन करा. अशा गोष्टी करणे टाळा की ज्या गोष्टीचा आपल्या फायदा होत नाही.

    वाचनाचे बरेच फायदे आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. आपले वाचन नियमीत असेल तर  समाजात वावरताना, व्यक्तीशी संवाद साधताना आपण कधीच अडखळत नाही. संवाद साधताना कधी कुठे कोणता शब्द वापरावा हे लगेच लक्षात येते. थोडक्यात सांगायचं म्हणजे वाचनामूळे आपल्या ज्ञानात बरीच भर (शब्दांची) पडते. लिखाण करतानाही आपल्या शुद्धलेखनात भर पडते.

    माझ्या बरोबर घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो. २००४ सालची गोष्ट आहे. मी श्री. प्रवीण दवणे सरांचं एक पुस्तक वाचलं आणि मला राहवलं गेलं नाही आणि मी पुस्तक आवडलं म्हणून त्यांना पत्राद्वारे कळवलं. आठवडा भरातच मला त्यांचं पत्र आलं. मला पत्र आलं होतं तेव्हा तो दिवस होता १५/५/२००४ पंधरा मे दोन हजार चार. ते पत्र मी अजून जपून ठेवलं आहे. "प्रेम व्यक्त करणारं, लेखणास प्रतिसाद देणारं पत्र खुप आवडलं" असं त्यांनी पत्रात नमूद केलं होतं. पत्रात त्यांनी मला असाही एक सल्ला दिला की, " तुझं सर्व शिक्षण पूर्ण झाल्यावर आधी बाह्यावाचणावर भर दे." त्याचं कारणही तसंच होतं.  मी त्या पत्रात भावनेच्या भरात "आशीर्वाद" हा शब्द "आर्शिवाद" असा लिहिला होता. त्यांनी तो मला त्यांच्या शैलीत पत्राद्वारे समजवून सांगितला होता. बाह्यवाचन व शुद्धलेखनावर जास्त भर देण्यास त्यांनी मला सांगितले. खरं सांगू मित्रांनो मी तूम्हाला, त्या एका पत्रामुळे मला खुप काही शिकायला मिळाले. त्यांचं पत्र आलं  तेव्हा मी कला शाखेत (समाजशास्त्र विषय) दुसऱ्या वर्षाला होतो. मी  त्यावेळी समाजशास्त्र या विषयाचं वाचन फार कमी केलं, व इतर लेखकांची, कवींची पुस्तकं वाचण्यास भर दिला. श्री. प्रविण दवणे सर खरंच तुमच्या एका पत्रामुळे माझ्यात खुप बदल घडून आले आहे. धन्यवाद श्री. प्रविण दवणे सर.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ डिसेंबर २०१६