Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Thursday, 13 March 2025

आजची पिढी

कविता

आजची पिढी

मोठ्यांचा आदर जराही नाही
आजची पिढी विसरली वारसा
शौर्य गाजवण्याच्या वयात पोरं
रूप न्याहाळत बघतात आरसा

मुलीही सध्या वरचढ झाल्या
तोकडे कपडे भलतात साज
भूलवून जाती नजरेने हलके
विसरून गेली सारीच लाज

मुलांची चिंता करत असताना
आई-वडिलांना होत असे त्रास
मुलांच्या भविष्याकडे पाहताना
उतरत नाही त्यांच्या पोटात घास


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ मार्च २०२५

Friday, 11 October 2024

स्मशानातील शांतता

स्मशानातील शांतता

जाणारा माणूस निघून जातो
दहनभूमी येथे दुःख कशाला
वाणीत गोडवा नसे जिवंतपणी
मग शेवटी का कोरड घशाला?

स्मशानातील भयान शांततेला
आपलं दुःख जाऊन विचारावं
दोन अश्रू गाळण्या अगोदर थोडं
आपण कसे वागलो ते आठवावं

जीवाची धडपड कोणासाठी ही
सर्वच संपणार श्वास थांबल्यावर
ध्यास असावा फक्त माणूसकीचा
काय मिळेल माणूस गमावल्यावर?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ ऑक्टोबर २०२४

Saturday, 27 July 2024

श्वास

श्वास

आयुष्य किती शिल्लक आहे
हे श्वास, सांग तू मला जराशी
तुझाच भरवसा आहे म्हणूनी
स्वप्ने बाळगून आहे मी उराशी

जगलो नाही मी स्वतःसाठी
दुसऱ्यांचा आनंद जपताना
लोकांना नेहमी पाहतो आहे
फक्त स्वार्थ साधून जगताना

जीवन मृत्यूचे अंतर वाढू दे
बरेचसे लक्ष गाठायचे आहे
श्वास, तू रोखू नकोस मजला
मुलांचे संसार थाटायचे आहे

शेवट मी सत्य जाणतो एकच
श्वास, तुझा कुठलाही धर्म नाही
हे सारं कमावलेलं क्षणार्धात
सोडून जावं लागेल सर्व काही

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ जुलै २०२४

Tuesday, 13 February 2024

शाळा

शाळा

जीवाला त्रास होतो तेव्हा
शाळा, फळा आठवू लागले
निवांतपणा शोधण्यास मन
शाळेत जाऊन बसू लागले

स्पर्धेच्या युगात जगताना
कपाळावर चिंता भारी आहे
हातावर घेतलेल्या छड्यांचा
मी खूप खूप आभारी आहे

शाळेचा निरोप घेतल्यानंतर
परिस्थितीने बरंच शिकवलं
जगाचा सामना करण्यासाठी
शिक्षकांनी शाळेतच घडवलं

क्षणोक्षणी पदरात पडलेल्या
ज्ञानाचा मी मोठा धनी आहे
ताठ मानेनं जगणं शिकलो
शिक्षकांचा मी ऋणी आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१२ फेबुवारी २०२४

Thursday, 11 January 2024

नवा स्पर्श

नवा स्पर्श

नवा स्पर्श जाणवला सखीचा
नजरही तिची बोलकीच होती
प्रेम व्यक्त करण्याची वाट जणू
खऱ्या अर्थाने मोकळीच होती

जीवाला "निवांत" भेटला कधी
आठवणींच्या गावात रमून जातो
माझी नजर शोधते नेहमी तिला
तिच्याच विचारात हरवून जातो

श्वास घेणं गरजेचं असतं तसे
विचारात सखीच्या जगतो आहे
काळजाचं दुःख स्वतःस ठाऊक
तिचा दुरावा फार सलतो आहे


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
११ जानेवारी २०२४

Wednesday, 20 December 2023

श्वासातील अंतर

श्वासातील अंतर

श्वासातील अंतर कमी होते
नकळत तू समोर आल्यावर
भान हरवून जातो मी नेहमी
दोघांची नजरभेट झाल्यावर 

मन वेडापिसा होऊन जातो
तुला चोरून नेहमी पाहताना
मनातलं सारं मनातच राहतं
तुला सांगायचं धाडस करताना

तुझं एक हास्य पुरेसं आहे
मनी आशा घेऊन जगताना
आनंदही तसा फार होतोच
जुन्या आठवणीत झुरताना

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० डिसेंबर २०२३

Monday, 24 July 2023

पाणी वाहत चालले

पाणी वाहत चालले

पाणी वाहत चालले
डुलवित शेतरान सारे
शेतकरी सारे खुशीत 
वाहती आनंदाचे वारे

पाणी वाहत चालले
चिंता गावाची वाढली
खचले डोंगर वस्तीवर
किती प्रेतं ही गाढली?

पाणी वाहत चालले 
गमवला जीव पुरात
गेला! माणूस वाहून 
राही आठवण उरात 

पाणी वाहत चालले
दिला पावसाने धोका
ठप्प होई जनजीवन 
चुके काळजाचा ठोका

पाणी वाहत चालले 
पाऊस हा माजलेला
असेलही तो कसाही
आहे नेहमी गाजलेला

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२४ जुलै २०२३

Saturday, 8 July 2023

मायेचा पाझर

मायेचा पाझर

जन्म तर घेतला आपण
उद्देश काय माहीत नाही!
कोणासाठी जगत आहे?
उत्तर काय माहीत नाही!

कोण आहेत ही सारी नाती
ज्यासाठी जीव जळत आहे
का बरं यांच्यासाठीच फक्त?
आयुष्य आपलं पळत आहे

स्वतःसाठी जगता येत नाही
आपल्यात नाती दडली आहे
मुळापासून काढता येत नाही
इतकी खोलवर जडली आहे

कोणत्याही स्वभावाची असो
त्यांच्यासाठी जीव तुटत आहे
दगड मनाच्या माणसांसाठी ही 
का? मायेचा पाझर फुटत आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ जुलै २०२३

Saturday, 21 January 2023

हंबरडा

हंबरडा

मी सोडून गेल्यास जगाला
दोन अश्रू उगाच वाहतील
हंबरडाही फुटेल एकदाच 
पून्हा सारे मार्गी लागतील

चांगला होता, वाईट होता
येईल उधाण चर्चेस भारी
देहात असतो प्राण जेव्हा
येतही नाही कोणीच दारी

त्यागून जावे लागते सारे
मग कशास मोह करावा?
जगताना गिळून रागलोभ
प्रत्येकाचा सन्मान करावा

काळ फिरूनी येतही नाही
वेळेला घ्यावे कवेत मिटून 
त्रागा नकोच कधी कुणाचा
आयुष्य जगावे आनंद लुटून


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ जानेवारी २०२३

Sunday, 30 October 2022

रोखून पाहणं

रोखून पाहणं

आजचं तुझ रोखून पाहणं
काळजात पार घुसलं होतं
तू मुक्त जरी वावरत होती
मन हे तुझ्यात गुंतलं होतं

नकळत स्पर्श होता तुझा
मी जरासा शहारलो होतो 
भान सुटत असताना तरी
मी स्वतःच सावरलो होतो

या जगाला विसरून सखे मी
फक्त तुझ्याकडे पाहतो आहे
वेडा होऊन विचारात तुझ्या
प्रत्येक रात्र मी जागतो आहे

थांबव झुरणं माझ्या मनातलं
भेटीस ये, विसरून जग सारे
पाहतो वाट तुझ्या होकाराची
साक्षीदार आहे नभातले तारे


यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० ऑक्टोबर २०२२

Sunday, 31 July 2022

भेदभाव

भेदभाव

पावसात तरूण दिसणारी झाडी
लाकूड होऊन पावसात कुजतात
निसर्ग खुलविणारी झाडं नेहमी
लाकूड होऊन घरात सजतात

सुंदर दिसण्यास आपण नेहमी
शरीरावर बरेच साज चढवतो
निसर्गाने सुंदर केलेल्या झाडांवर
आपण कुर्‍हाड का चालवतो?

झाडं, फूले, वेली आपल्याकडून
कधीच काहीही मागत नाही
छाटून, पाऊस देणाऱ्या झाडांना
आपली तहानही भागत नाही!

सदा भरभरून देणारा निसर्ग 
भेदभाव न करता देत असतो
प्राणवायू देणाऱ्या निसर्गाचा
का आपण जीव घेत असतो?


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
३१ जुलै २०२२

Thursday, 10 March 2022

खोटे जग

खोटे जग

दुःख कोसळल्यावर उरी 
धरता येतही नाही रोखून 
विसरून जातो जग सारं 
क्षणभर हळहळ होऊन 

फुटला टाहो गर्दीत जरी
स्वतःला ऐकू येत नाही
प्रेतावरती क्षणभर दुःख
नंतर कुणाची भेट नाही

 माणूस जो मरून जाता
सारेजण मार्गी लागतात 
 गेलेल्याची आठवण ती
वर्षातून एकदा काढतात

जगता खर्चल्या आयुष्याचा
हिशोब बंद होतो मेल्यावर
खरी किंमत कळे आपली
खोटे जग सोडून गेल्यावर


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० मार्च २०२२

Sunday, 6 February 2022

लता मंगेशकर

लता मंगेशकर 

सतत असतो गाण्याचा साठा
मनाच्या कोपर्‍यात साठलेला
लताताईच्या आवाजाचा सुर
कायमचाच हृदयात दाटलेला

प्रत्येकाच्या सुख दुःखातही
जिवंतच ठेवलं प्रत्येक गाणं
मन कधी स्विकारणार नाही
सुराच्या जगातून ताईचं जाणं

दाटून येतो कंठ हा नेहमीच 
तुमच्या आठवणीत जुळे कर
अमर झाले प्रत्येक सुर ताल
सलाम तुम्हास लता मंगेशकर 


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०६ फेब्रुवारी २०२२

Saturday, 29 January 2022

सुर्य

सुर्य 

सुर्य निघतो मावळतीला
दाखवून दिवसाचा प्रवास
त्याच्यामुळेच घडून येतो
सुखाचा दुःखाचा सहवास

नवीन उमेद घेऊन रोजच
येतो आपल्यासाठी खास
किरणेही सोबत असतात
जोडीला जगण्याचा ध्यास

सुर्य येतो अन् निघून जातो
असतो त्याचा वेगळा थाट
पण ध्येयाचे वेडे असणारे
रोजच पाहतात त्याची वाट


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२९ जानेवारी २०२२

Friday, 21 January 2022

बायको

बायको

सुर्याचं दर्शन घडण्याअगोदर
स्वयंपाक घराचं दर्शन लाभते
दिवसाची सुरूवात होते तेव्हा
बायको ही घरच्यांसाठी राबते

तब्येत बरी नसताना देखील 
तक्रार कोणाकडेही होत नाही
दुसर्‍यांसाठी राबत असताना 
विसावा स्वतःसाठी घेत नाही

सारा थकवा विसरून जगणारी
बायकोची झटणारी काया आहे
राग, रूसवा स्वाभाविक आहे
त्याच्यामागे दडली माया आहे

कुटूंब सांभाळत असताना ती
कधीही कमी कुठे पडत नाही
बायकोच अशी एक आहे जी
संकटास कधी जुमानत नाही

सर्व नाती सांभाळण्याची तिला
जादुई कलाच सापडलेली आहे
दुःखात सुख शोधून काढण्याची
तिच्यात हिंमतच दडलेली आहे


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२२ जानेवारी २०२२

Monday, 10 January 2022

प्रेम नक्की काय असतं

प्रेम नक्की काय असतं?


रोजच भेटत असते "ती"
आजची भेट खास आहे
स्वप्नाप्रमाणेच घडले सारे
सत्य की सारे भास आहे!

ती असता समोर तेव्हाच 
मनाचा बांध फूटून जातो
काळजात साठवून सारंच
प्रेमात तिच्या वाहून जातो

रोजच्या सहवासातील जादू
घट्ट बांधून जाते नाजूक नाते
अबोला असला दोघात जरी
डोळ्यांची भाषा सांगून जाते

हे प्रेम नक्की काय असतं?
तुलाच पाहून समजले सारे
दोघांच्या भेटीत हरवलो मी
तुझ्या नजरेत जादूई इशारे


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१० जानेवारी २०२२

Sunday, 2 January 2022

बाप माणूस

बाप माणूस 

मुलाच्या सुखासाठी धावताना
बाप माणूस कधी थांबत नाही
एकच अशी व्यक्ती आहे जी
स्वतःसाठी काही मागत नाही

तहान भूक आराम विसरून
गिळून दुःख जगत असतो
मुलांचे भविष्य घडवताना
बाप नेहमीच राबत असतो

कितीही अडथळे आले तरी 
स्वतःसाठी जगणं जमलं नाही
झिजतात चपला मुलांसाठीच
क्षणभरही थांबणं जमलं नाही

सलाम आहे बाप माणसाला 
हृदयी डोंगराएवढी माया आहे
जगाची चिंता जराही न करता
झिजणारी बापाची काया आहे


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०२ जानेवारी २०२२

Saturday, 1 January 2022

नवीन वर्ष

नवीन वर्ष 

महिना सण-वार तोच असतो
वर्ष नवीन रूप बदलत असतो
माणूस हा मानसिकता बदलून 
आपल्या परीने जगत असतो

आज सारखा उद्याचा दिवस 
सुर्य तोच, तोच वारा असतो
माणसं फक्त बदलतात नेहमी
आपण आपला सहारा असतो

सारे काही तेच ते असले तरी 
सारे सुखात राहो हीच इच्छा
मनापासून तुम्हा सर्वांना देतो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०१ जानेवारी २०२२

Tuesday, 28 December 2021

भावनिक जगणे

भावनिक जगणे

जमवलंय जेवढं आयुष्यात 
सोडून मागे सारे जाणे आहे
खर्चिले आयुष्य खऱ्यांसाठी
बाकी सारे खोटे नाणे आहे

जगण्यासाठी फक्त आपणास  
माया आणि प्रेम आधार आहे
आपलाच घेतात फायदा सारे 
इतरवेळी आपला भार आहे?

सोबत राहून सार्‍यांच्या नेहमी
जगणे आपले भावनिक झाले
जग सोडून गेल्यावर आपला
विसर पडणे स्वाभाविक झाले

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२८ डिसेंबर २०२१

Wednesday, 15 December 2021

लेखणी

लेखणी

लेखणीतून सजवलेल्या शब्दाने 
बर्‍याच जणांचे आयुष्य घडवले
दोष कसा द्यावा याच लेखणीला
कोर्टात कधी फासावर चढवले

गुंफून शब्दाचा दागिना अनमोल
साहित्यिक जगाला साज चढतो
वर्षानुवर्ष कायम लक्षात राहणारा
याच लेखणीतून इतिहास घडतो

वाटा मनाच्या मोकळ्या होताना
लेखणीतून घडतो जादुई प्रवास
सुखदुःख कागदावर मांडताना
सुखद भासे लेखणीचा सहवास


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१५ डिसेंबर २०२१