Wednesday, 31 May 2017

बरसून घे पावसा

बरसून घे पावसा

नभात विजांचे खेळ सारे
झाले आता आमचे पाहून
हाल ते सारे शेतकर्‍याचे
कठोर ढगास झाले सांगून

सारे झाले व्याकूळ फार
बळीराजा अन् धरणीमाता
किती प्रार्थना करू तुझी रे
बरसून घे ना पावसा आता

पाहू नको रे ढगा आडून
पाहतो पावसा तुझी वाट
धाव घे, सारे डुलव शेत
लावू नकोस आमची वाट

तुझ्या येण्याची झाली रे वेळ
नकोच आता उशीर करू
हात जोडून करतो विनवणी
नुकसान कोठे नको रे करू

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ मे २०१७

Saturday, 27 May 2017

जीवन प्रवास

जीवन प्रवास

माणसा, तुझ्या जन्माच्या वेळी
सोसत कळा आईच असते
येणार्‍या बाळाच्या स्वागताची
जगास रे, भलतीच घाई असते

जन्म झाल्यावर तुझा माणसा
आनंदी असतो संपूर्ण गाव
आनंदाच्या सार्‍या सुखी वेदना
फक्त आईलाच त्या ठाव

हळूहळू होतोस मोठा तू
प्रत्येक संकटास सामोरे जाऊन
टिकून राहतो तू या जगात
केवळ सारा अनुभव घेऊन

जबाबदारी कुटूंबास पोसण्याची 
होते सुरू तुझी एका वळणावर
संकटाशी करता हातमिळवणी
रे, करतोस प्रेम तू जगण्यावर

थकते जेव्हा शरीर तुझे
मुले दाखवी आश्रमाची वाट
भेटण्यास नाही वेळ जन्मदात्या
मांडतात मुले संसाराचा थाट

अनपेक्षित मिळते पहावयास
जीवन मरणातल्या अंतरातून
सांगणे तुला माझे रे वेड्या
जगावे काळजावर दगड ठेवून

करतो तू प्रयत्न जगण्याचा
यम करतो शेवटचा घाव
सोडून जायचे जगास या
हाच आहे शेवटचा डाव

जन्मापासून मृत्यूपर्यंतचा आहे
जीवन प्रवास हा तुझा सारा
नसताना जगात तू तेव्हा 
आठवत असे तुला जग सारा

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० मे २०१७

Thursday, 25 May 2017

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

मारू नकाच हाका थोडा निवांत आहे
देहात प्राण नाही आवार शांत आहे

गझल

वृत्त  - भुजंगप्रयात

ल गा गा ल गा गा.... ल गा गा ल गा गा
१ २ २ १ २ २.... १ २ २ १ २ २ = २० मात्रा

किती ही तयारी निरोपास माझ्या
नका वेळ घालू मला वेळ नाही

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

आता कुठे मिळाला आराम अंत क्षणी
का शेवटास देवा, गोंगाट फार आहे?

गझल

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

अंती कशास देता वस्त्रे नवीन कोरी
आयुष्य फार माझे ते फाटकेच गेले

Tuesday, 23 May 2017

शब्दांचा मनातला भार

विचार करून-करून
मन झालंय जड फार
कवितेने होतो कमी
शब्दांचा मनातला भार

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ मे २०१७