Sunday, 24 October 2021

पुस्तक वाचन

नियमित पुस्तक वाचणारे व्यक्ती आपल्या चर्चेत किंवा गप्पांमधून वेगवेगळ्या विषय मांडून इतरांचे लक्ष केंद्रित करत असतात.


 यल्लप्पा सटवाजी कोकणे 
२४ ऑक्टोबर २०२१

Saturday, 9 October 2021

हरवून गेली रात्र

हरवून गेली रात्र 

काळजात सखे नेहमी
फक्त तुझाच वावर आहे
आठवणीत झुरतो सदा
का रात्रीस जागर आहे?

हरवून गेली रात्र कुठे
सापडेना सूर मनाचा
संभाळून ठेवतो साठा
सार्‍या भेटीच्या क्षणाचा

जादू आहे कशाची ही
बेभान जगणे हे झाले 
स्मरण तुझे झाल्यावर 
गहिवरून मन हे आले


यल्लप्पा सटवाजी कोकणे 
०८ ऑक्टोबर २०२१

Sunday, 15 August 2021

पाऊस स्मरणातला

पाऊस स्मरणातला

आनंद देणारा पाऊस
काळ होऊन बरसला
सुखी असणारा व्यक्ती
जगण्यासाठी तरसला

संसार उध्वस्त झाले
माणसं सारी दुरावली
काळीज चिरून गेली
भयानकता पूरातली 

बरसताना असतो नेहमी
प्रत्येक श्वास रोखलेला
कसाही असला पाऊस
स्मरणात नेहमी कोरलेला

यल्लप्पा सटवाजी कोकणे 
१५ ऑगस्ट २०२१

Thursday, 22 July 2021

देवा विठ्ठला

देवा विठ्ठला 

तुझ्या दर्शनास मुकलो, अडकलो मी बंधनात
घरी राहून तुला विठ्ठला, कोंडतो मी काळजात

माय बाप माझा तू रे, कर संभाळ विठ्ठला
संकटाचा आता का रे, सांग वणवा पेटला
नाही गजर तुझा आता, ना टाळ मृदुंग देवळात 
घरी राहून तुला विठ्ठला, कोंडतो मी काळजात

सांग काय चूक झाली, वेळ फार सरून गेली
देवा विठ्ठला धाव आता, पंढरीची वाट दूर झाली
होऊ दे भेट तुझी माझी, जोवर हाय प्राण देहात
घरी राहून तुला विठ्ठला, कोंडतो मी काळजात

स्वामी जगाचा तू देवा, सांभाळून घे तू देवा
आशा तुझ्या दर्शनाची, ये धाव पाव तू देवा 
तुझे नाम ओठी ठेवून, गुंतलो देवा मी लेकरात
घरी राहून तुला विठ्ठला, कोंडतो मी काळजात


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ जुलै २०२१

Sunday, 30 May 2021

भान

भान

प्रेम करायला कधीही
काळ वय लागत नाही
लोकं काय म्हणतील?
याचं भान राहत नाही

सुरुवात होते नजरेने
घडायचं ते घडून जातं
काही शब्द न बोलता
मन का जडून जातं?

श्वासांचा पाठलाग होतो
जवळ दोघे असल्यावर
मनातलं मनातच राहतं
नजरेस नजर भिडल्यावर


यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० मे २०२१

वृत्तपत्र

कितीही विचार केला तरी
व्हायचं तेच होणार आहे 
आज ज्ञान दिलेले वृत्तपत्र
उद्या रद्दीतच जाणार आहे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ मे २०२१

Sunday, 23 May 2021

छंद

आपल्या भरकटलेल्या, चंचल मनाला शांत करणारं जालीम उपाय म्हणजे आपला छंद आहे.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ मे २०२१