Tuesday 3 October 2017

इस्लाह अर्थात परिष्करण

*इस्लाह अर्थात परिष्करण*

उस्तादाने आपल्या शिष्याच्या रचनेत गरजेप्रमाणे फेरफार करून ती अधिक सुंदर करणे म्हणजेच *इस्लाह*.

*गझलच्या* प्रवासात चुकीच्या मार्गाने जाण्यापेक्षा वाट कुणाला तरी विचारणे हे जास्त श्रेयस्कर. याच विचारसरणीतून ‘*इस्लाह*’ म्हणजेच परिष्करण ही संकल्पना जन्माला आली आणि गझलच्या उत्कर्षाला साह्यभूत ठरली. *उस्तादाने आपल्या शिष्याच्या रचनेत गरजेपुरते फेरफार करून ती अधिक सुंदर करणे म्हणजे इस्लाह*. ही परंपरा उर्दू काव्यात खूप जुनी आहे. गझल आपण उर्दूमधूनच घेतली, मग ही चांगली परंपराही घ्यायला काय हरकत आहे?
उर्दू भाषेत गझलमध्ये उस्ताद जाणकारांकडून गढल इस्लाह (परिष्करण) करण्याची आणि करून घेण्याची प्रथा उर्दू गझलच्या जन्मापासून चालत आलेली आहे. *गझलचा शेर रचणे तितकेसे अवघड नाही;* परंतु गझलचा शेर समजणे हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. *गझलविषयी प्रेम, आवड आणि परिश्रम यामुळे शेर रचण्याचा सराव किंवा अभ्यास कदाचित होऊ शकेल;* परंतु शेर समजणे, त्याची पारख करणे, शेराचे गुण-दोष कळण्याची समीक्षणात्मक दृष्टी असणे ही अतिशय दुरापास्त अशी गोष्ट आहे. जरी नीर-क्षीर विवेकबुद्धी असली तरी गझलच्या शेरातील दोष काढून ते दर्जेदार चमकदार उच्च कोटीचे करणे हे प्रत्येकाला साधेलच असे नाही. सोन्याच्या खरे-खोटेपणाची पारख सराफ करू शकेल; परंतु सोन्यातील हीण काढून ते शुद्ध करणे हे फक्त जातिवंत सोनारच करू जाणे. 
*इस्लाह करण्याची क्षमता केवळ छंदशास्त्र, अलंकारशास्त्र आणि साहित्यशास्त्रामध्ये पारंगत झाल्याने येत नसते, तर त्याकरिता शायराना वृत्ती, समज, अनुभव आणि सारासार विवेकबुद्धी असणे अत्यंत आवश्यक आहे. इस्लाहमुळे फक्त शिष्यालाच फायदा होतो असे नाही, तर त्यामुळे इस्लाह करणाऱ्या गुरूचाही अभ्यास, स्वाध्याय होत असतो*. त्यामुळे गुरूच्या स्वत:च्याही काव्यप्रतिभेला तेज चढत असते. नित्य-नूतन गोष्टींचा, विषयाचा अभ्यास करून माहिती मिळविण्याची प्रवृत्ती वाढीस लागते, जेणेकरून तो आपल्या शिष्यवर्गाला त्यांच्या गझल लेखनात मार्गदर्शन करून पारंगत करू शकेल. मोठमोठय़ा उस्ताद शायरांना मुद्रित किंवा लिखित शायरीवरून ते काय लिहितात आणि कसे लिहितात हे कदाचित कळू शकेल; परंतु त्यांची समीक्षणात्मक दृष्टी आणि समज यांचे अनुमान त्यांनी केलेल्या परिष्करणावरूनच करता येईल, की शिष्याने काय लिहिलेय आणि त्यांच्या गुरूने किंचितमात्र सुधारणा करून त्या लिखाणाचे कसे सोने केलेय. 
काही महाभाग मात्र इस्लाह हे शिष्याकरिता वज्र्य आणि अहितकर आहे असे समजावतात. यावर त्याचे असे म्हणणे आहे की, इस्लाहच्या बंधनामुळे तो शिष्य स्वत:च्या विचारभावना व्यक्त करू शकत नाही आणि तो गुरूचे अंधानुकरण करू लागतो. तो आपल्या कल्पना व्यक्त करण्याची क्षमता घालवून बसतो आणि गुरूचा आश्रित होऊन जातो; परंतु ही अतिशय भ्रामक अशी कल्पना आहे. *पशू, पक्षी आणि मानव हे सारेच जण आपल्या प्राथमिक अवस्थेत आपल्यापेक्षा समर्थ आणि अनुभवसंपन्न जाणकारांकडून शिकण्यासाठी विवश असतात.* पक्ष्यांची पिले आपल्या आईबापाकडून खाणेपिणे आणि उडण्याची कला शिकतात, तेव्हाच ते स्वच्छंदपणे आकाशात विहार करू शकतात. प्राणी आपल्या पिलांना प्रेमाने चाटून, दूध पाजून स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकवतात आणि मानवाला तर जन्मापासून मृत्यूपर्यंत कुणा ना कुणाकडून काही ना काही शिकावेच लागत आलेले आहे.

No comments:

Post a Comment