Saturday 30 September 2017

....आणि ते पोलिसच होते!

....आणि ते पोलिसच होते!

    शनिवारचा दिवस होता. कुटूंबाला घेऊन मुंबईला निघालो. रोजच्या सवयी प्रमाणे बदलापूरला प्लेटफार्म ला गाडी लागल्या-लागल्या चालत्या गाडीत चढलो व कुटूंबासाठी खिडकी जवळची जाग धरली. तेवढ्यात दोन तरूणीने ती खिडकी जवळची जागा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी नम्रपणे सांगितले कि माझी "माझी फॅमिली खाली उभी आहे." मग त्यांना समोरच्या जागेवर बसावं लागलं. समोर खिडकी शेजारी एक तरूण बसला होता. त्या तरूणींना तिथेही खिडकी जवळची जागा मिळाली नाही.

    मला एक सवय आहे कि एखादी नवीन व्यक्ती समोर असेल तर त्यांच्या देहबोली वरून त्यांच्या वागण्यावरून ती कोणते काम, व्यवसाय करत असेल याचा मी नेहमी मनातच अंदाज बांधत असतो. त्यांना पाहील्या पाहील्या मनात एका क्षेत्राचा विचार आला. ते याच क्षेत्रात कार्यरत असाव्यात. असे मनात विचारांचे युद्ध सुरू झाले. बदलापूर वरून गाडी मुंबई कडे निघाली. उजव्या बाजूस समोर त्या दोन तरूणींचा मित्र बसला होता. त्या तिघांना एकत्र बसायचे होते. दोघींनी शेजारील मुलाला दुसरीकडे बसण्याची विनंती केली व ते तिघे एकत्र बसले. ते फार खुश होते. एकमेकांची मस्करी करत जोर जोरात हसत होते. त्या तिघांत वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक  चर्चा सुरू होत्या. ते फार मनमोकळ्यापणाने चर्चा करीत होते की जशी त्यांना कशाचीही काळजी नसावी. एकदम बिनधास्त. तिघेही खुप भूकेले होते. दोन्ही तरूणीने वेळ न दवडता आपला जेवणाचा डब्बा काढला व तिघात खाण्यास सुरूवात केली. डब्ब्यात वरण, भात, चपाती, भेंडीची भाजी व चवीला चटणी होती. ते समोरच बसल्यामुळे हे सारं सर्वांनाच दिसत होतं. इतर प्रवासीही त्यांच्याकडे अधूनमधून लक्ष देत होते. डब्बा खाऊन झाल्यावर एकीने टाकावू वस्तू खिडकीतून बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. दुसर्‍या मैत्रीणीने तिला रोकलं. व म्हणाली "आपणच असे वागू तर कसं चालेल." मनात माझ्या पुन्हा शंका येऊ लागली की हे तिघे नेमके कोण असतील? एकीने सारा कचरा आपल्या बॅगेत भरला व म्हणाली "मी खाली उतरल्यावर कचरा पेटीत टाकेन."

    त्यांच्या कामावरील चर्चा सुरू झाल्या. मी विचार केला की, आतातरी कळेल की हे नेमके कोण आहेत? तिघांपैकी एकाची बॅग मोठी होती. बोलता बोलता ती बोलून गेली की "यात माझा युनिफॉर्म आहे. आता गेल्यावर कंट्रोल रूम मध्ये बसावे लागेल."  लगेच दूसरा बोलू लागला की "मलाही तासंनतास ऊभे रहावं लागेल." तिसरी म्हणाली "मला ही." त्यांनी मला बदलापूर ते घाटकोपर किती वेळ लागेल अशी विचारना केली. मी त्यांना सविस्तर सांगितले.
आमच्याबरोबर त्यांनी गप्पा ही मारल्या. वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही.

    जेवण झाल्यावर त्यातल्या एकाने पाणी नव्हते म्हणून कागदाने हात साफ केले होते व तो कागद तसाच बराच वेळ हातात घेऊन बसला होता. त्यांची उतरायची वेळ झाली व हातला कागद तो खिडकी बाहेर फेकणार तोच त्याच्या मैत्रिणीने त्याला अडवले व म्हणाली " अरे आपण "पोलीस" आहोत आणि आपणच असे केले तर कसे चालेल? कुठेही कचरा न फेकता त्या तिघांनी सर्व कचरा आपल्या बॅगेत भरला व ऊतरण्याच्या तयारीला लागले.

    ते गाडीत चढल्या चढल्या त्यांना पाहून, त्यांची शरीरयष्टी व हालचाली पाहून मला अंदाज आलाच होता की हे नक्कीच पोलिस असावेत! आणि माझा अंदाज खरा ठरला. "ते पोलीसच होते". मी पहील्यांदाच पोलीसांना एवढे आनंदी व मनमोकळ्यापणाने गप्पा मारताना पाहीलं आहे. शेवटी पोलिस हा माणूसच ना? त्यांनाही मन असतच ना!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment