देहांत झाल्यावर?
देहांत झाल्यावर माझा कोणी,
आक्रोश जराही करू नका,
जगलो करीत खोट्यांचा सामना
खोटे अश्रू शेवटी ढाळू नका ।।१।।
वाईट, कपटी जगी जगताना
भार दु:खाचे खुप वाहीले,
वाहाल आदराने या देहाला
स्वप्न हेच शेवटास पाहीले ।।२।।
रात्रंदिन झोपलो नाही शांत
विचार तुमचाच केला आयुष्यात ,
झोपू द्यात शांतपणे ताटीवर
व्यत्यय नको शेवटच्या भजनात ।।३।।
जगता चांगल्या वाईट शब्दांचे
चटके खुप सोसले आहे,
अग्नी द्याल शेवटी आदराने
सदैव हेच घोकले आहे ।।४।।
जगताना हरवून देहभान तुम्हासाठी
केलेले काबाडकष्ट विसरू नका,
अस्थींचे विसर्जन पाण्यात करा,
धिंडवडे त्यांचे करू नका ।।५।।
नका घेऊ जाणून कोणीही
असेन कोण मी पुढील जन्मात,
राहीलेलं अधूरं खुपच आहे
करायचे पूर्ण मानवाच्या रूपात ।।६।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८ ऑक्टोबर २०००
No comments:
Post a Comment